देशभक्ती हिच ईश्वर भक्ती

 

“आपल्या देशाचा तिरंगा हा वाऱ्यामुळे नव्हे तर ह्या देशातील शूर जवानांच्या धाडसामुळे शौर्यामुळे आज फडकतो आहे.
एकवेळ श्वास थांबेल पण देशप्रेमाचा मनातील भाव थांबणार नाही”
आज आपला भारत देश स्वतंत्र होऊन 77 वर्षे होत आहेत. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत हर घर तिरंगा, घरोघरी तिरंगा असे आगळे वेगळे उपक्रम साजरे करताना ही दिसत आहोत. हे सर्व स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानामुळेच मिळाले आहे त्यांचे हे बलिदान आपल्याला विसरून चालणार नाही. जरा आठवून बघा. आपण ज्यावेळी गुलामगिरीमध्ये होतो त्यावेळी आपल्याला कुठल्याही प्रकारचे अधिकार नव्हते. इंग्रज त्यांना वाटेल तसा मनमानी कारभार ते आपल्यावर करत होते.

भारतीय लोकांमध्ये जाती-धर्माच्या नावाखाली भेदभाव निर्माण करून त्याचा फायदा करून घेत होते. आपला देश कसा चालावा? यासाठी कुठलेही नियम आणि कायदे त्यावेळी नव्हते. केवळ अनागोंदीचे सर्वत्र परिस्थिती होती. इंग्रज आपल्या देशातून केवळ संपत्तीची लूट करत होते असे नाही तर आपल्या भारतीय लोकांची पिळवणूक देखील करत होते. असे चित्र असताना लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर यासारखी अनेक मंडळी परदेशात शिक्षण घेऊ लागली तेव्हा त्यांना आपण पारतंत्र्यामध्ये जगत आहोत याची जाणीव झाली आणि मग सर्वांनी जो संघर्ष केला ,उठाव केला तो म्हणजे आपला स्वातंत्र्यलढा होय.

आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काही लोक शांततेच्या मार्गाने लढा देत होते, तर काही विद्रोहाच्या मार्गाने लढा देत होते. आज आकाशामध्ये तिरंगा फडकताना दिसत आहे, हा तिरंगा फडकवण्यासाठी तसेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांच्या आहुत्या दिलेल्या आहेत. तर दुसरीकडे देशाच्या सीमेवरील जवान सैनिकांही आपल्या प्राणाचे बलिदान दिलेले आहे. हे विसरून आपल्याला चालणार नाही. प्रत्येक 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण त्यांचे स्मरण केले पाहिजे. त्यासाठी
शाळा, महाविद्यालय, कार्यालये अश्या विविध ठिकाणांहून ,भाषणांमधून आपण त्यांच्या कार्याचा गुणगौरव केला पाहिजे, या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी संपूर्ण भारतातील वातावरण हे देशभक्तीमय झालेले असते आज आपण पारतंत्र्यात नसलो तरी आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी जे जवान सैनिक डोळ्यात तेल घालून रक्षण करत आहेत, म्हणूनच आपण सुखाचे क्षण अनुभवत आहोत यांचा विसर पडून आपल्याला चालणार नाही तर या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्यांच्या देखील कार्याला आपण सलाम केला पाहिजे.
आपला देश मोठा झाला पाहिजे. आपला देश आर्थिक महासत्ता झाला पाहिजे .नुसती स्वप्न पाहून चालणार नाही तर आजच्या तरुणाईने त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मोबाईल, टीव्ही – इंटरनेट यांचा उपयोग आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी केला पाहिजे.आज बरेचसे विद्यार्थी या सोशल मीडियाचा उपयोग नको त्या कामासाठी करत आहेत. जर आपण असे करत राहिलो तर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पण आपल्या राष्ट्राने प्रगती किती केली? याविषयी आपण स्वाभिमानाने काही बोलू शकणार नाही.

आपली तरुण पिढी आज नको इतका वेळ मोबाईल, इंटरनेट,व्हाट्सअप ,फेसबुक यांच्यावरती घालवत आहे. खरोखरच ही एक चिंतेची बाब आहे. यांच्या वापरामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार आहेत. एकदा का आरोग्याचे प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात झाली ,की आपल्या देशाचे रक्षण कोण करणार? सीमांचे रक्षण कोण करणार हे बळकट भाव कोठून येणार.या सर्वांचा विचार व्हायला हवा. आपण बौद्धिक आरोग्यइतकेच शारीरिक आरोग्याला देखील महत्व दिले पाहिजे .असा या स्वतंत्र्य दिनाच्या निमित्ताने संकल्प करूया. आणि आपल्या भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याचे त्यांचे ते स्वप्न पूर्ण करूया. यासाठी आपल्या समाजात वाढत असलेल्या
अंधश्रद्धा ,बेरोजगारी, दहशतवाद व वाढती लोकसंख्या सायबर क्राइम यांसारख्या समस्यांना नष्ट करण्यासाठी आपल्याला काय करता येईल? यासाठी तरुण पिढीने योगदान दिले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिनाचा उत्सव यशस्वीपणे साजरा झाला असे समजता येईल.
देशप्रेम आणि देशभक्ती ही रक्तात असली पाहिले
रक्ताच्या प्रत्येक थेंबात भिनली पाहिजे…
देशभक्ती या शब्दातच भक्ती आहे…आणि ही भक्ती निर्विकार,निसंकोच,अखंड,निरामय अशी केली पाहिजे..‌.याचबरोबर या तिरंग्याचा अवमान होणार नाही याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे.

जय हिंद, जय भारत

सौ.रूचिरा बेटकर,नांदेड
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *