लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील द्वितीय वर्ष कला मराठी या वर्गातील विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध चित्रकार, कवी अरविंद शेलार(अहमदनगर) हे उपस्थित होते. याप्रसंगी अरविंद शेलार यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी सदिच्छा देताना स्वतःतील उत्तमाचा शोध घ्या, आपली कौशल्य ओळखून करियर घडवा. शिक्षण तर आवश्यक आहेच पण ते घेताना एखादी कला व कौशल्यदेखील आत्मसात केले पाहिजे. कलेमुळे जगणे अधिक सुंदर व उत्साही होते. आयुष्यात मार्गदर्शक व गुरू यांचे महत्व असाधारण असते. आपला व्यक्तिमत्व विकास व कारकीर्द घडविण्यासाठी आपले निरीक्षण, शोधकता, चिंतन महत्वपुर्ण असते. आपल्या अंगभूत कौशल्यावर आधारित रोजगाराभिमुख संधीही साधता येतात.
मराठी विषयात पदवी घेऊन विविध स्पर्धा परीक्षा, कायदा, पत्रकारिता, व्यवसाय व्यवस्थापन इ. उच्चशिक्षण घेऊन यशस्वी कारकीर्द घडवता येते असे सांगत आपल्या ‘माय’ ह्या गेय कवितेने त्यांनी आपल्या मनोगताचा समारोप केला. या स्वागत सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष म्हणून मराठी विभागप्रमुख डॉ. प्रतिभा जाधव या उपस्थित होत्या तसेच प्रा. अनिल डंबाळे व प्रा. प्रांजली ढेरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी द्वितीय वर्ष कला या वर्गातील विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करून आपल्या गुरुजनांचे आभार मानले. सूत्रसंचालन अविनाश मोरे व आभार प्रदर्शन शुभम गाढे यांनी केले.