नांदेड ः जिल्ह्यातील रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील जिल्हा रूग्णालयातील खाटांची 300 वरून क्षमता वाढवावी व ती 500 करावी अशी आग्रही मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी शासनाकडे केली होती. त्यांच्या या प्रयत्नास अखेर यश मिळाले असून जिल्हा रूग्णालयास आता 500 खाटांची मंजूरी मिळाली आहे.
नांदेड येथे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय कार्यान्वित आहे. या रूग्णालयात क्षमतेपेक्षा अधिक रूग्णांवर उपचार नेहमीच सुरू असतात. तसेच नांदेड शहरात श्री गुरूगोविंदसिंघजी जिल्हा सामान्य रूग्णालय आहे. या रूग्णालयात 300 खाटांची व्यवस्था आहे. या दोन्हीही रूग्णालयात येणारी रूग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हा सामान्य रूग्णालयाची खाटांची क्षमता वाढवून ती 500 करावी, यासाठी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांचा शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा होता. त्यांच्या पाठपुराव्याला शासनानी आज हिरवा कंदील दाखवला. तसा शासनादेश निर्गमित झाला असून आता नांदेडचे जिल्हा सामान्य रूग्णालय 500 खाटांचे होणार आहे.
खा. अशोकराव चव्हाण पालकमंत्री असताना कोविडच्या काळात त्यांनी जिल्हा रूग्णालयासाठी भव्य इमारतीची उभारणी केली होती. या इमारतीमध्ये सुजज्य यंत्रण सामुग्री बसविण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्याचे क्षेत्र, व्याप्ती व लोकसंख्या लक्षात घेता. जिल्हा रूग्णालयातील खाटांची क्षमता वाढविणे गरजेचे होते. त्यासोबतच नांदेड जिल्ह्यासह शेजारील परभणी, हिंगोली व वाशिम जिल्ह्यातून अनेक रूग्ण उपचारासाठी नांदेडमध्ये नेहमीच येत असतात. त्यामुळे रूग्ण व्यवस्थेवर मोठा ताण पडतो. आता या रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 500 खाटांचे रूग्णालय होणार असल्यामुळे गरीबांसाठी उपचार सुलभ होणार आहे. माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांचे नांदेड जिल्ह्यावर विकासासाठी असलेले लक्ष याचाच परिपाठ म्हणून जिल्हा रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 500 खाटांचे रूग्णालयाचा कार्यान्वित होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्हीही उपमुख्यमंत्री यांच्या उद्याच्या नांदेड दौऱ्यापूर्वी खा. अशोकराव चव्हाण यांच्यामुळे जिल्ह्याला ही मोठी गिफ्ट असल्याचे मानल्या जाते.