*कंधार/प्रतिनिधी संतोष कांबळे*
चांगला समाज घडविण्यासाठी आजच्या तरुणांकडून शिस्तीची गरज आहे. तरुणांनी कोणतेही व्यसन करू नये. व्यसनाच्या आहारी जाऊ नये. व्यसनाच्या आहारी गेलेली तरुणाई उद्ध्वस्त होत आहे. म्हणून तरुणांनो व्यसन करू नका व्यसनापासून दूर रहा चांगले विचार अंगीकारा आई-वडिलांची सेवा करा देव प्राप्त होतो, असे प्रतिपादन ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज यांनी केले .
दि.१ जानेवारी रोजी जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी दिवंगत डॉ.भाई केशवराव धोंडगे यांच्या व्दितीय पुण्यतिथी निमित्त क्रांतिभुवन बहादरपुरा येथे हरी कीर्तनाचा कार्यक्रम सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी ते बोलत होते. भाई केशवराव धोंडगे यांनी कधीच जातीय व्यवस्था मानली नाही. सामाजिक कार्याबरोबरच ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी शैक्षणिक क्रांति उभी करून गोरगरीबांच्या हजारो मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. म्हणून त्यांचे कार्य आजही समाजासाठी उपयोगी आहे.
अशी माणसं समाजातील गोरगरीब, सामान्य, कष्टकरी, कुणबी,नाहिरेवाल्याच्या उद्धारासाठी जन्माला येतात. समाज उपयोगी कार्य करा म्हणजे मानवी जीवन समृद्ध आणि सफल होईल असेही ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज यांनी आपल्या मधुर वाणीने कीर्तनाच्या माध्यमातून उपस्थितांना संबोधित केले. जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार व खासदार डॉ.भाई केशवराव धोंडगे यांनी आयुष्यभर गोरगरीब,सामान्य आठरा पगड जातीसाठी गाव,वाडी,तांडयावरील जनतेसाठी सामाजिक कार्य केले म्हणुन डॉ.भाई केशवराव धोंडगे यांच्या कार्याचा आदर्श आजच्या तरुणांनी घेणे गरजेचे आहे.
यावेळी डॉ.भाई धोंडगेंच्या अर्धांगिनी चंद्रप्रभावतीबाई धोंडगे, माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील,ॲड.मुक्तेश्वर धोंडगे, प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे, प्रा.डॉ.चित्राताई लुंगारे, प्राचार्य डॉ.अशोक गवते यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक व संस्थेतील कर्मचारी उपस्थित होते. भाई केशवराव धोंडगे यांच्या समाधीस्थळी माजी आमदार ज्ञानोबा गायकवाड, माजी आमदार रोहिदास चव्हाण, माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे, जेष्ठ विधीज्ञ ॲड. बी. के. पांचाळ यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी,विविध विभागांचे अधिकारी कंधार लोहा तालुक्यातील नागरीक हजारो संख्येने उपस्थित राहून दिवंगत भाई धोंडगे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
—–
हे वारकरी संप्रदायाचे व्यासपीठ आहे हे पृथ्वीतलावरती एकच व्यासपीठ असे आहे की सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येतात व गुण्या गोविंदाने नांदतात या व्यासपीठावरून जातिवाद करायचा नाही.या ठिकाणी मानवी संस्कार मिळतात हिंदु धर्माचे हे कुटुंब आहे. हिंदू धर्मात अठरापगड जाती आहेत आम्ही जातिवाद करणार नाहीत आमचा लढा आरक्षणाचा आहे आमची लढाई जातीवादाची नाही आरक्षणाची आहे.
— मनोज दादा जरांगे
मराठा योद्धा