कंधार ; राज्य कर्मचारी यांच्या वेतनाप्रमाणेच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी “एसटी कामगार कृती समितीच्या” वतीने बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे कंधार आगारातील तब्बल ६५ लालपरीची चाके थांबली आहेत. त्यामुळे धो पावसात सर्वसामान्य प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत असल्याचे दिसत असून, दैनंदिन १२ लक्ष रुपये उत्पन्नावर पाणी फिरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी आज दि. ३ सप्टेंबर २०२४ रोज मंगळवारी सकाळपासूनच संप पुकारला आहे, राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणेच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पगार मिळावा, या प्रमुख मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला असून, या संपाला आज पासून सुरुवात झाली आहे, संततधार कोसळणारा पाऊस त्यातच गणेश उत्सवाचा सण अवघ्या बोटावर मोजण्या इतक्या दिवसावर येऊन ठेपला असतानाच एसटी कर्मचाऱ्यांनी आपले संपाचे हत्यार उपसल्याने सर्व सामान्य प्रवाशांना व विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे.
सदरच्या संपात एसटी चालक, वाहक आणि वर्कशॉप मधील कर्मचारी सहभागी झाले असून, यात कंधार आगारातील ३३० कर्मचारी सहभागी झाले असल्यामुळे कंधार आगारातील एसटी वाहतूक सेवा कोलमडली आहे. त्यामुळे एसटी प्रवाशांचे मोठे हाल होत असल्याचे दिसून येत आहे, त्यासाठी सरकारने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास संपाचे लोन संपूर्ण जिल्हाभर पसरणार असून, ऐन सणासुदीच्या काळात सर्व सामान्य प्रवाशांचे मोठे हाल होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे सरकारने वेळीच या बाबीकडे लक्ष देऊन सर्व सामान्य प्रवाशांचे होणारे हाल थांबविण्यासाठी प्रयत्न करावे, असे सर्व सामान्य प्रवाशामधून बोलल्याचे ऐकावयास मिळत आहे.