पिता-पुत्राची आत्महत्या सामाजिक चिंता वाढविणारी

 

अभ्यासासाठी वडीलांनी मोबाईल घेऊन द्यावा,व मकरसंक्रांत जवळ आल्यामुळे आपणास नवीन ड्रेस घेऊन परत उदगीर येथे काॅलेजाला जावे, या अपेक्षेने ओमकार स्वत:च्या गावी आला.आपल्या जन्मजात आई-वडिलांना त्यांनी आपल्या मनातील निर्मळ हेतु सांगितला. अल्पभूधारक असलेले शेतकरी राजेंद्र लक्ष्मण पैलवार वय (४३) रा.
मिनकी ता.बिलोली जि.नांदेड येथे राहत होते. मुलाची ही इच्छा ते पूर्ण करू शकले नाहीत. थोड्या दिवसा नंतर आपण मोबाईल व कपडे घेऊ असे त्यांनी मुलाला सांगितले. परंतु ओमकारला हे सहज बोललेले शब्द जिव्हारी लागले. कोणताही मागचा पुढचा विचार न करता सरळ त्यांनी शेतीतील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतला. मुलगा रागाने कुठे गेला या चिंतेत आई -वडील भाऊ होते. सकाळ झाल्यानंतर शेतीकडे पाहून यावे म्हणून राजेंद्र पैलवार गेले असता तिथे लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतलेला ओमकार पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. अगोदरच नैराश्याच्या गर्तेत सापडलेले राजेंद्र हे दृश्य पाहून मुलांचा मृतदेह झाडावरून खाली ठेवून त्यांनी त्याच दोरीने त्याच झाडाला गळफास घेऊन इहलोकांची यात्रा संपवली. पैलवार कुटुंबात ही मन हेलावून टाकणारी घटना 10 जानेवारी रोजी घडली.
अशा घटना पुन्हा कधीही घडू नयेत.म्हणून हा लेखन प्रपंच….

अनेक जणांना आज मोबाईलचे वेड
लागलेले आहे. काही घरातील ज्येष्ठ मंडळी तासनतास मोबाईल पहात आहेत. तर काही बाहेर मोबाईलवरच रील पाहण्यात दंग झाले आहेत. उंदराला मांजर साक्ष म्हटल्यासारखं प्रत्येकाला मोबाईल हवा असल्यामुळे तेरी भी चूप अन् मेरी भी चूप म्हणून हे सर्व चालत आहे. असे मला वाटते. हे असेच चालत राहिले तर अनेक व्यक्ती मनोरुग्ण होऊन दिवस रात्र कोठेही हिंडतील आणि त्यातून अनेक वाईट घटना घडत राहतील. म्हणून सावधगिरी बाळगावे.
भारत हा कृषीप्रधान देश आहे या देशातील 70% लोक शेतीवर आजही अवलंबून आहेत. अर्थात समाजाचा कणा शेती आहे. अर्थ आहे म्हणून जीवनाला अर्थ आहे. जीवन जगते वेळेस पावलोपावली पैशाची गरज पडते.पूर्वीच्या काळी उत्तम शेती, मध्यम नोकरी, कनिष्ठ चाकरी असे म्हटले जात होते. नंतर नोकरीला महत्त्व आले.उत्तम नोकरी, मध्यम शेती,कनिष्ठ चाकरी असे बोलले जाऊ लागले. भारतीय शेतीमालाला मिळणारा भाव कवडीमोल मिळत आहे. शेतीमालाच्या भावाबद्दल शेतकऱ्यांच्या मनात असलेली उदासीनता आजही संपलेली नाही. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असला तरी त्याच्या अंगावर डोंगराएवढे कर्ज आहे. आज सगळीकडे आपण जागतिकीकरण,उदारीकरण, खाजगीकरण याच्या गप्पा मारत असलो तरी मूळ शेती व्यवसाय ग्रामीण भागातला आणखी सुधारलेला नाही. चार मोठे शेतकरी सुधारले. म्हणून काय झाले? शेतीची अवस्था सध्या बिकट झाली आहे. शेतीमध्ये पिकणारे सोयाबीन आणि इतर पिके यांच्या भावाची आकडेवारी काढल्या नंतर शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते त्या मुलांना लागणारे पैसे, शैक्षणिक फी सुध्दा वेळेवर मिळत नाही. आज शेतकरी सगळीकडून अडचणीत आला आहे. शासनाचे अनेक धोरणे तसेच आश्वासने हवेत विरघळून जातात. कापूस वेचणीचा विचार केला तर पंधरा रुपये किलो कापूस वेचणीला घेत आहेत. औषध फवारणी, बी बियाणे, रासायनिक खते आणि परिश्रम याचा विचार केला तर सात हजार रुपये भावाने आज कापूस विकला जात आहे.
या गोष्टीवर कोणी विचार करेल काय? नगदी पिके म्हणून सोयाबीन आणि कापूस याकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते. तरीही या पिकांना शासन योग्य भाव देत नाही. जर पिकवलेल्या पिकांना भाव मिळत नसेल तर शेतकरी हा कर्जाच्या ओझ्याखाली दबून जाणार? त्याचे स्वप्न धुळीला मिळणार? स्वतःच्या कुटुंबाला तो दोन वेळेचे जेवण देऊ शकत नाही. यातून आर्थिक विवेचना येते.नको ते मनात वाईट विचार येतात. आणि माणूस हे जग सोडून जाण्याचा आत्मघातकी विचार करतो. दररोज कुठे ना कुठे शेतकरी आत्महत्या करतच आहेत. याच्या मुळाशी जाणे आज गरजेचे आहे. आपण धुराला काठीने मारत बसलो तर आग विझत नाही, प्रत्यक्ष आग कोणत्या ठिकाणी लागली त्या ठिकाणी पाणी टाकणे गरजेचे आहे. त्यात त्याची चूक कोणती? पावसाचा अनिमितपणा खत बी-बियाणाचे वाढलेले भाव .त्यामुळे कुटुंबाला लागणाऱ्या सुख सुविधा तो स्वतः देऊ शकत नाही. या सर्व गोष्टीमुळे तो जीवनातून उठत आहे. त्यामुळे अशा घटना घडणे सुसंस्कृत व पुरोगामी महाराष्ट्राला शोभत नाही. एखादी वाईट घटना घडली की अनेक लोक तिथे जाऊन त्या कुटुंबांचे सांत्वन करतात. कुठे मरण पावला? काय झाले होते? कोणी काही बोलले काय? त्यातून त्या कुटुंबाला नाकी नऊ येतात.अगोदरच ते कुंटूब उध्वस्त झालेले असते. शेतकरी मरण पावल्यानंतर त्याच्या कुटुंबाची काय अवस्था होते. हे शब्दांत सांगता येत नाही.आजच्या घडीला अनेक गावोगावी या घटना घडत आहे. आपल्या महाराष्ट्रातील शेती आणि शेतकरी यांची हालाखीची परिस्थिती खरोखर सुधारावी असे शासनकर्त्यांना वाटते काय? शेतीला सिंचनाखाली आणावे असे बोलून चालणार नाही, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबत नाहीत. दरवर्षी हजारो शेतकरी आत्महत्या करतात. त्यावेळेस काही टवाळखोर लोक शेतकरी व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे आत्महत्या करतात.असे नवीन शोध लावतात.त्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. सरकारने शेतीसाठी अनेक योजना राबवित असल्या तरी त्याची अंमलबजावणी शेवटच्या तळापर्यंत पोहोचत नाही निसर्गाच्या लहरी
पणामुळे आणि शेतकऱ्याचे अनास्थे मुळे इथला शेतकरी सदैव कर्जाच्या डोंगराखाली जीवन जगतो. शेतात पीक घेतल्यानंतर त्याच्या मूळांना कीड लागते आणि ती कीड वाढत वाढत जाऊन शेवटी शेतकऱ्यांच्या आत्महत्या पर्यंत पोहोचते. शेती आणि शेतकऱ्याकडे दुर्लक्ष होण्याचे कारण म्हणजे शेतातून मिळणारे उत्पन्न होय. 70% जनता शेतीवर आज अवलंबून आहे. आज राष्ट्रीय शेती उत्पन्नात शेतीचा वाटा जवळ जवळ 16 % आहे. शेतकऱ्यांचा मुलगा शेतकरी व्हावा असे अनेकांना वाटत नाही तो शिकावा मोठा अधिकारी व्हावा असे वाटते, परंतु शिक्षणासाठी येणारा खर्च त्यांच्याकडे नसतो.त्यामधून ते हताश होतात. आणि असे राजेंद्र पैलवार सारखे अनेक कुटुंब उध्वस्त होतात. आपल्याकडे जे पिकते, ते त्या भावात विकत नाही, शेती विकासासाठी ज्या समित्या आयोग स्थापन केले. त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. तेव्हाच शेतकरी सुखी होईल. आपल्या शेजारी अवतीभवती अनेक घटना दररोज घडत आहेत. यामुळे मन अस्वस्थ होते.त्यावर अनेक प्रकारे विचार करावा लागतो. मार्ग शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहेत. ते समजून घेऊन शासनाने दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबवता येईल. याचा विचार करावा. तेव्हाच शेतकरी राजाला बळी चा राजा म्हणायची वेळ येऊ नये.

*प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत* अध्यक्ष:विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि.नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *