मुखेड: श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय येवती येथील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या आणि उपक्रमशील शिक्षक संतोष तळेगावे यांनी संपादित केलेल्या ‘रानफुलं फुलविणारे बालकवी : डॉ.सुरेश सावंत’ ह्या ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच येवती (ता. मुखेड) येथे मोठ्या थाटात संपन्न झाले. श्री शिवाजी माध्यमिक विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शिवाजी सुभेदार हे होते.
ज्येष्ठ साहित्यिक शिवाजी आंबुलगेकर यांच्या हस्ते, ख्यातनाम बालसाहित्यकार डॉ. सुरेश सावंत, इसाप प्रकाशनाचे दत्ता डांगे, मुखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे, विजयकुमार चित्तरवाड, मुखेड मायबोली मराठी परिषदेचे अध्यक्ष प्रकाश पवार, ज्ञानोबा जोगदंड, गोविंद कवळे, एकनाथ डुमणे, सुरेश पाटील, मारोती कंतेवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. प्रकाशक दत्ता डांगे यांनी रसग्रहण लिहिलेल्या विद्यार्थ्यांना मानधन व प्रशस्तिपत्र देऊन त्यांचे कौतुक केले. गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे, शिवाजी आंबुलगेकर, डॉ. सुरेश सावंत यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखक संतोष तळेगावे यांनी केले. सूत्रसंचालन प्रणिता मठ्ठमवार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रवींद्र तंगावार, कार्तिक स्वामी, राजाराम गवलवाड, विद्या भोपाळे, नंदकिशोर गव्हाणे, देविदास वडजे, व्यंकट मोरे, ज्ञानेश्वर लंकेवाड, सचिन इंगळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विद्यार्थी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहित्यिक संतोष तळेगावे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.