जाऊ संताच्या गावा’:संत नामदेव

 

 

लोकजीवनाशी संबंधित असलेले लोकसाहित्य प्रथम संत नामदेवांनी लिहिले.त्यांच्या कीर्तनातून प्रेरणा घेऊन आज लाखो संत,महंत तयार झालेले आहेत. त्यांचे अभंग तर्काच्या किंवा कल्पनेच्या जोरावर आधारलेले नसून भावनेच्या उमाळ्यातून निर्माण झालेले आहेत.भावकाव्याचे अंतिम सौंदर्य त्यांच्या अभंगातून ओसंडून वाहते.त्यांच्या अभंगातील गोडवे संत गुरुनानक,संत कबीर,संत नरसी मेहता,संत मीराबाई यांनी प्रत्यक्ष गायले आहेत.भक्तीचे शुद्ध स्वरूप कसे असावे; याचा आदर्श लोकांसमोर त्यांनी त्यांच्या अमृतवाणीतून सांगितला. त्यासाठीच हा लेखन प्रपंच…

संत नामदेव हे संत मांदियाळीतील एक प्रमुख संत मानले जातात. त्यांच्या कार्याचे महत्त्व मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या दृष्टीने फार मोठे आहे. त्यांचे जीवन कार्य अतिशय उद्बोधक स्वरूपाचे आहे. भागवत धर्म,मराठी भाषा, काव्य,तत्त्वज्ञान त्यांनी समाजाच्या सर्व स्तरावरील सामान्य माणसापर्यंत पोहोचविले आहे. त्यांनी महाराष्ट्रा बाहेर भक्ती संप्रदायाचा पंजाब पर्यंत विस्तार केला. संत नामदेवा विषयी त्यांच्या समकालीन संतांनी जी माहिती दिली त्यावरून त्यांच्या चरित्राची महती आपणाला येथे करून घेता येते. त्यांचा जन्म 1270 मध्ये आई गोणाई व वडील दामाशेट यांच्या पोटी हिंगोली जिल्ह्यातील नरसी बामणी येथे झाला. संत नामदेवा व संत ज्ञानेश्वर महाराज समकालीन आहेत.
संत चोखामेळा,संत जनाबाई हे संत नामदेवांना गुरु मानतात. तर संत नामदेवाचे गुरु विसोबा खेचर होते. संत नामदेवांनी 2500 अभंग लिहिले आहेत.त्यामुळे संत नामदेव महाराजांची भक्ती डोळस झाली त्या अगोदर ते विठ्ठलाचे सर्व सामान्य भक्त होते. त्यानंतर त्यांना ज्ञानाचे अधिष्ठान मिळाले.त्यांची भक्ती अंधश्रद्धेवर आधारलेली नव्हती. मानवता,समता, एकात्मता आणि प्रेम या चार खांबावर ते आधारलेली होती.मानवाने मानवाशी जीवन कसे जगावे याची माहिती त्यांना ज्ञानेश्वर महाराजाकडून कळाली.भक्तीची दृष्टी कशी असावी हे कळाल्यानंतर त्यांनी सर्व संतांबरोबर तीर्थयात्रा केल्या. तीर्थयात्रेत अनेक घटना परिवर्तनशील घडल्या.
समाजातील द्वेष,अनाचार,अत्याचार, दांभिकपणा काढून टाकण्याचा प्रयत्न त्यांनी मनापासून केला.
उत्तर भारतात त्यावेळी मुस्लिम राजवटी अस्तित्वात होत्या.त्यावेळी हिंदू धर्मातील परंपरा,जातीयता व धार्मिकता टिकून ठेवणे फार जिकरीचे काम होते.सतत परकीय आक्रमणे होत होती;त्या काळात समाज चहुबाजूनी हतबल झाला होता. जीवन जगणे मुश्किल झाले होते.
तरी त्या काळात त्यांनी पंजाबमधील घुमान पर्यंत पायी प्रवास करून अनेकांचे हृदय जिंकले. त्यांनी तिथे केलेले कीर्तन,समाज प्रबोधनपर माहिती यांची नोंद शीख सांप्रदायात घेतली गेली. शीख धर्मातील पवित्र गुरु ग्रंथसाहेबांमध्ये त्यांच्या 62 अभंगाचा समाविष्ट आहे. म्हणून’ संत श्रेष्ठ आद्य कीर्तनकार म्हणून त्यांचे नाव दाही दिशेला आज झळकत आहे.नामस्मरण आणि कीर्तन यांच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन केले आहे. त्यामुळे त्यांचे विचार समाजाला प्रेरणादायी आहेत.संत नामदेवाच्या अभंगांमध्ये अनेक छोट्या छोट्या छटा पाहायला मिळतात. नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी ।।असे आपणास म्हणता येते.संत नामदेवांनी पंढरीच्या विठ्ठलाला आपले सर्वस्व मानले आहे. विठ्ठला विषयी त्यांच्या मनात अतिशय ओढ आहे. तो दिसेनासा झाला तर त्यांना विरह त्यांना सहन होत नव्हता. त्यांच्या अभंगांमध्ये भक्तीची आर्तता आहे. आपल्या देवाबद्दल जिव्हाळा
,प्रेम,आपुलकी आदर आहे. त्यांची भाषा शैली ओघवती व अगदी सोपी आहे. सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये त्यांचे गोड शब्द त्यांनी अतिशय हळुवार पणे ,लडिवाळाने प्रवेश करतात.त्यांची भक्ती अंत:करणा पासून ओसंडून वाहते.रोजच्या जीवनातील उदाहरणे त्यांच्या अभंगात सहज येतात.आपल्या मनातील भावभावना दुसऱ्या पर्यंत कीर्तनाच्या निरूपणातून करतात. दररोज घडणाऱ्या घटना भक्ती माध्यमातून सांगतात. त्यामुळे त्यांचे तत्त्वज्ञान सुगम पद्धतीने सर्वसामान्य माणसा पर्यंत पोहोचते. म्हणून त्यांच्या संप्रदायाला समानता आणि मानवता यांचा आधार आहे. त्यामुळे त्यांच्या भक्तीचा शुद्ध प्रचार व प्रसार सर्वत्र पसरला आहे. त्यांचे विचार मनोभावाच्या पातळीवर अजून लोकांच्या मनात साठवून आहेत. आचारधर्म काय असतो? याची माहिती त्यांनी लोकांना करून दिली, संत ज्ञानेश्वर, संत गोरोबा कुमार,संत चोखामेळा,संत जनाबाई,संत सावता माळी आणि संत नामदेव हे समकालीन आहेत.त्यामुळे संत ज्ञानेश्वरांचे वर्णन त्यांनी आपल्या मुखातून केले आहे. त्यात चरित्र तीर्थवळी आणि समाधी या तीनवरीही त्यांच्या अभंग आहेत.समाधीचे वर्णन मनाला चटका लावणारे आहे.हृदयाला भिडणारे अभंग संत नामदेवांनी अतिशय मृदू शब्दात सांगितले आहेत. हिंदी भाषेत त्यांचे 125 पदे आहेत. संत नामदेवांनी संत मेळाव्याचे नेतृत्व केले. आणि आपल्या जीवनातील, व्यवसायातील,प्रवासवर्णनातील छोट्या छोट्या घटना अभंगाच्या रूपाने सांगितल्या.अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणसातील भावनिक व आध्यात्मिक एकात्मता जपण्याचे काम त्यांनी केले. संत नामदेवाची भक्ती विठ्ठलमय होऊन गेली होती. जळी,स्थळी,पाषाणी सर्वत्र त्यांना विठ्ठलाचे मनमोहक साजरे -गोजरे रूपच दिसत होते.म्हणून ते पुढील अभंगात म्हणतात.
तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल ।
देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल ।।
माता विठ्ठल पिता विठ्ठल ।
बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल।।
गुरू विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल।
निधान विठ्ठल निरंतर ।।
नामा म्हणे मज विठ्ठल सापडला। म्हणोनि कळिकाळा पाड नाही।।मनामधल्या देवाची भक्ती करायची असेल तर स्वतःचे मन निर्मळ असायला हवे,आपला भाव शुद्ध असावा,साधे देवाचे नाव घ्या त्यासाठी संन्यास घेण्याची व तपश्चर्या करण्याची अजिबात आवश्यकता नाही.अशा साध्या सोप्या व ओघवत्या भाषेतून त्यांनी कीर्तन केले.म्हणून आज आपण ‘जाऊ संतांच्या गावा’असे मला म्हणावे वाटते म्हणूनच सर्व संतांमध्ये संत नामदेवाचे अभंग अधिक उत्कट आहेत.संत नामदेवाच्या अभंगाचे प्रत्येकाने वाचन करून समाजामध्ये जनजागृती करावी.ही अपेक्षा..

*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत*
अध्यक्ष: विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि.नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *