अंदमान च्या बेटावरून* (भाग ४) *लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर

 

—————————————————————-
अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सिद्धहस्त लेखन शैलीतून रोमांचकारी असणारा अंदमान टूर चा रोज चा वृत्तांत याच ठिकाणी दररोज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कृपया वाचकांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती. – संपादक
—————————————————————-

आज आम्हाला दोन बेटांना भेटी द्यायच्या असल्यामुळे दुपारचे जेवण उशिरा मिळेल अशी सूचना संदीप मैंद यांनी दिली होती.त्यामुळे सकाळी भरपेट नाश्ता करून आम्ही एसी टेम्पो ट्रॅव्हल्स ने निघालो.माउंट हॅरिएट धक्क्यावर पोंहचण्यासाठी अर्धा तास लागला.येथून पुढचा प्रवास स्पीड बोटीने करायचा होता.दहा दहा चे सहा ग्रुप केले.प्रत्येक स्पीड बोटी चे नाव वेगवेगळे होते.मी ज्या मध्ये बसलो तिचे नाव होते व्हाईट प्यारोट.लक्षात रहावे या साठी मी त्याचे भाषांतर केले सफेद तोता.हेच नाव दिवस भर कायम झाले.स्पीड बोटीवरून आसपासचे दृश्य पोर्ट्रेट सारखे अप्रतिम दिसत होते.विधात्याची ही कला निर्मिती मनाला आल्हादायक करत होती. फोटोसेशन करत प्रवास सुरू होता.मनाला तरुण करणारी निसर्गाची निर्मिती पाहून इथे येणाचे सार्थक झाल्याचा आनंद मिळाला.

रॉस आयलंड ला पंधरा मिनिटात पोंहचलो. रॉस हे ब्रिटिश अधिकाऱ्याचे नाव.मोदी सरकार ने एका फटक्यात त्याचे नाव बदलले ते म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप. या बेटावर फेरफटका मारण्यासाठी बॅटरी कार ची व्यवस्था आहे. पायी सुद्धा जाता येते. पण वेळेचे बंधन असल्यामुळे आम्ही बॅटरी कारचा पर्याय निवडला. प्रत्येकी ८० रुपये देऊन आठ जण एका बॅटरी कार मध्ये बसलो. बॅटरी कारचा चालक गाईडची देखील भूमिका निभावत होता.आपल्या चलनातील जुन्या २० रूपयाच्या नोटेवर जे दृश्य आहे ते प्रत्यक्ष बघण्याचा आणि त्याच ठिकाणा वरुन ते ऐतिहासिक दृश्य टिपण्याचा योग दुर्मिळच.अतिशय सुंदर असे तेथील गार्डन आणि फुलांचे रंग पाहून तर मनाला तरतरी येते. आपल्याकडील फुले तर रोज पाहतो पण इथे फुलांचे नंदनवन भरल्या सारखे भासते. निसर्गाचे आभार मानत एका तासाच्या भेटीत जितके जास्त डोळ्यात आणि मोबाईलच्या कॅमेरात साठविता येईल तितके साठवित होतो.एकेकाळी ब्रिटीश सत्तेचे प्रमुख केंद्र असलेले हे बेट. या सर्व समुहाची ही राजधानी असल्यामुळे सर्व राज्यकारभार येथूनच चालायचा. काळाचा महिमा अगाध असतो. ब्रिटिश साम्राज्यात सूर्य कधी मावळत नाही असे म्हणायचे. पण तीच ब्रिटिशांची राजधानी आता जुन्या काळातील अवशेष बनुन राहिली होती. येथील पोस्ट ऑफिस, सैनिकांचे ब्यारेक, अधिकाऱ्यांचे बंगले, चर्च, धान्याचा ची कोठारे या सर्व जुन्या इमारती जवळजवळ मोडकळीस आलेल्या आहेत. ‘स्मृतिका’ नावाच्या एका छोट्या संग्रहालयात या बेटांशी संबंधित ब्रिटिशांची छायाचित्रे आणि इतर पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत.

अंदमानला आल्यानंतर एका व्यक्तीला भेटण्याची खूप उत्सुकता होती. ती एक द्वीपशिखा इथेच तिच्या कुटुंबासह राहते. आणि तिच्या कुटुंबात कोण कोण आहेत ठाऊक आहे का? हरणं, मोर, खारी, चिमण्या आणि बरेच कुणी कुणी.
अनुराधा राव असं त्या द्वीपशिखेचं नाव. अनुराधा राव इथे आलेल्या पर्यटकांना प्रायव्हेट गाईड म्हणून मार्गदर्शन करतात. संदीपजी ने तिला आवर्जून बोलावले.अनुराधा राव ने ह्या बेटाची माहिती सांगितली .इतिहास समजावून सांगितला. इथेच राहण्याच्या मोठ्या झालेल्या अनुराधांनी प्राण्यांनाच आपले कुटुंब मानले.शिकारीच्या विरोधात तिने आपले जीवन वाहून घेतले. त्यामुळे सर्व प्राणी तिच्या आवाजाने एकत्र येतात .तिने प्रत्येक प्राण्याचे नामकरण केलेले आहे. ज्याचे नाव घेतले तो लगेच तिच्यासमोर येतो. आम्ही या प्राण्यांना हात लावला. त्यांना प्रेमाने खाऊ घातले,कुरवाळे.प्राण्यांच्या सोबतीने आयर्लंड बघण्याचा अनोखा आनंद दुर्मिळ असून देखील आम्हाला घेता आला. तिच्या प्राणी प्रेमाला सहकार्य मिळावे म्हणून पाच हजार रुपयाची अल्पशी मदत तिला केली. एक तासाचा टाईम बघता बघता संपला. लाईट हाऊस व इतर ठिकाणी फोटो काढून आम्ही इथल्या अविस्मरणीय स्मृती जतन केल्या.

तिथून पुढे आम्ही परत स्पीड बोट ने नॉर्थ बे बीच ला गेलो. या बीचचे देखील नाव भारत सरकारने बदललेले आहे. वॉटर स्पोर्ट साठी हे बेट प्रसिद्ध आहे. समुद्राच्या पाण्याखालील स्कुबा डायव्हिंग आणि सी वॉक ज्यांनी केला त्यांना दुसऱ्या जगात जावून आल्याचा अनुभव आला. तो शब्दात व्यक्त करणे कठीणच. अद्भुत आणि पाण्यातील जीवसृष्टी प्रत्यक्ष डोळ्याने पाहता येत होती. हा सारा अनुभव फारच सुंदर व न विसरता येणारा होता.समुद्र तळातील विविध जीवन आणि जीव सृष्टीला प्रत्यक्ष स्पर्श करत डोळ्याचे पारणे फेडणारा एक विलक्षण अनुभव आम्ही घेतला. काहींनी पॅराग्लाइडिंग, पॅरा सायकलिंग, स्पीड बोट सोबत मस्त मजा केली. ज्यांचे वय ६० पेक्षा अधिक होते त्यांच्यासाठी एक विशेष ऍक्टिव्हिटी होती ती म्हणजे सबमरीन सफारी. एक तासाच्या या सफारीमध्ये बोटीचा अर्धा भाग समुद्राच्या पाण्यात असतो आणि वरचा भाग समुद्राच्या वर. जिथे पाणी उथळ असते आणि समुद्रातील जीवसृष्टी मोठ्या प्रमाणात आढळते त्या ठिकाणी आम्हाला नेण्यात आले. रंगी बिरंगी मासे व विविध आकाराचे आकर्षक प्रवाळ बघताना खूप मजा आली. त्यातच आम्हाला ऑक्टोपस दिसल्यामुळे आनंद द्विगुणीत झाला. परतीच्या प्रवासात डेकवर म्युझिक सिस्टीम सुरू होती. मी सगळ्यांना डान्स करण्याचा आग्रह केला. आमच्या सोबत असलेली गाईड अपर्णा हिने इतका जबरदस्त डान्स केला की, सर्वजण खुश झाले. वय विसरून सर्वांनी डान्सचा आनंद लुटला. समुद्राच्या लाटांवर गाण्याच्या तालात नाचत असताना सर्वांना आपले बालपण आठवले. दुपारी अडीचच्या सुमारास आम्ही हॉटेलला परतलो. भरपूर एक्झर्शन झाले असल्यामुळे कडाडून भूक लागली होती. सर्वांनी स्वादिष्ट भोजनावर यथेच्छ ताव मारला.

आजची संध्याकाळ काही खास होती. सर्वांना चौथ्या मजल्यावर टेरेसवर बोलावून रंगारंग कार्यक्रम घेतला. प्रत्येकाने आपल्या अंगात असलेले कलागुण दाखविले. यावेळी प्रत्येक टुरिस्ट वर मी केलेले विनोद सर्वांना खूप आवडले. एक तासासाठी ठेवलेला हा कार्यक्रम अडीच तासानंतर नाईलाजस्त बंद करावा लागला. आमच्यासोबत टूरमध्ये आलेल्या मंजू चौधरी यांचा आज वाढदिवस होता. त्यांच्या माघारी आम्ही केक आणला व तो त्यांच्या हस्ते कापून वाढदिवस साजरा केला. त्यामुळे त्या एकदम खुश झाल्या. रात्रीच्या जेवणात नॉनव्हेज वाल्यांसाठी करण्यात आलेली फिश फ्राय अतिशय चविष्ट होती. शाकाहारी लोकांचे जेवण देखील सर्वांना आवडले. उद्याच्या सूचना देऊन आजची आमची मैफल संपली. (क्रमशः)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *