मुखेड: (दादाराव आगलावे)
गावातील प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर मुलींना उच्च शिक्षणासाठी जवळच्या महाविद्यालयात जाता यावं, मुलींची शैक्षणिक गळती थांबावी तसेच स्त्रियांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक स्वातंत्र्याचा परीघ विस्तारावा यासाठी ‘एस. टी. महामंडळा’ने स्त्रिया-मुलींसाठी विविध सवलती दिल्या आहेत असे प्रतिपादन डब्ल्यूएचओ चे सदस्य तथा मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे यांनी केले. सुप्रभात मित्रमंडळ मुखेडच्या वतीने मुखेड आगाराच्या आवारात सिमेंट बेंच च्या लोकार्पण सोहळ्यात ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुखेड आगार प्रमुख सुभाषराव पवार होते तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रभात मित्र मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण पत्तेवार, सचिव जीवन कवटिकवार, संघटक अशोक कोत्तावार, सुप्रभात चे सदस्य नंदकुमार मडगुलवार, उत्तमअण्णा चौधरी, आगार नियंत्रक नरसिंग कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे पुढे म्हणाले की, बहुजन हिताय… बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन खेड्यापाड्यात चालणारी लाल परी तिला आजही तेवढेच महत्त्व आणि विश्वास आहे. अनेक सवलती देऊन ही लाल परी खेड्यापाड्यापासून ते मेट्रो सिटी पर्यंत धावते. एसटी महामंडळाच्या वतीने आणखी काय सुधारणा व स्वच्छता ठेवता येईल याकडे आगारप्रमुखांनी लक्ष देण्याची गरज आहे.
सुप्रभात मित्रमंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण पत्तेवार मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मुखेड बस स्थानकाच्या आवारात नांदेड पॉईंट वरती प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सुप्रभात मित्र मंडळ मुखेडच्या वतीने सिमेंटचे बँच टाकून प्रवाशांना बसण्याची सोय केली. हा आमचा एक सामाजिक उपक्रम आहे. सुप्रभातचे सचिव जीवन कवटीकवार मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सुप्रभात मित्रमंडळ हे स्व. अनिल कोत्तावार व मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे साहेब यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेले एक सेवाभावी संघटना आहे. आजपर्यंत आम्ही रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण। ब्लॅंकेट वाटप, स्मशानभूमीत सिमेंट बँच असे विविध उपक्रम आम्ही केलेले आहे यापुढेही आम्ही असे उपक्रम करू. यावेळी आगार प्रमुख सुभाषराव पवार म्हणाले की, मी धर्माबाद येथे आगार प्रमुख असताना आगारामध्ये सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न केला परंतु मला सेवाभावी वृत्ती मधून कोणाचेही सहकार्य मिळाले नाही परंतु मुखेडमध्ये मी आव्हान करण्याच्या अगोदर आगाराचे शुशोभीकरण करण्यासाठी व सहकार्य करण्यासाठी येथील जनता तत्पर आहे हे मी आपले सहकार्य कदापिही विसरू शकणार नाही.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक दादाराव आगलावे यांनी केले. कार्यक्रमास डॉ. एम.ज. इंगोले, डॉ. पी. बी. सीतानगरे, डॉ. आर. जी. स्वामी, उत्तमभाऊ कुलकर्णी, नारायणराव बिलोलीकर, बालाजी वटमवार, दिनेश चौधरी यांच्यासह सुप्रभात मित्र मंडळाचे सदस्य, वाहक, चालक, प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.