जलजीवन मिशन’च्या कामांची केंद्रीय टास्क फोर्सकडून समीक्षा* *खा. अशोक चव्हाण यांच्या प्रश्नाला केंद्र सरकारचे उत्तर

 

नांदेड दि. २२ जुलै २०२४:

जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या कामांच्या पूर्ततेबाबत केंद्र सरकार राज्यांशी संपर्कात राहून सातत्याने पाठपुरावा करते आहे. कामांच्या प्रगतीची समीक्षा करण्यासाठी केंद्रीय स्तरावर टास्क फोर्सचे गठन करण्यात आले असून, अधिकारी राज्यांमध्ये जाऊन कामांना भेटी देत असल्याचे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांनी सांगितले आहे.

राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात खा. अशोक चव्हाण यांच्या पुरवणी प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजनेचे काम अपेक्षित गतीने होत नसल्याची बाब आज खा. अशोक चव्हाण यांनी एका उपप्रश्नाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिली होती. यावेळी ते म्हणाले की, देशभरात या योजनेचे चांगले काम सुरू आहे. महाराष्ट्रातही अनेक कामे सुरू आहेत. मात्र, त्याला पुरेशी गती नाही. नियोजित वेळेत कामे पूर्ण होताना दिसत नाहीत.

कामांची अंदाजपत्रके व अंमलबजावणीसाठी नेमलेल्या खासगी संस्थांकडून अपेक्षेनुरुप काम झालेले नाही. या पार्श्वभूमिवर केंद्र सरकारने योजनेच्या अंमलबजावणीची आढावा घ्यावा, खासगी संस्थांनी योग्य पद्धतीने कामे केली नसतील तर त्यांच्याविरूद्ध कारवाई करावी, ही कामे निश्चित कालावधीत पूर्ण करून घ्यावीत आणि आवश्यकतेप्रमाणे अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खा. अशोक चव्हाण यांनी यावेळी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *