जाऊ संतांच्या गावा : महात्मा बसवेश्वर महाराज

संतांनी आपल्या विचारातून समाज जागृत करण्याचे काम केले. सर्व संतांचा खरा इतिहास समाजा समोर आजही आलेला नाही. त्यांचे आचार-विचार कृतीतून प्रत्यक्षात समाजात येणे गरजेचे आहे.
जयंती,पुण्यतिथी दिनी फक्त संताच्या प्रतिमेला हार घालून ती साजरी न करता समाजा तील वंचित घटका साठी कार्य केले पाहिजे. तेव्हाच त्यांच्या कार्याचा व विचाराचा गौरव होईल. संतांनी लोकांच्या भाषेत उपदेश केला.धर्माचा खरा अर्थ सांगून लोकांचे संरक्षण केले.लोकांना एकत्रित करून समाजाचे आचरण सुधारले.वर्ण व जातीचा अहंकार बाजूला ठेवून सर्व माणसे परमेश्वराची लेकरे आहेत.ही शिकवण दिली. म्हणूनच मानवतावाद हा संताकडून आपण सर्वांनी शिकला पाहिजे.
आज आपण महात्मा बसवेश्वर यांच्या समाज कार्या विषयी प्रबोधन पर माहिती येथे करून घेत आहोत.
कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यात बागेवाडी या खेडेगावात मादराज व मादलंबिका पती-पत्नी अतिशय आनंदाने जीवन जगत होते. त्यांच्या पोटी महात्मा बसवेश्वराचा जन्म झाला. ते जातीने शैव ब्राह्मण होते.ब्राह्मण जातीच्या रीतीरिवाजां प्रमाणे काही संस्कार आहेत ते बसवेश्वर यांच्यावर करावेत.असे त्यांच्या आई-वडिलांनी ठरविले. उपनयन संस्कार विधी करण्याचे ठरविल्यानंतर बसवेश्वरांनी त्या विधीला विरोध केला व त्यांनी लिंग धारणा केली.जातीभेदाविरुद्ध त्यांनी उठाव केला.आर्थिक व धार्मिक क्रांती घडवून आणली.उपनयन संस्कार विधी म्हणजे एखादे भांडे बाहेरून स्वच्छ करण्याचा प्रकार आहे.असे निक्षून सांगितले.तरीही पारंपरिक रीतीरीवाजा नुसार ब्राह्मण मुलासाठी उपनयन संस्कार आवश्यक आहेत. असे त्यांच्या मातापित्यांना वाटत होते. बसवेश्वर लहानपणापासून कुशाग्र बुद्धेचे होते.एकदा असेच बसवेश्वरांनी आपले आईकडे पाणी पिण्यासाठी मागितले तेव्हा ती स्वयंपाक करत होती व त्यांचे वडील देवाहार्‍यातील देव एकत्रित करून पूजा करत बसले होते. देवाची पूजा पूर्ण झाल्याशिवाय पाणी पिता येणार नाही, कारण देवाला नैवेद्य दाखवावे लागते.पाणी पिण्यास दिल्यानंतर नैवेद्य उष्टे होते. असे आईने त्यांना सांगितले. तेव्हा बस्वने स्वत:च्या अंगणात खडे खोदण्यास सुरुवात केले. एकापाठोपाठ पाच खड्डे खोदले पण एकाही खड्ड्याला पाणी लागले नाही. पूजा आटोपून नैवेद्य दाखवून वडील घराबाहेर आले आणि म्हणाले. “एकच खड्डा जास्त खोदला असता तर पाणी लागले असते” पण बाबा एकाच देवाची निष्ठेने पूजा भक्ती केली तर तो प्रसन्न होतो.तर मग इतके देव गोळा करण्याची काय गरज आहे. अशा प्रकारे बाळ बसवने एकेश्वरवादी उपासनेचा पुरस्कार केला. उपनयन विधी आणि वडिलांनी जमा केलेले ढिगभर देव यामुळे त्यांच्या मनात देव एकच आहे.असे वाटू लागले. उपनयन विधीला विरोध करून त्यांनी गृहत्याग करण्याचे ठरवले. बाराव्या शतकात विजापूर जिल्ह्यातील हुनगुंड तालुक्यात कुंडल संगम गाव कृष्णा आणि मलप्रभा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. तेथे जाऊन वीरशैव संप्रदायात प्रवेश केला. लहानपणापासून पारंपरिक जीवनापासून स्वतःला मुक्त केले. तेथील जातवेद मुनीकडून शैव सांप्रदायाची लिंगदीक्षा घेऊन अंगावर शिवलिंग धारण केले व तेथील मुनींच्या मार्गदर्शनाखाली वेदवेदांगे, इतिहास,पुराणे,धर्मशाळा,नीतीशास्त्र, षडदर्शने यांचा सखोल अभ्यास करून जैन व बौद्ध धर्माच्या ग्रंथाचे वाचन केले. तसेच पाली,संस्कृत, तमिळ,कन्नड या भाषाही त्यांना अवगत होत्या. त्याचबरोबर संगमेश्वराला आपले उपास्य दैवत मानत असत.संगमेश्वराची पूजाअर्चा, प्रार्थना, भजन, गाऊन तल्लीन होत.महात्मा बसवेश्वरांची विद्वत्ता व भक्ती पाहून जातवेद मुनीच्या लक्षात आले, की इथे न राहता महात्मा बसवेश्वराने कलचुरी राज्याची राजधानी कल्याण येथे जाऊन राहावे. या नगरीत अनेक विद्वान लोक राहत होते. तिथेच कलचुरी व जैन राजा बिज्जल कल्याणचा राजकारभार पाहत होता.यांच्याकडेच असणाऱ्या प्रधानमंत्री बलदेव हा महात्मा बसवेश्वराचा मामा होता.राजा बिज्जल व प्रधानमंत्री बलदेव यांच्यावर जनता अतिशय खुश होती. राज्यात कोणी दुःखी व उपाशी राहणार नाही याची काळजी त्यांनी घेतली होती.त्यामुळे राजा बिज्जलचे नाव कर्नाटक,
महाराष्ट्र,आंध्रप्रदेश या राज्यात पसरलेले होते. त्यांच्याकडे ( मोठा ताम्रपट तांब्याच्या पत्रावर लिहिलेली अक्षरे) होता .
तो कोणत्याही व्यक्तीला वाचता येत नव्हता. अनेक वेळेस राज्यात दवंडी देऊन एकही व्यक्ती वाचन करण्यासाठी पुढे आला नाही. पण ही गोष्ट बसवेश्वरांना जेव्हा समजली तेव्हा बिज्जल राजा समोर येऊन तो ताम्रपट न अडखळता बसवेश्वरांनी वाचून दाखवला. त्यामुळे बिज्जल राजा अतिशय खुश झाला.महात्मा बसवेश्वरासारखा विद्वान आपल्या राज्यात आहे. म्हणून राज्यातील प्रशासनात कोषागार या पदावर त्यांची नेमणूक केली. यामुळे बलदेव मामांना अतिशय आनंद झाला. बसवेश्वराचे आता विवाहासाठी योग्य वय झाले होते. म्हणून प्रधानमंत्री बलदेव मामांनी त्यांची कन्या गंगाबिका हिच्या सोबत बसवेश्वरचा विवाह करून दिला.आता सर्वत्र बसवेश्वराची कीर्ती आपोआप पसरू लागली. विद्वान म्हणून त्यांचे नाव सर्वत्र लोक घेऊ लागले. बलदेव मामा बसवेश्वर व त्यांची पत्नी गंगाबिका हे सर्व आनंदाने राहत होते. दिवसा मागून दिवस जात होते.अचानक एक दिवस प्रधानमंत्री बलदेव सर्वांना सोडून अनंतात विलीन झाले.यामुळे राज्याची बसलेली घडी पार विस्कटून जाते की काय ?असे सर्वांना वाटू लागले.राजा बिज्जला अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी बसवेश्वरांना प्रधानमंत्री केल्याचे घोषित केले. आता बसवेश्वर कोषाध्यक्ष हे पद सोडून सरळ राज्याचे प्रधानमंत्री म्हणून राज्यकारभारात आले.
शेतकऱ्यांना बी-बियाण्याची मदत केली. जनतेवरील कर कमी केला. व्यापाऱ्यांना सवलती दिल्या .
राज्याची आर्थिक उत्पन्न वाढविले. वीरशैव संप्रदायात असणाऱ्या काही वाईट विकृती त्यांनी काढून टाकल्या. राजा बिज्जलाच्या सहकार्याने सर्व भागात बसवेश्वरांची कीर्ती पसरली.
त्यानंतर महात्मा बसवेश्वरांनी राज्याच्या बाहेरील दूरच्या विद्वाना बरोबर धार्मिक चर्चा व वीरशैव संप्रदायाची दीक्षा देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी हाती घेतले.त्यानुसार काही महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. प्रत्येक वीरशैवाने पंच विचाराचे पालन करावे.1)सदाचार 2) शिवाचार 3 ) गणाचार4) लिंगाचार 5)भर्त्याचार इत्यादी
धार्मिक क्षेत्रात बसवेश्वरांनी कर्मकांडाला व अंधश्रद्धेला फाटा देऊन भक्ती व ज्ञानाला प्राधान्य दिले. महात्मा बसवेश्वराने भक्ती मार्ग हा षटस्थल सिद्धांत म्हणून स्पष्ट केला. प्रत्येक वीरशैवाने प्रगती करत असताना ज्या पायऱ्याने मार्गक्रमण करावयाचे असते. त्यांना षटस्थल असे म्हणतात. त्यात साधना अवस्थेचे सहा भाग केले आहेत.
१) भक्त स्थूल: शिवाची भक्ती करणे व स्वच्छ अंत:करण ठेवणे.
२)महेश्वर स्थूल: चारित्र्यसंपन्न जीवन जगणे.
३)प्रसादी स्थूल: सुखदुःखामध्ये मनाचे समवस्था ठेवणे.
४) प्राणलिंगी स्थल: योगसाधना करून मनोबल वाढविणे.
५)शरण स्थल: आपण जे काही करतो ते परमेश्वरास अर्पण करणे.
६) ऐक्य स्थल: जीव हा शिवच आहे. व त्यांच्याशी एकरूप होणे. तसेच
अष्टावरण: १ )गुरू २) लिंग ३)जंगम ४ ) विभूती ५) रुद्राक्ष ६ ) मंत्र ७) पादोदक ८ ) प्रसाद, तसेच तसेच गुरु लिंग व जंगम यांना आपण काही वस्तू भक्तिभावाने अर्पण करतो त्याला प्रसाद असे म्हणतात. वीरशैव संप्रदायातील शास्त्राचे पद्धतशीरपणे अध्ययन करण्यासाठी महात्मा बसवेश्वराने शिवानुभव मंटप नावाचे एक विद्यापीठ स्थापन करून त्याचे अध्यक्ष अल्लम प्रभू यांना केले.
येथे अनेक वीरशैव येऊन अध्ययन करत असतात.नेपाळ,गुजरात, केरळ,महाराष्ट्र या ठिकाणी मंटप मधून अहोरात्र समाजप्रबोधनाचे कार्य चालते.*काय कवे कैलास* याचा अर्थ स्वतः काम करून जीवन जगणे हा महात्मा बसवेश्वरांचा अतिशय महत्त्वाचा संदेश आजही पाळला जातो. मानवधर्माच्या इतिहासात या अनुभव मंटपाला तोड नाही.उद्योग करून धन मिळविले तरी त्याचा संग्रह करू नये. असे त्यात सांगितलेले आहे. महात्मा बसवेश्वरांनी बाल विवाहाला विरोध केला. कारण बालविवाहामुळे येणा-या अडचणी समजून घेऊन बाराव्या शतकात त्यांनी क्रांतिकारी पाऊल उचलले. समाजात घडणाऱ्या वाईट गोष्टी घटस्फोट यांच्याकडे त्यांनी लक्ष दिले. पुनर्विवाहाला पाठिंबा दिला. कारण लहान वयात एखाद्या महिलेला विवाह झाल्यानंतर काही नैसर्गिक कारणामुळे किंवा युद्ध,अपघात यामुळे तिचा पती मरण पावला तर ती महिला आयुष्यभर दुःखी राहते. तिला विद्रुप बनविले जात असे. कारण जेणेकरून पर पुरुषांनी तिच्याकडे वाईट नजरेने पाहू नये. या सर्व गोष्टीचा विचार करून त्यांनी पुनर्विवाहाला मान्यता दिली.
त्यामुळे अनेक महिलांचे त्या काळात पुनर्विवाह झाले. जगामध्ये पुष्कळ क्रांतीकारक झाले.संत झाले.
पण ज्यांच्या अंगी संतत्व असूनही क्रांतीकारक झाले. ते फक्त महात्मा बसवेश्वरच आहेत. मनात शांती व कृतीत क्रांती हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. महात्मा बसवेश्वरांनी आपले कार्य आणि तत्त्वज्ञान त्यांनी वीरशैव सांप्रदायाच्या माध्यमातून मांडले असले तरी ते सर्व मानव जातीच्या उद्धाराचे आहे. त्यांच्या कार्याचा कदापि विसर पडू नये. त्यासाठी स्मरण चिंतन नित्य होणे आवश्यक आहे. ते म्हणतात “माझ्यापेक्षा लहान कोणी नाही, शिवभक्तापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही, मानवाने नेहमी पंचशिलाचे कठोरपणे पालन करावे. १)अहिंसा २) सत्य ३) अस्तेय ४) परनिंदा ५) स्वतःची स्तुती..
कधीही करू नये. राज्याचा कारभार करते वेळेस सामाजिक सुधारणा केल्या. सर्व समाज एक आहे म्हणून त्यांनी आंतरजातीय विवाह मान्यता दिली.कनिष्ठ जातीतील मुलगा व उच्चवर्णीय जातीतील मुलगी त्यांच्या संमतीने विवाह करून देऊन त्यांना आशीर्वाद दिला हा प्रतिलोम विवाह होता हा पारंपारिक पद्धतीने झालेला विवाह नव्हता हा अधर्म आहे. म्हणून सनातन लोकांनी त्यांच्याविरुद्ध मोठे आंदोलन उभे केले. या आंदोलनाला सामाजिक रूपातून राजकीय क्रांतीकडे नेले. राजा बिज्जलाकडे तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे त्यांचे मन क्लुषित झाले. आंदोलक जे बोलतात तेच खरे आहे.असे राजाला वाटू लागले. दोन जंगम एकत्रित येऊन राजाची बदनामी करतात.निंदा करतात असे चर्चा सर्व सामान्य लोकांमध्ये कानोकानी झाली. त्यामुळे राजा क्रोधित होऊन त्यांनी आंतरजातीय विवाह करून देणाऱ्या दोन्ही जंगमांना हत्तीच्या पायी दिले. या सर्व गद्दारोळात अनेक वाईट घटना घडल्या. त्यामध्ये राजा बिज्जल ठार झाले. महात्मा बसवेश्वराची अमृतवाणी पुढील प्रमाणे होती.चोरी करू नका.हिंसा करू नका. खोटे बोलू नका .स्वतःचे स्तुती करू नका. सर्व प्राणीमात्रा दया करा. सत्य बोलणे म्हणजे देवलोक होय. खोटे बोलणे म्हणजे मृत्यूलोक होय. आपले बोलणे मोत्याच्या माळे प्रमाणे असावे. माणिक रत्नाच्या दिप्तीप्रमाणे असावे. दुर्गणी, व्याभिचाराला त्यांनी अजिबात स्थान दिले नाही. देव फक्त एकच आहे .असे त्यांचे ठाम मत होते.शूद्र व महिलांना सन्मानाने व स्वाभिमान पूर्वक जीवन जगायला शिकविले. स्त्री-पुरुष,उच्च- नीच,कनिष्ठ-वरिष्ठ गरीब -श्रीमंत असा कोणताही भेदभाव त्यांनी अनुभव मंटपात कधीही केलेला नाही.भारतात सामाजिक एकात्मता अतिशय महत्त्वाची आहे.जातीविरहित स्त्री-पुरुषांना समान हक्क देणारी श्रमाचे पावित्र्य पटविणारी आणि शुद्ध आचरणाला प्रथम स्थान देणारी अनुभव मंटप ही संस्था आजच्या काळात ही लोकशाही संसदेचे मूळ स्वरूप त्या काळात तयार केले होते. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाने जे कार्य हाती घेतले होते. तेच कार्य कर्नाटक राज्यामध्ये महात्मा बसवेश्वरांनी हाती घेऊन सामाजिक, राजकीय,आर्थिक क्रांती केली म्हणून ते राज्यकर्ते संत व क्रांतिकारक योगी मानले जातात.
त्यांनी निर्गुण,निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला.सर्व मानव जातीला एकाच सूत्रात गुंफविले कधीही कोणताच भेदभाव केला नाही म्हणून त्यांना समतेचे प्रणेते असेही म्हणतात.

*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत*
संस्थापक: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि. नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *