नांदेड: ( दादाराव आगलावे)
राज्य शासन रोजगार निर्मितीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असते. युवा वर्गाचे शिक्षण पूर्ण झाल्यांनतर वेळेत योग्य मार्गदर्शन आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी भांडवलाची उपलब्ध शासन विविध योजनांच्या माध्यमातून करून देत आहे. रोजगार इच्छुक युवक-युवती आणि रोजगार देणाऱ्या विविध आस्थापना यांच्यामध्ये संवाद आणि समन्वय साधून उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ आणि युवा वर्गाला रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरू केली आहे. रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी युवा-युवतींनी जागरूक असले पाहिजे असे प्रतिपादन शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, माणिक नगरचे प्राचार्य भगवानराव पवळे यांनी केले.कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि ‘मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष’ यांच्यामार्फत संयुक्तपणे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ अंतर्गत युवक युतीच्या मुलाखत प्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य भगवानराव पवळे पुढे म्हणाले की, या योजनेत बारावी पास, आय. टी. आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या युवकांना प्रशिक्षण अंती अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच त्यांना विद्यावेतन देखील मिळणार आहे. भारताला जगात अग्रेसर बनविण्यासाठी कौशल्य विकासाच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. केंद्र शासनाने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पातही आगामी पाच वर्षात ४.१ कोटीहून अधिक युवकांना रोजगार आणि कौशल्यविकासाच्या संधी देशात निर्माण करण्यासाठी दोन लाख कोटी रूपयांची तरतूद केली गेली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने प्रसिद्ध केलेल्या भारताच्या रोजगार २०२४ अहवालानुसार, भारत हा २०२६ पर्यंत सर्वाधिक तरुणांचा देश असेल. ग्रामीण व शहरी विकासातील दरी दूर करून प्रत्येकाला देण्यासाठी शासन तत्पर असून देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे.
सदरील संधीचा युवकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेणे आवश्यक आहे. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून अनेक निर्णय गेल्या दोन वर्षात घेण्यात आले आहेत. कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी मिळून प्रत्येक हाताला काम देणारी व प्रत्येक कुटुंबाचा विकास हाच ध्यास पूर्णत्वास नेणारी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ ही महाराष्ट्र राज्याच्या विकासात योगदान देऊन आमुलाग्र बदल घडवेल आणि कुशल व रोजगारक्षम महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरेल अशी भावना प्राचार्य पवळे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कळशे यांनी केले तर आभार पर्यवेक्षक सत्यवान पारेकर यांनी मानले. कार्यक्रमास उप मुख्याध्यापक सदानंद नळगे, पर्यवेक्षक सत्यवान पारेकर, अभिजीत मामडे, पंढरीनाथ काळे, सचिन गायकवाड पाटील, सचिन फुके, पवळे एस. व्ही., गायकवाड आर.सी.,भांगे एस.एन.,सौ. तीर्थे मॅडम, क्रीडा शिक्षक सुशील कुरुडे
यांच्यासह शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माणिक नगर येथे संपन्न झालेल्या मुलाखततिच्या नियोजनाबद्दल अनेकांनी कौतुक केले.