नांदेड, दि. १४ जानेवारी २०२५:
जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे समाजमाध्यमातून उभे केले जाणारे चित्र चुकीचे, निराधार व तर्कहिन आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यातील महायुतीमध्ये एकजूट असून, नेत्यांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. उलटपक्षी महाविकास आघाडी हताश, दिशाहिन व खिळखिळी झाली आहे. त्यातूनच कदाचित अशा बातम्या जन्मास आल्या असाव्यात, असे मत भाजपचे जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी व्यक्त केले आहे.
राज्य पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार तिघेही एकत्रितपणे काम करीत आहेत. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या १०० दिवसांची रुपरेखा निश्चित करून त्यानुसार प्रभावीपणे काम सुरु झाले आहे. त्यामध्ये खा. अशोकराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारला जात असलेल्या जालना-नांदेड समृद्धी महामार्गाच्या विस्तारित प्रकल्पाला गती देण्याचाही समावेश आहे. राज्यात एकत्रित काम करण्याचा महायुतीचा सूर नांदेड जिल्ह्यातही दिसून येतो. जिल्ह्यातील महायुतीची एकजूट कायम रहावी, असा आग्रह धरून भाजपचे खा. अशोकराव चव्हाण काम करत आहेत. त्यामुळे समाजमाध्यमांवर येणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे पांडागळे यांनी आज प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे नेते हवेत राहिले. तर दुसरीकडे महायुतीने लोकसभेत राहिलेल्या उणीवा दुरुस्त करून विधानसभा निवडणूक ताकदीने लढवली. निवडणुकीपूर्वी लोकहिताचे अनेक निर्णय घेतले, त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली. तीनही पक्ष एकसंघ व मजबुतीने निवडणुकीला सामोरे गेले. त्याचीच फलश्रुति म्हणून महायुतीने विधानसभेच्या सर्वच्या सर्व नऊ जागा जिंकल्या. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची व प्रमुख कार्यकर्त्यांची महायुतीतील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी या तीनही प्रमुख पक्षांमध्ये इनकमिंग सुरु झाली आहे. त्या माध्यमातून महायुतीतील घटकांचे स्थानिक पातळीवरील नेतृत्व मजबूत होते आहे. याच निराशेतून कदाचित काही घटकांनी जाणीवपूर्वक महायुतीतील मतभेदांच्या बातम्या जन्मास घालण्याचा उद्योग सुरु केले असावेत, अशीही शंका पांडागळे यांनी व्यक्त केली.