कामगार जगतातील कामगारांचे कैवारी-अण्णाभाऊ साठे…

 

जातीवंत कामगार कुटुंबातील, कामगारांचे दुःख भोवलेले अण्णाभाऊ साठे जीवनाच्या अनेक वाटा तुडवत काम करीत- काम करीत वयाच्या अकराव्या वर्षी आपल्या कुटुंबीयांसमवेत वाटेगाव ते मुंबई हा संपूर्ण पायी प्रवास केला. दहा दिवस वाटेगाव ते सातारा हा प्रवास, तीस दिवसाचा सातारा ते पुणे हा प्रवास, बारा दिवसात पुणे ते खंडाळा. खंडाळा घाटात अण्णाभाऊंनी कोळशा वाहण्याचे कष्टाचे काम केले. खंडाळा ते कल्याण. कल्याण येथे अण्णाभाऊने डोंगर फोडण्याचे काम केले.. कल्याण ते भायखळा, भायखळ्यात चांदबिबीची चाळ, अखेर मजल-दरमजल करीत भुके कंगाल अण्णाभाऊ भाकरीच्या शोधात मुंबईत अखेर दाखल झाले. असा जीवघेणा ऐतिहासिक प्रवास आणि कामगार म्हणून मुंबईत स्थायिक झालेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या वादळी जीवनाची सुरुवात झाली.

त्यांच्यात माणसाप्रती जगण्याची जिद्द होती. जीवनावर प्रचंड निष्ठा असणाऱ्या अण्णाभाऊ साठे संबंधी त्यांच्या समाविचाराचे- सहप्रवासी अमर शेख म्हणतात, अण्णाभाऊ आले गटारातून, अक्षरशून्य- अक्षरशून्य म्हणून, अनंत दुःख भोगून, कोळशाच्या पट्या वाहून, कुणाचं मूल सांभाळून, कुणाची कुत्री सांभाळून, कधी कसली तर, कधी कसली ओझे वाहून, दारिद्र्य -दारिद्र्य अशा आवाज घुमणाऱ्या मोरगाव गिरणीच्या डफार खात्यातून, अनंत दुःखाच्या अनेक वाटेतून अण्णाभाऊ आले होते. आपल्या दुःखाचा गाळ-जखमा वेशीवर धूत बसणारे अण्णाभाऊ आयुष्यभर दिसले नाहीत. तर अण्णाभाऊ कसे दिसले? तर तीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत आलेल्या अण्णाभाऊला भूकेकंगालांची मुंबई भेटली. म्हणून मुंबईतीलच नव्हे तर समग्र भूकेकंगालाच्या रिकामी आतड्याच्या अर्तकिंकाळीची ठाव घेणारे अण्णा भाऊ दिसले. सामाजिक जुलूमाच्या विरोधात झुंज देणारे अण्णाभाऊ होते.

अण्णाभाऊंची झुंज ही सामान्य, कामगार माणसांच्या न्यायासाठी होती. कष्ट करणाऱ्यांना कोणीच काही देत नाही पण, ते इतरांना मात्र भरभरून देत असतात. जे इतरांना जगवण्यासाठीच जगतात. अशा अखिल कामगार माणसांचे जगणे अण्णा भाऊंने नि अण्णाभाऊंच्या अनेक पिढ्यांनी भोगले, पाहिले, साहिले म्हणून कामगार – कष्टकऱ्यांच्या दुःख -वेदनेवर चिंताच न करता प्रत्यक्षपणे चिंता वाहणारे आण्णाभाऊ साठे आयुष्यभर जगले. म्हणूनच अण्णा भाऊ म्हणतात, “मला सामान्य माणसे आवडतात, त्यांना विद्रूप करणे मात्र आवडत नाही, त्यांची श्रमशक्ती महान आहे, ते स्वतः जगतात आणि इतरांना जगवितात”. अण्णाभाऊ साठेंचा अस्पृश्य, उपेक्षित, सामान्य, शेतकरी- कामगार माणूस हा आपल्या भुक्या संसाराची रिकामी दुरडी घेऊन प्रचंड जातीय नि भांडवलदारी जगतात शिरतो. अन्यायाच्या विरोधात बंड करतो. लढा देतो. त्या लढ्याचे साक्षीदार असणारे आणि लढ्याचाच एक भाग जगलेले अण्णाभाऊसाठे हे उपेक्षित माणसांचा लढा विद्रोही बनविता . माणसावर मानसीपणे प्रेमही करतात.

अन्याय झाला म्हणून रडत बसत नाहीत तर, हक्क गाजवतात नि जागवतात सुद्धा. माणसाची प्रतिष्ठा आणि मानवीमूल्य वर्ण – वर्ग वर्चस्ववादी समाज व्यवस्थेसमोर दमदार आणि धीर गंभीरपणे मांडतात. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे समग्र माणसांच्या हक्क – अधिकारासाठी आणि समतेच्या निर्मितीसाठी लढलेले आहेत. अण्णा भाऊंचे माणसे सुद्धा कधीच रडत बसत नाही म्हणूनच अण्णा भाऊ म्हणतात, “मला रडगराने मान्य नाही तर, मला लढा मान्य आहे. ” कामगार, उपेक्षित माणसांची आणि त्यांच्या न्याय -हक्काच्या लढाईसाठी आयुष्यभर लेखणीच्या, आचार – विचाराच्या नि तत्त्वज्ञानाच्या जोरावर लढतच होते इतकेच नव्हे तर, अण्णाभाऊ प्रत्यक्षपणे कामगाराच्या कल्याणकारी चळवळीत उभे आयुष्य जगतात . कामगाराच्या न्याय- मागण्यासाठी मोर्चे काढणारे नि त्या मोर्चाच नेतृत्व करणारे अण्णा भाऊ, वास्तव जगाचा धनी असणाऱ्या कामगार माणसाला गुलाम बनवणारी येथील सामाजिक नि अर्थव्यवस्था पूर्णता: उध्वस्त करू पाहणारे नि कामगाराचे राज्य निर्माण झाले पाहिजे. समतेच्या समाज रचनेची पुनर्बांधणी झाली पाहिजे. अण्णाभाऊंचा आग्रह लक्षात घेता, सर्व स्तरातील सर्वसमावेशक कामगार विश्वातील अण्णा भाऊ होते ते समजून घेतले पाहिजे नि समजून घेत असताना, अण्णाभाऊंच्या एकंदरीत मानवी जीवनवादाचे तत्त्वज्ञान आत्मचिंतनातून मांडावे आणि स्वीकारावे लागणार आहे.

जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विचार- व्यवहारासाठी झगडणारे माणसे अण्णाभाऊंनी पाहिली, भाकरीसाठी लढणारे मानसे अण्णा भाऊंनी सोबत केली आणि आयुष्यभर सोबत होतीच, जुनू भाकरीचा प्रश्न मीटला की, तो देश, तो समाज, नि ती माणसे खऱ्या अर्थाने स्वतंत्र होत असतात. म्हणूनच, अण्णाभाऊंचा भीमा, रामू, सुलतान, भोमक्या आणि इतर अनेक भूक आणि भाकरीच्या शोधात आक्रोश करतात नव्हे तर या विषमतावादी व्यवस्थेला उध्वस्त करण्यासाठी स्वतः मरण्याची तयारी सुद्धा दाखवितात . हातात हत्यार घेतात. वेळप्रसंगी ती हत्यारे ते या जातीय आणि भांडवलदारी व्यवस्थेचे विरोधात चालवतात सुद्धा. अण्णाभाऊंचे लढे फक्त भाकरीसाठीच नव्हते तर भाकरीची अवर्तात अडकून न राहता , भाकरीच्या पलीकडे जाऊन सर्वस्तरातील विषमतावादी समाज रचना उद्ध्वस्त करणाऱ्या तत्त्वज्ञानाची आवश्यकता प्रतिपादन करतात, म्हणूनच अण्णा भाऊ म्हणाले, “पोट भूक निर्माण करते. अन्नाची भूक भीक निर्माण करते. अन्नाच्या भुकेला विचाराची जोड लागली तर, येथील विषमता धुळीस मिसळते.” हेच जगण्याचे आणि जगविण्याचे तत्त्वज्ञान म्हणजे भूक आणि भाकरीच्याच संदर्भाने नव्हे तर सर्वहारा माणसांच्या सर्वभौमत्वला आवळणारे मूलभूत प्रश्न माणसाच्या जगण्या भोवतीच फिरत असताना दिसतात ,

 

दिवस-रात्र काम करून घाम गाळून रक्त आटवून या जगाची जडणघडण करणाऱ्या, जगाला घडविणाऱ्या नि नटविणाऱ्या कामगाराबद्दल अण्णाभाऊ म्हणतात, सदा लढे मरणाशी ज्यांना | न ठावे शांती |रक्त आटवून, जगास नटवून जगण्याची भ्रांती |
पुढे म्हणतात, शेतकरी अन दलित जणांना घेऊन या पाठी |
लोकशाही क्रांतीच्या आपल्या एका ब्रिदासाठी |
कोटी कोटी ज्यांनी ध्वजा लाल धरिली.
वरील चिंतनाच्या संदर्भाने अण्णाभाऊला अपेक्षित असणारी लोकशाही ही वर्ण – जाती- वर्गविहीन , स्त्रीदाष्यविहीन समाज निर्मितीचे स्वप्न घेऊन जगणारी लोकशाही हवी होती. ज्या लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य- समता- बंधुभाव आणि न्याय या जीवननिष्ठा निर्माण करणारी सामाजिक धारणा म्हणजे सामाजिक लोकशाही होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक लोकशाहीची व्याख्या स्पष्ट करताना, बाबासाहेब म्हणाले की, समता, स्वातंत्र्य व बंधुभाव निर्माण करणाऱ्या जीवन पद्धतीस सामाजिक लोकशाही म्हणतात. आणि हीच सामाजिक लोकशाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीने आदर्श समाज निर्मितीची, सर्वसमावेशक नि आदर्श लोकशाही होती. ही लोकशाही फक्त एक शासन प्रशासनाचा प्रकार म्हणून नाही तर, समग्र मानवी समूहाच्या जगण्यातील, त्यांच्यातील सहजीवनाचा अविभाज्य भाग , एका जीवन प्रक्रियेचा भाग म्हणून अस्तित्वात येणारी तत्त्वनिष्ठ आणि विवेकी विचार पद्धती म्हणजेच सामाजिक लोकशाही असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेकदा विषेद केलेले आहेच .

 

या सामाजिक लोकशाही बरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी आर्थिक लोकशाहीही प्रतिपादन केली आणि ती त्यांना अपेक्षित होतीच . ज्या आर्थिक लोकशाहीमध्ये आर्थिक समानता निर्माण होते. जिथे विषमता नाही, जिथे पिळवूणूक नाही, जिथे अन्याय आणि दुःख निर्माण होत नाही, अशा अनव्यार्थाने बाबासाहेबांना अपेक्षित असणारी आर्थिक लोकशाही हावी होती.ज्या आर्थिक लोकशाहीमध्ये राष्ट्रीय संपत्तीचे राष्ट्रीयकरण झाले पाहिजे नि त्या राष्ट्राच्या साधन संपत्तीवर सामाजिक मालकी स्थापित करणे होय, या अर्थाने आर्थिक लोकशाही आहे. आर्थिक लोकशाही शिवाय समताधिष्ठित समाजाची निर्मितीच होत नसते म्हणून सामाजिक आणि आर्थिक लोकशाही ही समाजाच्या उन्नतीचे पायाभूत आधार आहेत म्हणून समाजामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित झाली पाहिजे. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आग्रह धरतात. अगदी त्याच पद्धतीने, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे सुद्धा म्हणतात, शेतकरी अन दलित जणांना घेऊन या पाठी | लोकशाही क्रांतीच्या आपल्या एका ब्रीदासाठी |.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नि अण्णाभाऊंच्या मते, देशात निर्माण झालेली संसदीय लोकशाही, ही धनदांडगे आणि जात दांडग्यांचीच राहिलेली आहे. अनेक विचारवंत- तत्त्वचिंतकाने संसदीय लोकशाही ही सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीला धोका निर्माण करू शकते. अशी ही म्हटले आहे. संसदीय लोकशाही सामान्यांच्या मूलभूत गरजा आणि सर्वभौम स्वातंत्र्य मिळवून देऊ शकते का? यावर अनेकांचे मतमत्तांतरे असले तरीही, संसदीय लोकशाही सर्वसामान्य माणसांचा सर्वांगीण विकास करू शकत नाही, जे बाबासाहेबांना निष्कून सांगितले आहे. “रक्ताचा एकही थेंब न गळता सर्वसामान्य माणसाचा सर्वांगीण विकास म्हणजे लोकशाही . ही लोकशाही बाबासाहेबांना अभिप्रेत होती म्हणूनच त्यांनी संसदीय लोकशाहीला कडाडून विरोध केला. हा इतिहास जगमान्य आहेच.

 

संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून या जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी आणि कामगार आणि दलित या बहुसंख्यांक मानवी समूहाला सत्ता -संपत्ती पासून, स्वातंत्र्यापासून आणि समतेपासून वंचित ठेवणाऱ्या संसदीय लोकशाहीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा तीव्र विरोध केला होता म्हणून संसदीय लोकशाहीला एक बलिष्ठ पर्याय निर्माण करायचा असेल तर दलित, कामगार आणि शेतकरी या बहुसंख्यकांना अधिकारसंपन्न आणि न्याय- हक्क प्रदान करायचा असेल तर कामगार वर्गाच्या एकसंघ चळवळीतून निर्माण होणारी कामगारवर्गाची लोकशाही ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अपेक्षित केली होती. कामगारवर्गांच्या लोकशाहीतूनच आर्थिक लोकशाही निर्माण होऊ शकते. एके ठिकाणी जागतिक विचारवंत रसेल म्हणाले की “क्रांतीचे दुसरे नाव म्हणजे आर्थिक लोकशाही होय”. शोषणमुक्त समाज व्यवस्था निर्माणीचे स्वप्न घेऊन जगणारी ही लोकशाही असेल, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही वाटायचे, डॉ. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणाले की, ज्यांच्याकडे सत्ता आहे. त्यांना स्वातंत्र्य असते. आणि जी सत्ताहीन आहेत, मग ते शेतकरी- कामगार -मजूर -दलित- उपेक्षीत मानवी समूह, हा प्रस्थापित्य व्यवस्थेचा गुलाम म्हणून जगलेला नि जगत असणारा समाज. ज्यांची आर्थिक कुचुंबना झाली, मानसिक शोषण झाले. सामाजिक छळ झाले , ज्यांना राष्ट्रीय संपत्तीचा समान वाटा मिळाला नाही. अशा मानवी समूहासाठी समताधिष्ठित समाज रचना निर्माण करणारी, समाजसत्तावादी समाजाच्या प्रतिष्ठापनेसाठी, निकोप आणि हुकुमशाही विरहित कामगारवर्गीय लोकशाही अभिप्रेत आहे. जी की , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही अपेक्षित होती .

 

तसेच अण्णाभाऊनाही, म्हणून अण्णा भाऊ म्हणतात , बदला रे दुनिया सारी | दुमदुमली ललकार |
एकजुटीचा नेता झाला |कामगार तयार |
कामगाराच्या एकजुटीतून निर्माण होणाऱ्या राज्य म्हणजे समाजसत्तावाद. ज्या समाजसत्तावादामध्ये अंतर्भूत असणारी सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाही म्हणजे सुजलाम- सुफलाम मानवी समूहांचे जग. या जगाच्या निर्मितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरानीही लढा दिला आणि अण्णाभाऊ आयुष्यभर झगडले, लढले, आणि क्रांतिकारी आवेशाने लिहिले नि जगभर मांडले सुद्धा. हे सर्व दलित- कामगार- शेतकरी – उपेक्षित या जगाचा पोशिंदा असणाऱ्या मानवी समूहाच्या मानवी कळवळ्यामुळेच.

 

प्रा. डॉ. भगवान वाघमारे, निलंगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *