मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतील युवकांमुळे प्रशासन आणखी गतीमान व्हावे : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत …! शुक्रवार सायंकाळपर्यंत सर्व विभागांनी आपली मागणी कळवण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 1 ऑगस्ट : राज्य शासनाच्या महत्त्वाकांशी मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतून तरुण रक्ताचे सुशिक्षित बेरोजगार युवक शासकीय यंत्रणेला मिळणार आहे. युवाशक्तीचा उपयोग प्रशासन आणखीन गतिमान करण्यासाठी करा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे व्यक्त केली.

मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतील उमेदवारांची नियुक्ती, त्यांना द्यावयाची कामे, आणि नव्याने सरकारी आस्थापनावर नियुक्ती होताना घ्यावयाची काळजी, यासंदर्भातील जिल्ह्यातील सर्व शासकीय आस्थापनांची कार्यशाळा आज आयोजित करण्यात आली होती. यावेळी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यासहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी सादरीकरण केले. तसेच कशाप्रकारे नियुक्ती करण्यात यावी ऑनलाइन नोंदणी कशी करावी याबाबतचे मार्गदर्शन त्यांनी केले.

त्यानंतर बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने येणारे उमेदवार ही पदभरती नसून युवकांना पुढील आयुष्यात ते ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी प्रशासन, प्रशासनाचे कार्य आणि प्रशासनाची बांधिलकी याबाबतचे योग्य मत तयार करण्याची संधी आहे. शासनामध्ये काम करताना अनेक कामांसाठी आपले मनुष्यबळ लागत असते काही दुय्यम कामांमध्ये आपले मनुष्यबळ खर्ची होते. शासनाच्या अनेक ऑनलाईन योजना आहेत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आहे. त्यांच्या प्रसिद्धीची कामे आहेत.

अशा कामांमध्ये या नव्या मनुष्यबळाचा उपयोग होणार आहे. येणारे उमेदवार हे आपल्या शासकीय यंत्रणेचे सदस्य नाही. त्यामुळे त्यांना शासनाच्या कायद्यानुसार पद निहाय कोणतीही कामे देता येणार नाही. मात्र त्यांचे योग्य प्रशिक्षण करणे हे आपले कार्य असून त्यासाठी नियोजन करावे. उद्यापर्यंत सर्व कार्यालयाने या संदर्भात नोंदणी नोंदवावी असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *