नांदेड : अलिकडे सर्वच स्तरावर सामाजिक जीवन ढवळून निघाले आहे. जात धर्माचा टोकाचा अभिनिवेश अराजकाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. महात्म्यांच्या नावाचा उपयोग केवळ मतपेटी पुरता उरलेला आहे. समाजकारण, राजकारण, साहित्य, ललित कला इत्यादी प्रांतात मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण झाले आहे. नीती मूल्यांची पायमल्ली होत आहे.या पार्श्वभूमीवर समाज व्यवस्थेमध्ये एक प्रकारची मरगळ आलेली असताना चक्रधर स्वामीच्या नावाने दिलेले प्रदूषण मुक्त पुरस्कार आणि त्यांचे व्यापक विचार समता प्रस्थापित करण्यासाठी सृजनशील साहित्यिकांना ऊर्जा देत राहतील असे प्रतिपादन साहित्यिक देविदास फुलारी यांनी केले.
श्री चक्रधर स्वामी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक बालाजी इबितदार हे होते.
यावेळी गजानन पाटील मुधोळ , मिलिंद सोनकांबळे ,स्वाती कानेगावकर, डॉ. संजय जगताप, देवानंद मुंडे इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी संयोजक अनिल कपाटे शेवाळकर यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते सर्व पुरस्कार प्राप्त लेखकांना मानपत्र सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. संजय जगताप , डॉ. राजेंद्र राऊत , इंद्रजीत पाटील, शिवाजी शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करताना बालाजी इबितदार म्हणाले, पुरस्कार समितीने पुरस्कारासाठी सकस ग्रंथाची पारदर्शीपणे निवड केली आहे. अनिल शेवाळकरांचे हे सेवाभावी कार्य अधोरेखित करावे असे असून यापुढे आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहूयात या कार्यक्रमासाठी अर्चना देव डॉ. राजेंद्र राऊत, इंद्रजीत पाटील, सुरेश साबळे, शिवाजी शिंदे , भूपाळी मिसळ डॉ. किसन माने , दत्ता डांगे , डॉ. विठ्ठल जंबाले सह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती कान्हेगावकर यांनी केले तर आभार विलास कामनेकर यांनी मानले या कार्यक्रमासाठी नांदेड परिसरातील साहित्यिक आणि रसिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.