महात्मा बसवेश्वर

महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला तेंव्हा संपूर्ण भारताचे प्रभुत्व अनेक राजवटीत विभागलेले होते.आपसातील कलहामुळे भारत एक कुरुक्षेत्र बनले होते.धर्माच्या नावावर त्या काळचे तथाकथित बुध्दिजीवी म्हणविणारे मुठभर लोक बहुसंख्य आसलेल्या अज्ञान समाजाचे नाना प्रकारे छळ करुन त्यांंना नरक यातनांच्या आंधःकारात ढकलत होते.या आंतर्गत कलहाचा फायदा घेऊन बाह्य शत्रूंची आक्रमणे होत आसतांना हे तथाकथीत बुध्दिजीवी लोक मंत्र पठण करीत बिळात लपत आसत.बहुसंख्य अज्ञान लोक निरासक्त राहुन आपले कष्टप्रद जीवन जगण्यात व्यस्त असत. मनुधर्मशास्त्र, शुकनितीसार,शैवविष्णूपुरान ईत्यादी ग्रंथ आणि पुरोहित शाहीनी पुरस्कृत केलेला प्रतिगामी स्वरुपाचा आचार, संप्रदाय हे देशात असमानता,असहिष्णुता,अंधश्रध्दा पसरवित होते.जातीभेद,वर्णभेद सर्वत्र घरा घरात व्यापून प्रत्येक मनाला छिन्न विच्छिन्न करीत होते.परिणामी देशातील लोकांच्या मनात बंधुभाव अथवा सामाजिक दृष्ट्या संघटित राहण्याचा स्वभाव नव्हता.आणि याच दुर्बल परिस्थितीचा फायदा घेऊन शक,हुण,मंगोल असे अनेक विदेशी शत्रू येऊन भारतावर वेळोवेळी आक्रमणे केली.आणि येथील ऐश्वर्य संपत्ती लुटून नेली.नंतर ईथेच ठाण मांडून स्थानिक लोकांना बाजुला सारून आपणच सम्राट होऊन राज्य केले.त्यावेळी स्वतःला बुध्दिजीवी म्हणविणारे त्यांच्या चरण सेवेला हात जोडुन तत्पर राहिले.आणि ख्रिश्चन धर्मगुरु,मुस्लिम मुल्ला मौलवी हे धर्मांतर करण्याच्या कार्यात गुंतले.हे सर्व घडण्यास वर्णाश्रम धर्मच कारणीभूत होय. याचे परिणाम म्हणून समाजात पसरलेली जातीयता,अस्पृश्यता, असमानता,पुराण,आगम इत्यादी स्वरुपाची खोटी निष्ठा,बहुदेवता उपासना ही सर्व कारणे राष्ट्राच्या अवनत स्थितीला जबाबदार असल्याचे ऐतिहासिक सत्य सर्वमान्य आहे.(संदर्भ- म.बसवेश्वर डाॅ.आंबेडकर यांचे महान सामाजिक कार्य एक तौलनिक अभ्यास.लेखक डाॅ.जवरे गौडा.माजी कुलगुरु.म्हैसूर विश्वविद्यालय कर्नाटक )
ही मानवतेला कलंकित करणारी परंपरा पुसून काढुन सम्यक समतेच्या तत्वावर नव्या समाजाची पुनर्बांधणी करत देशाला सुस्थित व सुरक्षिततेकडे घेऊन जाणे हा म. बसवेश्वराच्या जिवनाचा मुख्य उद्देश होता.ह्यासाठी त्यांनी आपले प्राण वेचले. परंतु दुर्दैवाने इथल्या प्रतिगामी समाजाला त्यांच्या महान कार्याचे महत्त्व रुचले नाही.अशा या असामाजिक तत्वानी म.बसवेश्वरांसारख्या महान दार्शनिकाचा खुन करण्यासही मागेपुढे पाहिले नाही.हि या जगाची शोकांतिका आहे.

मनुस्मृती,हिंसा मानणारे वेद,देवाच्या नावावर खोट्या कथा लिहून राष्ट्राला अवनतीस नेणा-या कटकारस्थाना विरुद्ध म.बसवेश्वरांनी साडे आठशे वर्षापूर्वी संघर्ष केला.विषमतेचे पोषण करणारे साहित्य पुर्णपणे नष्ट केल्याशिवाय राष्ट्राला चांगले दिवस लाभणार नाहीत असे म.बसवेश्वरांचे स्पष्ट मत होते. विषमतेचे समर्थन करणा-या ग्रंथाविषयी आपल्या मनातील चिड व्यक्त करताना ते म्हणतात
” वेदांना बासनात गुंडाळून
अडगळीत टाकतो
शास्त्रांच्या पायांना साखळी
घालतो
तर्काच्या पाठीवर बार
ओढतो
आगमांचे नाक कापतो “
एकुण म.बसवेश्वरांच्या वचन साहित्यातील विद्रोह समजून घेण्यासारखा आहे. पाखंडावर त्यांनी ओढलेले आसूड अंचबित करणारे आहेत. म.बसवेश्वर व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांमधील कालावधीचे आंतर मोठे असले,वैचारिक.सांस्कृतिक मुल्यांत वेगळेपणा असला,युगधर्म आणि मनुधर्मात फरक असला तरी उभयतांची दृष्टी आणि ध्येय यात आश्चर्य वाटेल इतके साम्य दिसुन येते.याच मुख्य कारण म्हणजे उभय महापुरुषांच्या रोमारोमात मानवताप्रेम ठासून भरलेला आहे हे स्पष्ट होते.या दोनही महापुरुषांनी एकाच वेळेस समान पातळीवर राष्ट्रप्रेम आणि मानवताप्रेम याचा साकल्याने विचार केलेला आहे.आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्राणपणाला लावलेला आहे.
चरांचरातील जीवात्म्यांचे कल्याण साधण्याचे सामर्थ्य बसव तत्त्वज्ञानात आहे.दलितोध्दाराचे कार्य किती अवघड आहे हे म.फुले,छ.शाहु महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुभवाला आलेल्या अनेक प्रसंगावरून आपल्याला समजते.तेच कार्य साडे आठशे वर्षापूर्वी करुन म.बसवेश्वरांनी जगाला दिपवले आहे.चरांचरातील सर्व जीवात्म्यांचे भले व्हावे.जीवकोटीतील समतोल राखला गेला नाही तर पशु.पक्षी,कृमी आणि वनस्पती कुळाचा नाश होईल. फक्त मानव हाच पृथ्वीचा केंद्रबिंदू न होता सकल जीवात्मा या पृथ्वीचा केंद्रबिंदु झाला पाहिजे.ह्या पृथ्वीची विविधता नष्ट न होण्याची काळजी घेणे मानवाचे कर्तव्य आहे असे म.बसवेश्वर सांगतात.हिच गोष्ट जगातील सर्व पर्यावरण तज्ञ आज सांगत आहेत. यावरून म.बसवेश्वरांचे विचार किती प्रगल्भ आणि काळाच्याही पुढचे होते.

चरांचरातुन अंतर्भुत झालेल्या जीवजालातील शृंखलेचे प्रमुख असलेल्या वनस्पतीलाही जीव असतो हे सर्व प्रथम म.बसवेश्वरांनी सांगितलेल आहे.स्वतःला शाकाहरी समजणारे सुध्दा जीव संहितेद्वारेच आपला आहार मिळवतात. असे सांगून म.बसवेश्वरांनी हिंसेचे विराट स्वरुप जगाला दाखवून दिलेले आहे.वनस्पतीला सुध्दा जीव असतो हे वैज्ञानिक सत्य आपल्या अंतःकरणपुर्ण सद्विवेकांने जाणून घेणाऱ्या दार्शनिकापैकी म.बसवेश्वर हे पहिले दार्शनिक आहेत हे आवर्जून लक्षात घेण्यासारखी बाब आहे.

एकेश्वरवादी बसवेश्वरांचा देव ही मोठा अनुपम,अद्वितीय आहे.”कुंडलसंगम देव” “कुंडल”म्हणजे कन्नड भाषेत “समरसता ” म्हणजे सकल मानव जातीचे एका समसमान पातळीवरचं ऐक्य होवून निर्माण झालेली ती समरसता आणि या समरसतेचा संगम म्हणजेच कुंडलसंगम देव.कुंडलसंगम हा देव नसून सर्व भेदभाव विसरून एका जाणीवेने,आचाराने,अंतःकरणाने संगम होवून साध्य झालेली समुहप्रज्ञा होय.समाजाप्रती प्रज्ञा हीच देवाची खरी पुजा होय.मानवा प्रती सृजनशील नसलेली अर्थात सामाजिक प्रज्ञा नसलेली “लिंगार्चना” ही अर्थहिन आहे असे म.बसवेश्वर म्हणतात.असे महापुरुष कोणत्याही जाती धर्माच्या,जगाच्या कोपऱ्यात असोत ते जगदवंद्यच आहेत. अशा महापुरुषांची शिकवण विसरलेले लोक दुर्दैवी आहेत. पुढील पिडीच्या उध्दारासाठी त्यांची आराधना आवश्यक आहे.या महात्म्यांचे संदेश दीपस्तंभ न झाल्यास राष्ट्राला भविष्य नाही असेच कळवळुन सांगावे लागेल…..

शब्दांकन –
शंकर बाभळीकर
मो.9404904149

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *