भोकर, अर्धापूर व मुदखेड तालुक्यातील एकूण १२२ गावांमध्ये सुरु असलेल्या जलजीवन मिशनच्या कामांचा खा. अशोकराव चव्हाण यांनी आज आढावा घेतला.
नांदेड येथे झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जलजीवन मिशन अंतर्गत सध्या भोकर तालुक्यात ६१, मुदखेड तालुक्यात ३३ तर अर्धापूर तालुक्यात २८ कामे सुरू आहेत. खा. अशोकराव चव्हाण यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेली ही कामे सध्या प्रगतीपथावर असून, ती पूर्ण झाल्यानंतर या गावांमधील पाणी पुरवठ्याचे प्रश्न मार्गी लागतील. मात्र, काही ठिकाणी ही कामे अपेक्षित गतीने सुरू नसल्याचे कार्यकर्त्यांनी खा. अशोकराव चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिले होते.
त्यामुळे भोकर विधानसभा मतदारसंघातील जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेऊन कामांना गती देण्यासाठी दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत खा. अशोकराव चव्हाण यांची व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली होती. त्या बैठकीतील चर्चेच्या अनुषंगाने सदरहू कामांना गती देण्यासाठी आजची आढावा बैठक होती. काही गावांमध्ये कामाचे स्वरूप विस्तारित झाल्याने ही कामे पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असून, त्यासाठी आपण शासनस्तरावर पाठपुरावा करून हा निधी लवकरात लवकर मिळवण्यासाठी प्रयत्न करू असे खा. अशोकराव चव्हाण यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे कामे गतीमान करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या.