नांदेड : प्रतिनिधी
एक संघ समाज ही काळाची गरज असून समाजाचे अनेक आंदोलने आणि समाजाने दाखवलेली एकजूट यातून समाजाच्या कल्याणाचे अनेक निर्णय महायुती सरकारने घेतले आहेत.मला भारतीय जनता पक्षाने दिलेली ही आमदारकी समाजाच्या लढ्याचे आणि त्यागाचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य आमदार अमित गोरखे यांनी केले. ते नांदेड येथील नियोजन भवन मध्ये आयोजित केलेल्या अण्णा भाऊ साठे जयंती व्याख्यान कार्यक्रम आणि सत्कार कार्यक्रमानिमित्य सकल मातंग समाज आयोजित सत्कार समारंभाला उत्तर देताना ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की समाजावर होणारे अन्याय अत्याचार आणि समाजाच्या प्रगतीसाठी महाराष्ट्रात कुठेही शब्द खर्च करण्याची गरज पडेल तिथे मी कमी पडणार नाही. अशी हमी ही यावेळी आमदार गोरखे यांनी दिली.
प्रारंभी अमित गोरखे यांनी नांदेड शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करून आल्यानंतर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन झाल्यानंतर सकल मातंग समाजाच्या वतीने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
नियोजन भवन येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अविनाश घाटे हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून लाल सेनेचे संस्थापक कॉ.गणपत भिसे यांनी आरक्षण वर्गीकरण एक भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून अॅड .सुरेंद्र घोडजकर, आनंद गुंडले, डी. एम. तपासकर, अॅड.एन. एम. रानवळकर, गंगाधर वाघमारे, भारत खडसे, सतीश कावडे, गंगाधर कावडे, संभाजी शिंदे, गुणवंत काळे, गणेश तादलापूरकर, ईश्वर अण्णा जाधव, लालबाजी घाटे, माधव डोम्पले, रोहन वाघमारे, नागोराव आंबटवाड, साहेबराव गुंडले, नितीन तलवारे, रामराव सूर्यवंशी, किशन दादा कुदळेकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रमुख वक्ते कॉम्रेड गणपत भिसे बोलताना म्हणाले की, सामाजिक न्यायाची भूमिका आणि त्या तत्त्वाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय दिला असून त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने न्यायीक आयोगाची स्थापना करून महाराष्ट्र शासनाने याची तात्काळ अंमलबजावणी करून अनुसूचित जातींना न्याय मिळवून द्यावा आणि यासाठी समाजाचे आमदार म्हणून अमितजी गोरखे यांनी प्रयत्न करावेत असे मत त्यांनी व्यक्त केले. महायुती सरकारने मातंग समाजाला अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था ‘आर्टी’ दिली. आता महायुती सरकारने आयोग द्यावा आम्ही त्याची परतफेड करू असे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी कॉम्रेड गणपत भिसे यांनी आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात दिलेल्या अनेक आयोगाच्या निकालाचे विश्लेषण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत मेकाले यांनी केले तर प्रास्ताविक संजय गोटमुखे यांनी केले आणि आभार मामा गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ .साहेबराव सांगवीकर, संजय गोटमुखे, मामा गायकवाड, शिवाजी नुरुंदे, नामदेव कांबळे आदींनी परिश्रम घेतले.