“माझे कुटूंब-माझी जबाबदारी” मोहिमेचा भोसी ग्रामपंचायतीतून शुभारंभ
#नांदेड
अडचणीच्या काळात कुटुंबाला सावरण्यास आणि आहे त्या परिस्थितीवर मात करीत कुटुंबाला उभे करण्याचे जन्मजात सामर्थ्य महिलांमध्ये दडलेले आहे. वेळोवेळी महिलांने हे आपले सामर्थ्य सिद्ध करुन दाखविले आहे. कोरोनासारख्या महामारीच्या या काळात आता पुन्हा एकदा घरातील सर्व सदस्यांसमवेत महिलांना सज्ज होऊन कुटुंब सावरण्याची जबाबदारी आली असून “माझे कुटूंब-माझी जबाबदारी” या मोहिमेत त्या आपले भरीव योगदान देतील अशी खात्री जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी व्यक्त केली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याुसाठी महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेल्या “माझे कुटूंब-माझी जबाबदारी” या मोहिमेचा प्रातिनिधीक शुभारंभ नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील भोसी येथे झाला. यावेळी उद्घाटनपर भाषणात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब कदम, पंचायत समिती सभापती श्रीमती निता राऊलवाड, जिल्हा परिषद सदस्य प्रकाशराव भोसीकर, भोसीचे सरपंच श्रीमती रत्न माला शिंगेवाड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य डॉ. शिवशक्ती, पवार उपस्थित होते.
मागील सहा महिन्यांपासून शासनाचा आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग व ग्रामीण भागासाठी असलेली सर्व यंत्रणा जीवाचे राण करुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करीत आहे. आपल्या आशा वर्कर पासून जिल्हा पातळीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आपल्या कुटुंबाला विसरुन जे योगदान दिले आहे त्याला तोड नाही. आरोग्याची ही यंत्रणा जर आपल्याला सक्षम ठेवायची असेल तर प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबाने आपआपली जबाबदारी आणि कर्तव्य ओळखून आपले वर्तण हे “माझे कुटूंब-माझी जबाबदारी” या न्यायासाठी सिद्ध केले पाहिजे, असे सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी स्पष्ट केले. आपली गावपातळीवरील काम करणारी अंगणवाडी सेविका असो, आशाताई वर्कर असो ही सर्व महिला शक्ती या मोहिमेला केवळ सरकारी उपक्रमाच्या दृष्टिकोणाने पाहणार नाही तर आजवर त्यांनी ज्या गावाला आपले कुटुंब मानले आहे त्या कर्तव्यपूर्तीतून यात योगदान देतील. मी एक महिला म्हणून आमच्या आशाताईला एकटे पडू न देता त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी पुढे सरसावेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
“माझे कुटूंब-माझी जबाबदारी” ही मोहिम प्रत्येक कुटुंबाला सुरक्षिततेचा मंत्र देणारी असून यात प्रत्येक गावातील लोकसहभाग अधिकाधिक कसा घेता येईल यासाठी जिल्हा परिषदेचे आणि ग्रामपंचायतीचे सर्व प्रतिनिधी आपले योगदान देतील अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या कृषि व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाळासाहेब कदम यांनी दिली.
कोविडचा प्रादुर्भाव आता ग्रामीणस्तरावर मोठ्या प्रमाणात होण्याच्या मार्गावर आहे. आजही ग्रामीण भागातील जनता याचा प्रसार रोखण्यासाठी जी त्रीसुत्री सांगितली आहे त्याचा वापर करतांना दिसत नाही. मास्क वापरणे, सतत हाताला स्वच्छ करणे, एकमेंकांपासून प्रत्येकांनी सुरक्षित अंतर ठेवणे याबद्दल ग्रामीण भागातील जनतेने कटाक्षाने काळजी घेतली पाहिजे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांनी सांगितले. या मोहिमेसाठी जिल्हा परिषदेच्यावतीने ज्या वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत त्याप्रमाणे नियोजन करीत प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवरील सरपंच, सदस्य, ग्रामसेवकांपासून तालुका पातळीवर गटविकास अधिकारी यांनी ही मोहिम प्रत्येक घराघरात कशी रुजेल यासाठी स्वत:ला जोकून देऊन काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
प्रारंभी पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ग्रामस्थांना या मोहिमेच्या उद्घाटनानिमित्त जो संदेश दिला होता त्याचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी या मोहिमेचा उद्देश स्पष्ट करीत लोकसहभागाचे महत्व विशद केले.
भोसी गावातील ज्येष्ठ नागरिक पांडुरंग इरन्ना सिंगेवाड व उद्धव पांडुरंग साबणे या दोन ज्येष्ठ नागरिकांचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब कदम यांनी तापमान व ऑक्सिजन मोजून प्रातिनिधीक शुभारंभ केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त जिल्हा आरोग्य डॉ. शिवशक्ती पवार यांनी तर आभार सुभाष खाकरे यांनी मानले.