कंधार (प्रतिनिधी):-
तालुक्यातील मौजे.पेठवडज येथील नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी परगावी जावे लागत होते. त्यात त्यांचा पैसा आणि वेळ जात होता. हि समस्या लक्षात घेवून स्थानिक आमदार डॉ.तुषार राठोड यांनी शासनाकडे पाठपुरावा करून ग्रामीण रूग्णालयाची मागणी केली होती. अखेर त्यास यश आले असून लवकरच सुविधायुक्त ग्रामीण रूग्णालय उभारले जाणार आहे. त्यामुळे पेठवडजकरांना ‘अच्छे दिन’ येणार आहेत.
पेठवडज हे सुमारे दहा हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेले ठिकाण आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना चांगले औषध उपचार व दर्जेदार आरोग्य व्यवस्था मिळाली पाहिजे. तसेच या ठिकाणी वैद्यकीय उपचारांसाठी परिसरातील वाड्या वस्त्यांवरील नागरिक येत असतात. त्यांच्याही आरोग्याची काळजी घेतली गेली पाहिजे. या उदात हेतूने स्थानिक आमदार डॉ.तुषार राठोड यांनी जानेवारी महिन्यात शासनाकडे पाठपुरावा केला होता.
वाढती लोकसंख्या आणि नागरिकांची गरज लक्षात घेऊन पेठवडज येथे ग्रामीण रुग्णालयास होणे गरजेचे होते. भविष्यात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्यास नागरिकांना तत्काळ व चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळतील, असा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया आमदार डॉ.राठोड यांनी दिली.
दरम्यान, पेठवडज येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्यामुळे स्थानिक नागरिक तसेच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून जल्लोष केला.