कंधार/प्रतिनिधी ( दिगांबर वाघमारे )
तालुक्यातील फुलवळ येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला जेष्ठ स्वतंत्र सेनानी, शिक्षणमहर्षी माजी खासदार व माजी आमदार स्व . डॉ. भाई केशवराव धोंडगे यांचे नाव देण्यात आले. या बाबतची घोषणा महाराष्ट्र शासनाच्यावतीने नुकतीच करण्यात आली. शासनाकडून भाईंच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेण्यात आल्याने तालुक्यासह जिल्ह्यातील जनतेत आनंद व्यक्त केला जात आहे.
भाई धोंडगे यांनी आपले संपूर्ण आयुष्य दलीत, पददलित, अपेक्षित, नाहिरेवाल्यांसाठी वेचले. विधानसभेत त्यांनी सतत ३० वर्ष कंधारचे नेतृत्व केले. नांदेडचे खासदार म्हणूनही ते निवडून आले होते. अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी आयुष्यभर शासनाच्या धोरणावर आसूड ओढले. हैद्राबाद संस्थान खालसा झाल्यावर त्यांनी कंधार सारख्या डोंगर कपारितल्या तालुक्यात शैक्षणिक संस्थेची मुहूर्तमेढ रोवली.
ग्रामीण भागातील मुले शिकली पाहिजेत हा उद्दात हेतू डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी कंधार शहर, तालुक्यातील वाडी तांड्यासह लोहा, सोनखेड, नांदेड, औरंगाबाद (छ. संभाजी नगर) येथे शाळा, महाविद्यालयांची स्थापना केली. ग्रामीण भागातील मुलांना कायद्याचे ज्ञान मिळावे यासाठी त्यांनी शासन दरबारी भांडून कंधार मध्ये विधी महाविद्यालयाची स्थापना केली. त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन शासनाने फुलवळ येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला त्यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.