मुंबई_दि. 17
वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत कोविड-19 रुग्णांची निकड लक्षात घेऊन संस्थानिहाय आणि विषयनिहाय बंधपत्रित उमेदवारांना सेवेसाठी नियुक्ती देण्यात येणार असून सध्या 1 हजार 204 बंधपत्रित उमेदवार यामुळे उपलब्ध होणार आहेत. काही विषयांमधील उमेदवार अधिक असून विषयनिहाय जागा कमी उपलब्ध आहेत अशा उमेदवारांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या वरिष्ठ निवासी किंवा वैद्यकीय अधिकारी पदावर नियुक्ती देऊन त्यांच्या सेवा उपयोगात आणल्या जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.
श्री. देशमुख यांनी सांगितले की, राज्यातील कोविड-19 रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन अतिविशेषोपचार व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बंधपत्रित सेवेसाठी नियुक्ती देण्यात येणार आहे. सध्या राज्यातील कोविड-19 परिस्थिती पाहता, या विद्यार्थ्यांना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेल्या मागणीनुसार किंवा जिल्ह्यातील कोविड-19 संख्या लक्षात घेऊन बंधपत्रित सेवेकरिता नियुक्ती देण्यात येणार आहे. सध्या राज्यातील कोविड-19 चे रुग्ण वाढत असल्याने राज्यातील विविध जिल्ह्यातील रुग्णांची संख्या व तेथील रुग्णोपचाराची परिस्थिती विचारात घेऊन डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल्स (Dedicated Covid Hospitals) मध्ये अतिरिक्त आणि विशषज्ञ डॉक्टरांची आवश्यकता आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत अतिविशेषोपचार वैद्यकीय अभ्यासक्रम आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षेस 1 हजार 648 विद्यार्थी बसले होते. उन्हाळी 2020 सत्राच्या परीक्षा नुकत्याच झाल्या असून परीक्षेचा निकाल लवकरच अपेक्षित आहे. विद्यापीठाने या परीक्षांचा निकाल घोषित केल्यावर वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडून शासकीय आणि महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातून पदव्युत्तर किंवा अतिविशेषोपचार अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बंधपत्रित सेवा देण्यात येते.
पदव्युत्तर तसेच अतिविशेषोपचार अभ्यासक्रमाच्या परीक्षेस 1 हजार 648 विद्यार्थी बसले आहेत. तर विभाग निहाय उपलब्ध होणाऱ्या बंधपत्रित विद्यार्थ्यांची संख्या 1 हजार 204 असणार आहे. तर वरिष्ठ निवासी तसेच वैद्यकीय अधिकारी पदावर बंधपत्रित विद्यार्थ्यांची संख्या 444 असणार आहे. बंधपत्रित विद्यार्थ्यांना द्यावयाच्या नियुक्तीबाबत शासन निर्णय 4 एप्रिल 2012 आणि शासन शुद्धीपत्रक 4 ऑगस्ट 2012 यानुसार कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. मात्र कोविड-19 रुग्णांची वाढती संख्या पाहून या कार्यपद्धतीतून 31 मार्च 2021 पर्यंत सूट देण्यात यावी असे 14 सप्टेंबर 2020 रोजी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक यांना कळविण्यात आले आहे. शासकीय/महापालिका वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालये, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालये येथील मागणी आणि त्यानुषंगाने उपलब्धतेनसुार बंधपत्रित विद्यार्थ्यांच्या सेवा देण्यात येणार आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून 385, बृहन्मुंबई महापालिका वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून 178, महापालिका रुग्णांलयातील विशेषज्ञ अधिकारी म्हणून 282, तर आरोग्य सेवा अंतर्गत रुग्णालये/ डीसीएच/डीसीएचसी येथे 359 असे एकूण 1 हजार 204 बंधपत्रित उमेदवारांच्या सेवा उपलब्ध होणार आहेत. याशिवाय वरिष्ठ निवासी पदासाठी 444 विशेषज्ञ यांची सेवा उपलब्ध होणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी नमूद केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, बृहन्मुंबई महानगरपालिकेची वैद्यकीय महाविद्यालये, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत रुग्णालये/डीसीएच/डीसीएचसी येथे बंधपत्रित सेवा वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक यांच्यामार्फत करण्यात येईल. तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत येणारी रुग्णालये/डीसीएच/डीसीएचसी याकरिता आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांकरिता उपलब्ध करुन द्यावयाच्या बंधपत्रित उमेदवारांची यादी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक यांच्यामार्फत सार्वजनिक आरोग्य विभाग, आरोग्य सेवा संचालक आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेला देण्यात येणार आहे. बंधपित्रित उमेदवारांना ज्या आस्थापनेमार्फत नियुक्ती देण्यात येईल त्या आस्थापनेमार्फत संबंधितांचे मानधन/वेतन नियमानुसार करण्यात यावे. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत डीसीएच/डीसीएचसी येथे नियुक्ती देण्यात येणाऱ्या उमेदवारांना 1 लाख रुपये प्रति महिना इतके एकत्रित वेतन देण्यात यावे. तसेच कोविड रुग्णांच्या उपचाराकरिता ज्या उमेदवारांना बंधपत्रित सेवेवर नियुक्ती देण्यात येईल, त्यांच्या निवासाची व्यवस्था ही संबंधित आस्थापानेमार्फत करण्यात यावी असेही श्री.देशमुख यांनी सांगितले.