*नागरिकांनी जल्लोषात कुस्तीचा आनंद घेतला आणि मल्लांना उत्स्फूर्तपणे प्रोत्साहन दिले*
*कंधार प्रतिनीधी – संतोष कांबळे*
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात सुरू झालेल्या माळेगाव येथील कुस्तीच्या दंगलीतील मानाची पहिली कुस्ती माळाकोळी तालुका लोहा येथील दीप रोहीदास कागणे या पहेलवानाने जिंकली असून त्यांनी पालम येथील राम तेलंगेची पाठ टेकवली.
माळेगाव यात्रेत वीर नागोजी नाईक मैदानात झालेल्या कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार रोहिदास चव्हाण,
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, श्याम दरक, एकनाथ मोरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय बेळगे, माजी शिक्षण सभापती संजय क-हाळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय भोसीकर, माळेगावचे सरपंच हनुमंत धुळगंडे, गट विकास अधिकारी दशरथ आडेराघो, समाज कल्याण अधिकारी आऊलवार, गणेशराव साळवे, डॉ. प्रमोद चिखलीकर, श्रीधर चव्हाण, बंटी पाटील उमरेकर, रोहित पाटील, अनिल बोरगावकर, नरेंद्र गायकवाड, माधव चांदने, केरबा पाटील मन्नान चौधरी, श्रीनिवास मोरे, ग्रामविकास अधिकारी देवकांबळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होतीमाळेगाव येथील आखाड्यावर झालेल्या कुस्ती दंगलीमध्ये महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यासह लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोलीसह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील पहिलवानांनी हाजेरी लावली. लाखो यात्रेकरूंच्या साक्षीने हलगीच्या तालावर अनेक पैलवानांनी आपापल्या डावपेचाद्वारे प्रतिस्पर्धी पैलवानांना चांगलीच पकड दिली.
माळेगाव येथील ग्रामपंचायतच्या कार्यालयातून मान्यवरांच्या उपस्थितीत निशान घेऊन श्री खंडोबाचे दर्शन घेतले. यानंतर खंडोबाच्या साक्षीने कुस्तीच्या आखाड्याकडे प्रस्थान करून मान्यवर व यात्रेकरू यांच्या उपस्थितीत कुस्तीची दंगल पार पडली. यावेळी विस्तार अधिकारी धनंजय देशपांडे, सतिश चोरमले यांच्यासह लोहा पंचायत समितीचे कर्मचारी परिश्रम घेत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परशुराम कौसल्य यांनी केले.
*माळेगाव यात्रेला अ दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार- खा. रवींद्र चव्हाण*
माळेगाव देवस्थानाला अ दर्जा मिळवून देण्यासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खासदार रवींद्र चव्हाण यांनी केले. याशिवाय, गावकऱ्यांच्या स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्मारक उभारणीच्या मागणीला देखील त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच माळेगाव येथे होत असलेल्या कुस्त्या अतिशय काटेकोर पणे नियमात पार पाडल्या जावेत. कुस्तीच्या कार्यक्रमासह माळेगाव येथील सर्वच कार्यक्रम उत्कृष्टपणे व नियोजनबध्द झाल्याबद्दल सर्वाचे आभार व्यक्त केले. यावेळी त्यांनी श्री खंडोबाचे दर्शन घेऊन सर्व शेतकरी व कामगार यांना सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली.
*माळेगाव यात्रेस निधी कमी पडू देणार नाही- आ. प्रतापराव पाटील चिखलीकर*
माळेगाव यात्रा ही गरीब, कष्टकरी व शेतकरी वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची व श्रद्धास्थान असलेली परंपरागत यात्रा आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी या यात्रेच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याच परंपरेला पुढे नेत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दरवर्षी दोन ते अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून यात्रेचा विकास सुनिश्चित केला जाणार आहे, असे प्रतिपादन आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.
*माळेगावच्या यात्रेतील कुस्ती दंगली: मल्लांचे अप्रतिम प्रदर्शन*
माळेगावच्या यात्रेत कुस्त्यांच्या दंगलींना नेहमीच खास स्थान असते व यावेळीही त्याचा अनुभव घेण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कुस्तीच्या आखाड्यात एकापेक्षा एक ताकदीचे मल्ल उतरले होते. त्यांनी कौशल्यपूर्ण डावपेच, ताकद आणि चातुर्याने आपले प्रदर्शन दाखवले. प्रत्येक मल्लाने आपल्या प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी अप्रतिम खेळ दाखवला. यात्रेतील या कुस्तीच्या दंगलींमुळे संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. लोकांनी जल्लोषात कुस्तीचा आनंद घेतला आणि मल्लांना उत्स्फूर्तपणे प्रोत्साहन दिले.
माळेगाव यात्रेतील कुस्ती दंगल एक पारंपारिक व महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे. महाराष्ट्र केसरी प्रमाणेच माळेगाव कुस्ती विजेत्याला माळेगाव केशरी म्हणून सन्मानित केले जाते. सन्मानाचे प्रतिक म्हणून मानाचा गदा मल्लास दिला जातो.
प्रथम विजेत्या कुस्तीगीरास ४१ हजार रुपये, उपविजेत्यास १० हजार रुपये, द्वितीय पुरस्कार विजेत्याला ३१ हजार रुपये उपविजेतास १० हजार रुपये तर तृतीय क्रमांकासाठी २१ हजार रुपये व उपविजेत्याला ५ हजार रुपये दिले जातात.