लोहा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा फेरविचार करावा  ! प्रा.अंजलीताई आंबेडकरांकडे शिष्टमंडळाने केली मागणी

कंधार दि. ७ (ता. प्र.)

वंचित बहुजन आघाडीकडून काही दिवसापूर्वीच लोहा विधानसभा मतदारसंघासाठी शिवा नरंगले यांची उमेदवारी जाहीर केली आहे.त्यामुळे या मतदारसंघातील समस्त ओबीसी, बौद्ध समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली असून शिवा नरंगले यांच्या उमेदवारी बद्दल पक्षश्रेष्ठने फेरविचार करावा.अशी मागणी बौद्ध,ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाने वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा.अंजलीताई आंबेडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

वंचितच्या राष्ट्रीय नेत्या प्रा.अंजलीताई आंबेडकर या दोन दिवसीय नांदेड दौऱ्यावर आल्या असताना त्यांची अनसुया गार्डन,नांदेड येथे भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नांदेड जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक एडवोकेट सर्वजीत बनसोडे,नांदेड (दक्षिण) जिल्ह्याचे महासचिव श्याम कांबळे,नांदेड उत्तरचे माजी जिल्हाध्यक्ष इंजि.प्रशांत इंगोले,महाराष्ट्र प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे,सुनील सोनसोळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.सदरील निवेदनात असे नमूद केले की,लोहा- कंधार विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीने दिलेला उमेदवार शिवा नरंगले यांच्या बदल मतदारसंघात तीव्र नाराजी आहे.

मतदारसंघात त्यांनी कुठलेही बुथ बांधणी केलेली नाही.बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांस गेल्या ५ वर्षांत हिन दर्जाची वागणुक त्यांच्याकडून मिळालेली आहे.अशा प्रकारचे अनेक कारणे आहेत.त्यापैकी प्रमुख कारण वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पद त्यांच्याकडे असताना सुध्दा झालेल्या लोकसभा निवडणुकीत कुठल्याही प्रकारची प्रचार यंत्रणा त्यांनी राबविलेली नाही.त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अपेक्षित मतदारांचा प्रतिसाद मिळालेला नाही.त्यांच्या गावामध्ये सुध्दा लिंगायत समाजाने मतदान केले नाही.लिंगायत समाज त्यांच्या पाठीशी आजही उभा नाही.काल झालेल्या महापुरषांच्या अभिवादन रॉलीमध्ये लिंगायत समाजाचे पाचही कार्यकर्ते उपस्थित नव्हते.त्यांच्या चरण स्पर्श यात्रेत सुध्दा लिंगायत समाजाच्या लोकांचे प्रमाण शुन्य टक्के होते.एकंदरीत त्यांचा समाज त्यांच्या पाठीशी नाही.तसेच बौद्ध व ओबीसी समाजामध्ये तीव्र नाराजी आहे.त्यांमुळे पक्षाचे हित लक्ष्यात घेता त्यांच्या उमेदवारी बाबत फेरविचार व्हावा.

याशिवाय माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील सुरनर यांनी श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दहा हजार ओबीसी समाज बांधवांचा मेळावा घेतला.तसेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या ओबीसी आरक्षण बचाव रॅलीपूर्वी पक्षाकडे दहा हजार रुपये भरून वंचित बहुजन आघाडीचे सभासद झाले आहेत.त्यांच्या पाठीमागे धनगर,हटकर,बौद्ध,मातंग,बंजारा आदींसह ओबीसी समाज प्रामुख्याने सोबत आहे.त्यासाठी चंद्रसेन पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी.हि बौध्द समाजाची अग्रही मागणी आहे.करीता आपण लोहा-कंधार मतदारसंघासाठी पक्षाची एक कमिटी गठीत करून खरी शहानिशा करावी.असे निवेदनात नमूद केले आहे.

या निवेदनावर माळाकोळीचे उपसरपंच अरुण सोनटक्के, अंबुलगा गावचे सरपंच प्रतिनिधी माधव मुसळे,विशाल वाघमारे, अमोल वाघमारे,बबन जोंधळे,प्रेमानंद गायकवाड,विहान कदम, सुमेध पवार,संजय राठोड,विक्की कंधारकर,सतीश ढवळे, भीमराव तिगोटे,गौतम सोनकांबळे आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

यावेळी प्रा.अंजलीताई आंबेडकर यांनी उपस्थित शिष्टमंडळास सांगितले की,आपल्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल.या विषयावर ॲड.बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीच्या कोर कमिटीशीं सविस्तर चर्चा करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *