प्रतिनिधी ;
लोहा व कंधार मतदारसंघात मागील दोन दिवसापासून अतिवृष्टी झाली आहे, अतिवृष्टीमुळे लोहा व कंधार तालुक्यातील नदी नाल्यांना व गोदावरी, मन्याड नदीला पूर आला असून पुराचे पाणी शेतात गेल्याने या भागातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे, सततच्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून अतिवृष्टीमुळे मतदार संघातील बहुतांश पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे.
मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या व सखल भागात पाणी साचलेले असून शेत जमिनींचे व पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असल्यामुळे सरसकट शेतीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी बांधवातून मोठ्या प्रमाणात होत आहे, सद्यस्थितीत अतिवृष्टीमुळे लोहा व कंधार तालुक्यात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असून ज्या भागात पूरसदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे त्या त्या भागात आपत्कालीन सर्व सोयी सुविधा तात्काळ पुरवण्यात याव्यात व मतदारसंघातील अतिवृष्टीच्या पावसामुळे खरडलेल्या शेत जमिनीचे व बाधित शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
″
मतदारसंघात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आमदार श्यामसुंदर शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रांत पाटील शिंदे हे पूर परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेत असून आमदार श्यामसुंदर शिंदे हे लोहा व कंधार तहसीलदार यांच्या सतत संपर्कात आहेत आणि संबंधित पीकविमा कंपनीना वेळोवेळी सूचना करण्याचे निर्देश देण्यासाठी संबंधित विभागाला कळविण्यात आले आहे तरी शेतकरी बांधवांनो धीर धरा मी तुमच्यासोबत असल्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी बोलताना सांगितले.
एक ऑगस्ट महसूल दिनापासून मतदारसंघात ई पीक पाहणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून ही ई पीक पाहणी 15 सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार असून मतदार संघातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या सर्व शेतकरी बांधवांनी मोबाईल ॲप द्वारे ई पीक पाहणी मध्ये नोंद करावी जेणेकरून शेतकरी बांधवांना विविध शासकीय सोयी सुविधेचा लाभ मिळण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करून घ्यावी असे आवाहन आमदार श्यामसुंदर शिंदे , सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रांत पाटील शिंदे यांनी केले आहे.