वाघी( बो.) ता . जिंतूर – या परिसरातील गुणवंत विद्यार्थी, नवनियुक्त पोलिस पाटील तसेच विविध पदावर नवनियुक्त माजी विद्यार्थी यांचा सत्कार सोहळा दि. १२ जुलै रोजी श्री प्रभुकृपा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघी (बो. ) येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. उपाध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर पाटील वाघीकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जेष्ठ ग्रामीण साहित्यिक शंकर वाडेवाले व प्रमुख उपस्थितीत बोरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपीनवाड हे उपस्थित होते. सर्व प्रथम महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
मुख्याध्यापक संतोष साखरे यांनी प्रास्ताविक केले.
या प्रसंगी उपस्थित गुणवंतांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना ग्रामीण कवी शंकर वाडेवाले म्हणाले की, ग्रामीण भागातील एवढ्या छोट्याशा गावात असा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करून प्रभाकरराव पाटील वाघीकर यांनी साहित्यिक सामाजिक व सांस्कृतिक चळवळीला फार मोठी दिशा देण्याचे पवित्र कार्य सुरू केले आहे.
हा विकासाचा जागर ते गेली अनेक वर्षांपासून
राजकारण वा समाजकारणाच्या माध्यमातून
करताना दिसतात. त्यांच्या कार्यशैलीत कुठलाच बडेजाव नसतो. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव आहे. त्यांचा समाजाभिमुख विकासाचा वारू दौडतो आहे. विद्यार्थ्यांनी व नव्याने समाजात काम करणाऱ्या तरूण कार्यकर्त्यानीं त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
या वेळी वाडेवाले यांनी आपल्या काही गेय कविता सादर करून विद्यार्थी व रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. हिरवे हिरवे गार शेत व सायेबाई या त्यांच्या कवितांवर रसिक श्रोत्यांनी ठेका धरून कवितांचा मनमुरादपणे आनंद लुटला. प्रभाकर पाटील वाघिकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. या प्रसंगी बंडू वाडेवाले,शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक नवनिर्वाचित पोलीस पाटील परिसरातील सरपंच मंडळी, डॉ. मंडळी, विविध क्षेत्रातील कर्मचारी, कार्यकर्ते व गावकरी मंडळी उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.