प्रतिनिधी, कंधार
——————-
तालुक्यात घोडज-जांभुळवाडी-आनंदवाडी-बोरी खु या रस्त्याचे काम करण्यात येत आहे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व बोगस करण्यात येत आहे. या कामाची चौकशी करून संबंधित गुत्तेदारावर कारवाई करण्याची मागणी बोरी खु गावच्या सरपंच सौ.सुनिता रामकृष्ण पंदनवड यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना नांदेडचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत घोडज- जांभुळवाडी- आनंदवाडी- बोरी खु या रस्त्याचे काम करण्यात येत आहे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व बोगस करण्यात येत आहे. हे काम अंदाजानुसार करण्यात येत नाही. सदरील डांबर रस्ता न उकरता काम सुरू करण्यात आले आहे. रस्ता लेवल करण्यात आलेला नाही. तसेच रस्त्याचा चड कमी करण्यात आलेला नाही. रस्त्याच्या बाजुने साईड पट्टीचे खोदकाम व मुरुड न टाकता काळ्या मातीवर गिट्टी आतरली आहे.
त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यापूर्वीच रस्ता उखडण्याची दाट शक्यता आहे. या रस्त्यावर एकूण ७ पूल असताना केवळ ५ पूल करण्यात आले आहेत. पूलाच्या खाली १५ सेमी बेड न टाकता मुरुड टाकण्यात आलेला आहे. पूलाची लांबी ८.५० मी असताना कमी करण्यात आली आहे. पूलामध्ये एनपी ३ आरसीसी पाईप न वापरता साधे पाईप वापरण्यात आले आहेत.
या कामाची तात्काळ चौकशी करून संबंधित गुत्तेदारावर कारवाई करण्याची मागणी बोरी खु गावच्या सरपंच सौ.सुनिता रामकृष्ण पंदनवड यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना नांदेडचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना दिल्या आहेत.
रस्त्यासाठी ग्रामपंचायतीने घेतला ठराव
बोरी खु ग्रामपंचायतीने २८ आॅगस्ट २०२४ रोजी सरपंच सौ.सुनिता पंदनवड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेतली. या ग्रामसभेत घोडज ते बोरी खु या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट होत असल्याबाबतचा ठराव बहुमताने मंजूर केला आहे. तसेच या रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे करण्याची मागणी संबंधित विभागाला केली आहे.