दोन दिवसात कायमस्वरूपी अधिकारी नेमणूक करण्याची मागणी अन्यथा ताळे लावणार…
मराठा महासंग्राम संघटनेचा इशारा
नांदेड प्रतिनिधी :
बरबडा येथील श्रेणी १ चा असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या पाच महिन्यांपासून कायमस्वरूपी डॉक्टर नसल्यामुळे जनावरांचे हाल होत असून,दोन दिवसात कायमस्वरूपी डॉक्टरांची नेमणूक करा अन्यथा दवाखान्याला ताळे लावण्यात येईल असा इशारा मराठा महासंग्राम संघटनेने एका लेखी निवेदनाद्वारे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांना दिला आहे.
येथील पशुवैद्यकीय दवाखान्या अंतर्गत पाच गावे येतात.या गावात जाऊन तेथील जनावरांचे लसीकरण करणे,पशुपालकांना जनावरांच्या विविध आजाराबाबत व याची काळजी कशी घ्यावी यासंदर्भात योग्य मार्गदर्शन करणे हे काम पशुधनविकास अधिकारी यांचे असते.परंतु बरबडा पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या पाच महिन्यांपासून हे अधिकारी रजेवर असल्याने येथील अतिरिक्त पदभार लोहा तालुक्यातील कापसी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात रुजू असलेले डॉ.गिरी यांच्याकडे आठवड्यातून केवळ दोनदिवसाकरिता सोपविला आहे.त्यामुळे योग्य मार्गदर्शन तर दूर परंतु ५ ते १० किलोमीटर खेड्यातून आलेल्या गुरांना योग्य वेळी उपचारही मिळत नसल्याने पशुपालक हैराण झाले आहेत.अशात लम्पी या रोगाने थैमान घातलं असून,पशुपालकांच्या मनात या आजाराबाबत भीतीच वातावरण निर्माण झाले आहे.येथून जवळच असलेल्या अंतरगाव, वजिरगाव,पाटोदा यासह बरबड्यात देखील पशूंची संख्या मोठी आहे.यातील बऱ्याच पशूंना लंपीची व अन्य आजारांची लागण झाली असून,काही पशू डॉक्टरांअभावी व त्यांच्या मार्गदर्शनाअभावी दगावले देखील आहेत.एक पूर्णवेळ अधिकारी, दोन परिचर आणि एक ड्रेसर अशी चार पदांची भरती असलेल्या या दवाखान्यात प्रत्यक्षरित्या एकट्या परीचरावरच संपूर्ण जनावरांच्या सेवेची मदार आहे.अधिकारी रजेवर तर ड्रेसर आणि एक परिचर यांना वरिष्ठांनी अन्य ठिकाणी कामासाठी रुजू करून घेतले आहे अशी माहिती आहे.
अतिरिक्त पदभार असलेल्या डॉक्टरांच्या गैरहजेरीत नाईलाजास्तव डॉक्टरांच्या भूमिकेपासून ते दवाखान्याच्या साफसफाईपर्यंतची सर्वच कामे एकट्या परीचरालाच पार पाडावी लागत आहेत.आठवड्यातून सोमवारी व शुक्रवारी फक्त अतिरिक्त पदभार असलेले डॉ.गिरी हे हजेरी लावतात मात्र अन्य दिवसाचं काय..? त्यामुळे लवकरात लवकर पूर्णवेळ अधिकारी या दवाखान्याला देण्यात यावा अशी मागणी अनेक पशुपालकांनी केली असून,
पशुसंवर्धन खात्याच्या या भोंगळ कारभाराबद्दल तीव्र संतापही व्यक्त केला आहे.
दरम्यान या भागातील पशुपालकांच्या समस्या पाहून मराठा महासंग्राम संघटनेने आवाज उठवला आहे.पुढील दोन दिवसात कायमस्वरूपी अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अन्यथा दवाखान्याला ताळे लावण्यात येईल अशा इशारा मराठा महासंग्राम संघटनेने दिला आहे.दिलेल्या निवेदनावर विक्रम पाटील बामणीकर मराठा महासंग्राम संघटना नांदेड व हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप पाटील हुंबाड जिल्हाप्रमुख ओमराजे पाटील शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब पाटील चव्हाण तालुकाध्यक्ष नायगाव शिवाजी पाटील शिंदे तालुका उपाध्यक्ष नायगाव यांच्या स्वाक्षर्या आहे