नांदेड : येथील प्रसिद्ध कवी, लेखक, निवेदक शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी आजवर ५३ वेळा रक्तदान केले आहे. २५ ऑगस्ट रोजी ते वयाच्या ५८व्या वर्षात पदार्पण करत असून जन्मदिवसाच्या निमित्ताने ते विक्रमी म्हणजे ५४ वे रक्तदान करणार आहेत.
काही माणसांना दानाचं वेड असतं म्हणतात. इतरांच्या जीवनामध्ये उजेड पेरणं हा अशा अवलियाचा छंदच असतो जणू. १९९६ साली त्यांनी पहिल्यांदा मित्राच्या मुलीसाठी रूबी हॉस्पिटलमध्ये रक्तदान केले होते. तिथून त्यांची रक्तदानाची चळवळ सुरू झाली. पहिले दहा अकरा वर्षे त्यांनी वर्षातून चार वेळा रक्तदान केले. मग त्यासाठी त्यांना कोणताही मुहूर्त नसायचा. स्वतःचा वाढदिवस, लेकरांचा वाढदिवस, मित्रांचा वाढदिवस, देशाचा स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, थोर नेत्यांचे जन्मदिवस इतकेच नाही तर तीन महिन्याचा कालावधी संपल्यानंतर रस्त्यात कुठे रक्तदान शिबिर दिसले की तिथेही त्यांनी रक्तदान केले आहे.
मग ते आयोजन कोण्या पक्षाचे असो की मित्रमंडळाचे. एकदा तर एका हॉस्पिटलमध्ये मित्राची मुलगी ॲडमीट आहे म्हणून ते भेटायला गेले होते. त्या खोलीत दुसरा एक रुग्ण होता. सहज मानव्यभावाने व्यंकटेश चौधरी यांनी त्या रुग्णाची चौकशी केली. तर त्यांना रक्त मिळत नव्हते म्हणून ते चिंतेत होते. चौधरी यांनी त्या पालकांना सोबत घेऊन रक्त काढून दिले.
त्यांनी स्वतःच रक्तदान केले असे नाही, तर रक्तदानाचं महत्त्व ओळखून शिक्षकांची रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत. त्यांच्यामुळे त्यांची मुले, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्यामध्येही रक्तदानाबद्दल जागृती झाली असून तेही आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान करत असतात.