(आज दि.02 जानेवारी 2025 रोजी प्राचार्य गंगाधररावजी गोविंदरावजी राठोड साहेब यांचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस.या निमीत्ताने त्यांच्या कार्य कर्तुत्वावर टाकलेला हा शब्द प्रकाश.)
प्राचीन काळापासून माणूस हा विकासाचा भोक्ता राहिलेला आहे. त्याला सतत प्रश्न पडत राहिले व त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तो सतत प्रयत्नशील राहिला आहे. त्यातून त्याला प्रश्नांची उत्तरे मिळत गेली व मानवाची उत्तरोत्तर प्रगती होत गेली. निसर्गाने माणसाला भरभरून दिले आहे व आजही तो देतो आहे.मानवाचा निसर्गाशी असलेल्या संबंधातून अनेक बाबी मानवाने निसर्गाच्या स्विकारल्या. त्या पैकीच नामकरण एक आहे.आपण ज्या पाण्याला जीवन म्हणतो ते देण्याचं काम अव्याहतपणे जी करते तीला आपण गंगा असे म्हणतो.गंगेला आपल्या देशात मातेची ही उपमा दिली आहे.जिथे जिथे गंगा पोहोचली तिथे तिथे विकास पोहोचला असे आपण पाहतो. म्हणूनच आपल्याकडे जास्तीचा विकास व अव्याहत विकास घडू लागला की आपण म्हणतो विकास गंगा घरी आली.अस्या गंगेला आपल्या डोक्यावर धारण करण्याचे काम शंभू महादेवांनाही केले.त्यामुळे त्यांचे नाव गंगाधर ही पडले आहे.आपल्याकडे देवाच्या नावावरुन पुर्वी नावे ठेवली जात असत.आता आपण सामान्य माणसे गंगेला डोक्यावर तर धरु शकत नाहीत पण गंगेचे जिथे जिथे गमन होते तीथे तीथे विकास हा गुणधर्म मात्र पाळुन आपले गंगाधर हे नाव सार्थ करू शकतोत.असेच गंगाधर हे नांव धारण करून राठोड साहेबांनी शिक्षण,राजकारण व सहकाराच्या माध्यमातून विकासाची गंगा सर्वसामान्या पर्यंत पोहोचविण्याचे काम करुन आपले नाव सार्थ केल्याचे लक्षात येते.
त्यांचा जन्म 02जानेवारी 1976 रोजी वसंतनगर ता.मुखेड येथे पिता गोविंदराव व माता चक्रावतीबाई राठोड यांच्या पोटी एका तांड्यावर झाला. घरात लहानपणापासूनच काका (चुलते) माजी आमदार कर्मवीर किशनराव राठोड व वडील गोविंदराव राठोड यांचा राजकीय,सामाजिक, सांस्कृतिक,सहकार व शैक्षणिक क्षेत्रांचा वारसा लाभला.राठोड परिवाराची समाजप्रतीची आस्थेची भावना त्यांच्या समोर होती.याच काळात त्यांनी मुखेड व औरंगाबाद येथून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले तदनंतर वसंतनगर ता.मुखेड या आपल्या शैक्षणिक संस्थेतून बी.एस्सी. (गणित) या पदवीपर्यंत शिक्षण घेऊन नांदेड येथून बी.एड.ही पदवी प्राप्त केली व आज ते सेवादास माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य म्हणुन कार्यरत आहेत. त्यांना हळूहळू राजकारणाचे बाळकडू घरातून मिळत जात होते. काका, वडील, आई हे सर्व जन नांदेड व मुखेडच्या लोकसभा, विधानसभा व नगरपरिषद तथा अन्य निवडणुकांत सक्रिय असलेले पाहावयास मिळायचे.प्रसंगी या कामी त्यांनाही प्रत्यक्ष सहभाग घ्यावा लागत गेला.सर्वप्रथम त्यांनी आपल्या परिवारातील काका, वडील व आई यांच्या सहकार्याने सन 2002ते 2007 नंतर 2007 ते ते 2012 व 2012 ते 2022 पर्यंत मुखेड नगर परिषदेचे नगरसेवक म्हणून तीन वेळा कार्य केले आहे.तसेच 2007 ते 2010 या काळात त्यांना मुखेडच्या मायबाप जनतेने नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आहे.
नगर परिषदेत नगराध्यक्ष व नगरसेवक म्हणून काम करताना सर्वांना विश्वासात घेऊन अत्यंत उत्कृष्ट कार्य त्यांनी पार पाडले आहे.आज जी नगरपरिषदेची भव्यदिव्य इमारत उभी दिसते. त्या नगर परिषदेच्या जागेच्या खरेदी पासून ते इमारत उभी करेपर्यंत त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.याबरोबरच शहरात पक्के रस्ते,वीज, पाणी,आरोग्य व्यवस्था केली. कायमस्वरूपी शूध्द पाण्याची व्यवस्था नळयोजनेद्वारे करून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.सांडपाण्याची व्यवस्था उत्कृष्टपणे केली आहे.सर्व धर्मीयांना स्मशानभूमीसाठी संरक्षण भिंती बांधुन दिल्या आहेत.नगरपरिषद मुखेड, शिवभक्त व वि.जा.से.समिती या संस्थेच्या सहकार्याने मुखेड येथे छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी सहकार्य केले आहे.
ते राजकारणाबरोबर शैक्षणिक क्षेत्रात ही भरीव योगदान देत आहेत. महाराष्ट्रातील नामांकित विमुक्त जाती सेवा समिती वसंतनगर ता.मुखेड जी.नांदेड या नामांकित संस्थेचे कोषाध्यक्ष म्हणून त्यांनी 2012पासून 2014 पर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने धुरा सांभाळली आहे.आपले वडील कै.आ.गोविंदरावजी राठोड साहेबांच्या अवेळी जाण्याने रीक्त झालेली सचिव पदाची धुरा तितक्याच समर्थपणे 2014 पासून आजतागायत सांभाळत असल्याचे पहावयास मिळते.संस्थेचे सचिव म्हणून काम करताना बालवाडी पासून ते पदव्युत्तर पर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था आपल्या संस्थेच्या माध्यमातून देवुन अनेक विद्यार्थ्यांना ते घडवत आहेत.या शैक्षणिक संस्थेतील काही शाखा आश्रम शाळेच्या रूपात काम करतात. तर काही मुलींच्या शाळा व अन्य काही हायस्कूल,उच्च माध्यमिक विद्यालये वरिष्ठ महाविद्यालय आहेत. ह्या सर्व शाखा त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतात.महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील एन.टी.साठीचे एकमेव असलेले विद्यानिकेतन (पब्लिक स्कूल) ही कमळेवाडी ता.मुखेड येथे 1996 पासून चालवले जाते. या विद्यानिकेतनचा अतिरीक्त पदभार स्विकारून प्रथम प्राचार्य होण्याचा सन्मान मला मिळाल्याचा मनस्वी आनंद होतो.या विद्यानिकेतनची अत्यंत देखणी व सर्व सोयींनी युक्त अशी इमारत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली उभारली जाते आहे.तिचे काम अंतीम टप्प्यात आहे.याबरोबरच मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून फुलसिंग नाईक वसतिगृह,याद्वारे ते अनेक विद्यार्थ्यांची भोजन व अन्य सुविधासह शिक्षणाचे काम करताना दिसतात.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संस्थेत बदल घडविण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो.जसे की वस्तीगृहात स्वयंपाक बनविण्यासाठीची मशीन उपलब्ध करुन त्यांनी मानवी श्रम व वेळ वाचवला आहे.तसेच विविध संस्थेत संगणकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञानात पारंगत करणे या साठी ही ते प्रयत्न करताना दिसतात. अभियंत्याकडे असावी अशी दृष्टी इमारती उभ्या करण्यापासून विविध आराखडे निर्माण करताना त्यांच्याकडे दिसते. मास्टर माईंड म्हणूनही त्यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. एखादी गोष्ट साध्य करावयाची असेल तर त्यासाठी लागणाऱ्या साधनांची बरोबर जुळवा जुळव करून ते साध्य प्राप्त करून घेण्याची त्यांची कला खरोखरच वाखाणण्याजोगी आहे.मुलींच्या शिक्षणासाठी प्रियदर्शनी मुलींचे वसतिगृह वसंतनगर येथे अत्यंत चांगल्या पद्धतीने चालविण्याचे काम ते करताना दिसतात. मध्यंतरी त्यांनी काही काळ बालसदन ही चालविले आहेत. वि.जा.से.समीती वसंतनगर या संस्थेअंतर्गत विविध ठीकाणी जवळपास 20 शाखा नांदेड व लातूर जिल्ह्यात कार्यरत असून जवळपास 500 कर्मचारी येथे काम करतात. हे काम करताना संस्थेत कुठेच वादविवाद होणार नाही याची पुरेपूर काळजी ते घेताना दिसतात.सर्व शाखांना सर्व सोयीनी युक्त इमारती देण्याचा त्यांचा मागील काही वर्षापासून प्रामाणिक प्रयत्न दिसतो आहे. विद्यार्थ्यांचा घरापासून शाळेपर्यंतचा प्रवास सूकर व्हावा म्हणुन अद्ययावत स्कूल बसेसची व्यवस्था ही त्यांनी विविध संस्थेच्या शाखांना उपलब्ध करून दिली आहे.आमच्या ग्रामीण महाविद्यालय,वसंतनगर ता.मुखेडला देशातील शैक्षणिक क्षेत्रातील नॅक या संसंथेचा अ(A)दर्जा प्राप्त करुन देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.महाविद्यालयला लागणा-या सर्व सुविधा त्यांनी अल्पावधीत उपलब्ध करून दिल्या.असा दर्जा प्राप्त करणारे कदाचित महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील हे एकमेव महाविद्यालय असावे.पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांच्यासाठी असलेल्या शिक्षक सहकारी पतसंस्थेचे नुकतेच ते चेअरमन (अध्यक्ष)म्हणूनही कार्य करत आहेत.कर्मचाऱ्यांच्या कर्तव्या प्रती ही ते जागरूक असतात. त्यांना कामात केलेली हयगय कधीच सहन होत नाही. त्यावेळी ते कठोरही होताना दिसतात. परंतु प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करणे त्यांना मुळीच आवडत नाही.याबरोबरच त्यांनी विद्यापीठाच्या सिनेट वरती ही 2007 ते 2011या कालावधीत कार्य केलेले आहे.
सहकार क्षेत्राच्या बाबतीतही त्यांनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालविला आहे. वडील कै.आ. गोविंदरावजी राठोड साहेब हे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक होते त्याच बँकेचे संचालक म्हणून मागील टर्मला ते कार्यरत होते. बँकेला संकटाच्या काळात उभारी देण्यात त्यांचाही वाटा महत्त्वाचा राहिला आहे. वरील प्रमाणे राजकारण, शिक्षण,सहकार यांच्या माध्यमातून मुखेड तालुक्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
आपले छोटे बंधू मुखेड- कंधार विधानसभा परिक्षेत्राचे विद्यमान आमदार डॉ. तुषार राठोड साहेब यांच्या सोबतीने विविध विकास कामे हे बंधुद्वय करत आहेत.पूर्वी कर्मवीर किशनराव राठोड व कै.आ. गोविंदराव राठोड या बंधुंनी आयूष्यभर एकमेकांच्या सल्लामसलतीने व आदर राखून काम केले म्हणुनच आज हे वैभव उभे राहील्याचे पहावयास मिळते. त्यांनी एकमेकात समन्वय ठेवून शून्यातून विश्व निर्माण केले आहे. त्याला अधिक गतिशील करण्याचे काम पुढची पिढी म्हणून हे दोन्ही बंधू करताना दिसत आहेत. या दोघांनी याचप्रमाणे ‘एकमेका साहाय्य करू l अवघे धरू सुपंथ ll’या न्यायाने काम केले तर त्यांच्या स्वतःच्या विकासापेक्षा नांदेड जिल्ह्याचा विकास व्हायला निश्चितच मदत होणार आहे.मागे होत आला आहे.या दोघांच्या बंधू प्रेमाला कोणाची नजर लागू नये असे आम्हा सर्व मुखेडवासीयांना विशेषता कर्मचाऱ्यांना सदोदित वाटत असते.ईश्वर ही जोड गोळी असीच एकत्र ठेवो व त्यांच्याकडून विविध क्षेत्राच्या माध्यमातून विकास होत राहो.
परवाच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपले छोटे बंधु विद्यमान आमदार डाॅ.तुषार राठोड साहेबांच्या विजयासाठी अतोनात कष्ट घेतले.अत्यंत अचुक नियोजन केले.त्यामुळे साहेबांचा विजय सुकर झाला.
त्यांच्या आजपर्यंतच्या यशात व उन्नतीत जसा त्यांच्या आई-वडिलांचा,काकांचा महत्त्वाचा वाटा राहीला आहे. तसाच महत्त्वाचा वाटा या संस्थेच्या विद्यमान सदस्या तथा त्यांच्या अर्धांगिनी सौ.पुष्पाताई गंगाधरराव राठोड यांचा ही आहे हे विसरता येणार नाही.घर, परिवार व आप्तेष्टांना सांभाळणारी अर्धांगिनी असल्याशिवाय पुरुष विविध क्षेत्रातील कार्य उत्तम पद्धतीने करू शकत नाही.सौ.पुष्पाताई कुठलाही अहंकार मनी न बाळगता कर्मचारी व अन्य व्यक्ती साहेबांना भेटायला येतात तेंव्हा त्या व्यक्तिंना अत्यंत परिवारातील व्यक्तीप्रमाणे नम्रभाव अंगी बाळगून वागवताना दिसतात.प्राचार्य गंगाधरराव राठोड साहेब हे मुखेडच्या विविध चळवळीत वेळोवेळी सक्रिय असलेले दिसतात.त्या बरोबरच त्यांनी सर्वसामान्यांसी नाळ जोडून ठेवणे ही राठोड परिवाराची महत्वाची खासियत आहे.त्यात गंगाधर राठोड साहेब मागे नाहीत.
मी त्यांना या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा देतो.ईश्वर त्यांचे आयू आरोग्य अबाधित राखो व त्यांच्याकडून भविष्यातही असीच नव्हे तर यापेक्षा ही जास्तीची जनसेवा वरील क्षेत्रातून घडत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझा शब्द प्रपंच थांबवतो.
प्रा.डॉ. रामकृष्ण बदने ग्रामीण महाविद्यालय,वसंतनगर
ता. मुखेड जी. नांदेड
भ्रमणध्वनी-9423437215