अॅड. श्रीजया चव्हाण यांच्या संकल्पनेतून ‘युवा उमेद’चा शुभारंभ* *रोजगार व स्वयंरोजगारासाठी मदत करणारा अभिनव उपक्रम*

 

नांदेड, दि. ९ ऑक्टोबर २०२४:

रोजगार व स्वयंरोजगाराची संधी शोधणाऱ्या इच्छूक मुला-मुलींना माहिती, मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी अॅड. श्रीजया चव्हाण यांनी ‘युवा उमेद’ नामक एक व्यासपीठ सुरु केले असून, या अभिनव उपक्रमाचा आज अर्धापूर येथे शुभारंभ करण्यात आला. सेवानिवृत्त कर्नल रमेश पुणेकर यांच्या व्याख्यानाने या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला अॅड. श्रीजया चव्हाण, सेवानिवृत्त कर्नल रमेश पुणेकर, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण, अॅड. सुभाष कल्याणकर उपस्थित होते. ‘युवा उमेद’ उपक्रमाच्या उद्घाटनीय कार्यक्रमात रमेश पुणेकर यांनी भारतीय सैन्य दलातील विविध संधींविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

तत्पूर्वी अॅड. श्रीजया चव्हाण यांनी ‘युवा उमेद’ ही संकल्पना उलगडून सांगितली. ‘मेहनत तुमची, मदत आमची’ हे ब्रीदवाक्य असलेला या उपक्रमांतर्गत दरवर्षी व वर्षभर अनेक कार्यक्रम आयोजित केले जातील. भोकर, अर्धापूर व मुदखेड परिसरात एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी दरवर्षी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, लघूउद्योगांमार्फत स्वयंरोजगार, शासकीय योजनांची माहिती, व्यक्तीमत्व विकास प्रशिक्षण, रोजगाराची नवी क्षेत्रे आदी विषयांवर वर्षभर अनेक ऑनलाईन-ऑफलाईन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. याशिवाय रोजगाराच्या नव्या संधींबाबत माहिती देण्यासाठी सोशल मीडियाच्या मदतीने एक यंत्रणा देखील उभारणार असल्याचे भाजपच्या भोकर विधानसभा प्रमुख अॅड. श्रीजया चव्हाण यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला संबोधित करताना खा. अशोकराव चव्हाण यांनी उपस्थित तरुणाईच्या हृदयाला हात घातला. ते म्हणाले की, आमच्या तरुणांकडे कौशल्य आहे, मेहनत करण्याची तयारी आहे. तुम्ही मेहनत करा, तुमच्या मेहनतीला पाठबळ देण्यासाठी मी नेहमी उभा असेल. श्रीजया चव्हाण हिने तरुणांच्या मदतीसाठी एक चांगले व्यासपीठ तयार केले आहे. ती केवळ माझी मुलगी आहे म्हणून नव्हे तर राजकारणात नवीन असतानाही एवढा व्यापक विचार करून काम करते, याचा मला आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर कार्यक्रमाचे वक्ते रमेश पुणेकर यांनी आपल्या व्याख्यानातून कार्यक्रमाला उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांना देशसेवेसाठी प्रेरित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र चव्हाण यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *