अर्थसंकल्पातील कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवा – माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांचे आवाहन

 

नांदेड: लाडकी बहीण या महिला सक्षमीकरण योजनेसह राज्य शासनाने यावर्षी शेतकरी युवक- युवती मध्यमवर्गीय, गरीब यांच्यासाठी अनेक कल्याणकारी बाबींची घोषणा केली आहे. महायुती सरकारने सुरू केलेल्या या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी करावे असे आवाहन माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.

भारतीय जनता पक्ष नांदेड जिल्हा उत्तर मधील पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेल्या अर्थसंकल्प तरतूद बैठकीत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पक्षाचे विभागीय संघटन मंत्री संजय कौडगे, विधान परिषदेचे माजी गटनेते अमरनाथ राजूरकर जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख युवा नेत्या श्रीजया चव्हाण , गोविंदराव शिंदे नागेलीकर, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपत राव तिडके, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख, स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी,जगदीश भोसीकर , डॉ लक्ष्मण इंगोले,बालाजी गव्हाणे, भगवान दंडवे ,बालाजी खटिंग, बाळासाहेब देशमुख, विशाल माने, रोहिदास जाधव, बालाजी स्वामी, कोमल जयस्वाल, उद्धव पवार, सुभाष देशमुख पाटनूरकर, सुदाम खानसोळे, सचिन कल्याणकर, निळकंठ मदने आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना खासदार चव्हाण पुढे म्हणाले की, लोकसभेत जी चूक झाली त्याची पुनरावृत्ती होऊ देऊ नका. विकासाचे कोणतेही काम करण्यासाठी मी आपल्या सेवेत आहे. विकासासाठी राजकीय नेत्यांकडे दूरदृष्टी असणं आवश्यक आहे. राज्य शासनाने या अर्थ संकल्पात अनेक महत्वपूर्ण लोककल्याणकारी निर्णय घेतले आहेत. या निर्णयाची माहिती कार्यकर्ता म्हणून तुम्ही आधी घेतली पाहिजे व त्यानंतर हे निर्णय लोकहिताचे कसे आहेत ते जनतेला पटवून दिले पाहिजेत. यंदा केंद्र सरकारने अनेक कृषीमालाच्या आधारभूत किंमतीत मोठी वाढ केली आहे, तर राज्य शासनाने मराठा समाजासाठी दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिले आहे. त्याचा फायदा अनेक युवकांना होत आहे पण हे सांगण्यासाठी आपण कमी पडू नये अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

या बैठकीत बोलताना विभागीय संघटन मंत्री संजय कौडगे म्हणाले की , भारतीय जनता पक्ष बूथवर जाऊन प्रत्येक मतदारांशी संपर्क साधण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. लोकहितासाठी काम करणाऱ्या भारतीय जनता पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचली पाहिजे यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागावे.आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळण्यासाठी पक्ष संघटनेत कार्यकर्त्यांनी झोकून द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 


बैठकीचे संयोजक माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी विचार मांडले, त्यांनी आपल्या भाषणात अर्थसंकल्पातील वेगवेगळ्या तरतुदीवर प्रकाश टाकला. तर जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांनी आपल्या भाषणातून लोककल्याणकारी योजनांची माहिती सामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी काम करावे असे आवाहन कार्यकर्त्याना केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पांडागळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार भगवान दंडवे यांनी मानले. या बैठकीस भोकर, मुदखेड व अर्धापुर तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *