आधुनिक तंत्रज्ञान व विज्ञानाच्या काळात बैलपोळ्याचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे,
पोळ्याचा सण पूर्वी ग्रामीण भागात फार उल्हासाात व आनंदात साजरा केला जात असे. बाजार पेठेत बैलपोळ्याचे साहित्य भरपूर प्रमाणात मिळत असे.दोन दिवसांपासून बैलांना धुऊन काढणे, लुसलुशीत गवत खाऊ घालणे, शिंगे कमी करून रंगवून घेणे, शेपटीचे लांब झालेले केस कमी करणे, पाठीवर हात फिरवून मळ काढून टाकणे ही कामे शाळा बुडवून मुले करत असत, कोणत्याही पद्धतीने बैलांसोबत राहून आनंद व्यक्त केला जात असे.सर्जा- राजाची, व ढवळ्या पवळ्याची जोडी घेऊन शेतीला जाणे त्यांच्यासोबतच राहणे.तहान भूक विसरून हे कामे केली जात असत. नंतर बैलांना घागर मोळे, झुली, रंग देऊन शेंगांना सजवणे, नवीन कासरा घेणे, वर्षभर बैल शेतीमध्ये राब राब राबवून शेतकऱ्यांना अन्नधान्य पिकवून देतो,त्यासाठी त्याची कृतज्ञता पाळावी, बैलपोळ्याच्या दिवशी त्याला सजवून गोड नैवेद्य खाऊ घालून पुरणपोळीचा गोड घास भरून त्यांचे लग्न लावण्याची प्रथा अनेक गावात आहे.
हनुमान मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घालून घरी नेऊन महिलांच्या हातून बैलांची पूजा करून लग्न लावण्याचा विधी मंगलाष्टिका म्हणून केला जात असे, आपल्या घरच्या बैलाच्या मंगलाष्टिका म्हणून झाल्यानंतर इतर ठिकाणी जाऊन सुद्धा मंगलाष्टिका म्हणणे हा माझा आवडता छंद होता. त्यामधून समाज एकत्रित येतो, त्यामुळे पोळा सणाचे महत्व अतिशय द्विगुणीत होत असे,आजचा पोळा हा सण पूर्वी सारखा राहिला नाही,
बैलांची पोळ्याच्या दिवशी बैल प्रदक्षिणा वेळेस माझे बैल अगोदर की तुझे अगोदर यावरून अनेक गावात वाद होत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणच्या पोळ्याला गालबोट लागत आहे. आज पोळ्याची परिस्थिती पाहिली तर ब-याच शेतक-याकडे बैल राहिले नाहीत. थोडक्या प्रमाणावर बैल ठेवले जात आहेत.बैलाची किंमत गगनाला भिडली आहे.शेतीचे क्षेत्र विभागल्यामुळे बैल ठेवणं शक्य नाही, म्हणून ट्रक्टरच्या सहाय्याने शेती केली जात आहे, सालगडी व बैल ठेवून शेती करणं सध्या फार अवघड झाले आहे. वैरणाचे भाव परवडत नाहीत. त्यामुळे छोटे शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे भारतीय कृषिप्रधान देशात बैलांना आता म्हणावं तेवढं महत्त्व राहिले नाही. अगोदर गावाला जाण्यासाठी बैलगाडी महत्वाचे साधन होते.शेतीतून धनधान्ये आणण्यासाठी घरी बैलगाडीचा वापर केला जात असे, परंतु अलीकडच्या काळात मालगाडी, रिक्षा याचा वापर करून घरी धान्य आणले जात आहे. त्यामुळे बैलांची तितकीशी आवश्यकता राहिली नाही, पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती होती.आता विभक्ती कुटुंब पध्दतीने राहत असल्या मुळे बैलांना सांभाळणं आता जिकिरीचे काम झाले आहे, म्हणून बैलपोळा हा सण ग्रामीण भागामध्ये सुद्धा थोड्या प्रमाणातच शिल्लक राहिला आहे,पूर्वी गावोगावी शेकडो बैल जोड्या शेतक-यराहिले राहत असत.परंतु आता बोटावर मोजण्या इतक्या बैल जोड्या उरल्या आहेत. म्हणून बैलपोळा हा सण साजरा करताना पूर्वी जसा आनंद वाटत होता, तसा आता राहिलेला नाही, मातीचे बैल घेऊन ग्रामीण भागात सुद्धा पूजा करत आहे. एका बाजूला कृषीप्रधान देश म्हणत असलो तरी कृत्रिम रित्या बैलाची पूजा केली जात आहे हे काळाच्या ओघात चालत आहे. काळ बदलला, माणसे जास्त सुशिक्षित झाली, परंपरा सुद्धा बदलत आहेत. म्हणून आवडता सण जरी असला तरी काळाच्या ओघात जसा आहे तसा स्वीकारावा लागतो, शहरातील लोक फक्त टि, व्ही वर बैलपोळ्याचे सण पहात आहेत.काही वर्षानंतर बैलांना पुस्तकातून चित्रावर पाहण्याची वेळ येऊ नये असे मला वाटते.
*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपतराव*