नांदेड दि.१ जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे नांदेड जिल्हा होमगार्ड नोंदणी प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा समादेशक, होमगार्ड तथा नांदेडचे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी दिली.
नांदेड जिल्ह्यातील पथक निहाय महिला व पुरुष होमगार्ड यांच्या रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी नोंदणी प्रक्रिया पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर सुरू आहे.परंतु काल जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नोंदणी प्रक्रियेमध्ये बदल करून नवीन सुधारित वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
अर्ज क्रमांकानुसार नविन सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. दि. २ सप्टेंबर रोजी पुरुष उमेदवार अर्ज नोंदणी क्र.७५०१ ते १०५००,दि.५ सप्टेंबर रोजी पुरुष उमेदवार अर्ज नोंदणी क्र.१६५०१ ते १७४९५, दि.५ सप्टेंबर रोजी महिला उमेदवार अर्ज नोंदणी क्र.१ ते १७४९५,दि.६ सप्टेंबर रोजी पुरुष उमेदवार अर्ज नोंदणी क्र.१०५०१ ते १३५००,दि.७ सप्टेंबर रोजी पुरुष उमेदवार अर्ज नोंदणी क्र.१३५०१ ते १६५००,दि.८ सप्टेंबर रोजी पुरुष उमेदवार अर्ज नोंदणी क्र.४५०१ ते ७५००.
सदर नोंदणी फक्त नांदेड जिल्ह्यातील रहिवाशी उमेदवारांकरिता असून इतर जिल्ह्यातील ऑनलाईन अर्ज सादर केलेले सर्व उमेदवार सदर नोंदणीसाठी अपात्र आहेत. त्यामुळे नांदेड जिल्हा सोडून ईतर जिल्ह्यातील उमेदवारांनी नोंदणी प्रक्रियेस उपस्थित राहू नये. त्यांना मैदानामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच रहिवाशी भागातील पथक, उपपथक सोडून इतर पथकात अर्ज केलेले उमेदवार सुद्धा कागदपत्रे पडताळणी मध्ये अपात्र ठरतील.
संबंधित उमेदवारांनी वर नमूद तारखेनुसार नोंदणी अर्ज, दोन कलर पासपोर्ट फोटो, शैक्षणिक व आवश्यक कागदपत्रांच्या मुळ प्रतीसह स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडाव्यात. उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणीमध्ये पात्र होणे करिता प्रत्येक प्रकारामध्ये ४०% गुण मिळविणे आवश्यक राहील.( धावणे या प्रकारात किमान १० गुण व गोळाफेक प्रकारात किमान ४ गुण आवश्यक ) धावणे चाचणीमधील अपात्र ठरल्यास गोळाफेक चाचणी घेतली जाणार नाही.
संबंधित उमेदवारांनी वर नमूद सुधारित वेळापत्रकाप्रमाणे सकाळी ६ वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, वजीराबाद,नांदेड येथे हजर राहावे असे आवाहन नांदेडचे अपर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक होमगार्ड श्री. सुरज गुरव यांनी असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.