कंधार तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला आपल्या वृत्तपत्रावून न्याय मिळवून देण्यासाठी सदैव असणारे तरुण तडफदार व अभ्यासू पत्रकार राजेश्वर कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा कार्याचा गौरव म्हणून घेतलेला लेख आहे .. राजेश्वर कांबळे यांना युगसाक्षी परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व पुढील कार्यास शुभेच्छा …!
जे जे आपणाशी ठावे..ते ते..इतरांशी सांगावे…शहाणे करून सोडावे…सकळ ‘जन’… या संत साहित्यातील ओळी प्रमाणे आपल्या मराठी मायबोलीला आपल्या वृत्तपत्रामध्ये प्रखर लेखणीतून बातमीची ओळख करून देणारे, मन्याड खोऱ्यातील एका लहान कुटुंबात जन्माला आलेला हा अवलिया म्हणजे राजेश्वर कांबळे हा होय. या पत्रकाराने आपली ओळख मुद्रित माध्यमांसोबतच प्रसार माध्यमांवर मराठी सर्जनशील वाचकापुढे बातमीच्या माध्यमातून केल्याचे दिसून येते. खऱ्या अर्थाने मुद्रित माध्यमाचा सृजनशील पत्रकार राजेश्वर कांबळे काही सृजनशील वाचकांसमोर चर्चिला जातो. म्हणूनच अवघ्या कमी वयात आणि कमी कालावधीत गेली दोन दशके मुद्रित माध्यमात काम करत असताना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आरोग्य, कृषी, प्रशासकीय आणि धार्मिक बातम्यांना प्रसिद्धी देऊन आपले नाव या वृत्तपत्रसृष्टीत कोरले आहे.
राजेश्वर कांबळे यांनी आपले प्राथमिक शिक्षण महात्मा फुले प्राथमिक शाळा, कंधार येथे घेतले. श्री गणपतराव मोरे विद्यालय, कंधार येथून शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन आपल्या खऱ्या जीवनाला मुहूर्तमेढ रोवण्याचा प्रयत्न केला. तदनंतर त्यांनी आपले उच्च माध्यमिक आणि पदवीपर्यंत शिक्षण श्री शिवाजी कॉलेज, कंधार येथे घेऊन आई-वडील आणि कुटुंबातील काही प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली पदवीत्तर शिक्षण घेण्याचा संकल्प केला. तसेच एम.ए.अर्थशास्त्र विषयाचे शिक्षण महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथून पूर्ण केले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर स्वामी रामानंद तीर्थ अध्यापक महाविद्यालय, कंधार येथून बी.एड.पदविका संपादन केली.
वृत्तपत्रांमध्ये पदार्पण करण्यापूर्वी वृत्तपत्र विक्रेता दत्तात्रय मामडे आणि रत्नाकर फरकंडे यांच्याकडे काही काळ अवघ्या दीडशे रुपयांमध्ये वृत्तपत्र वितरणाचे काम केले. यातूनच त्यांना वृत्तपत्राची गोडी आणि लळा लागला. वृत्तपत्राच्या दैनंदिन सहवासात येऊन त्यांनी काही काळ छोट्या-मोठ्या दैनिकातून आपलं लिखाणाचं कार्य सुरू ठेवलं. तत्कालीन दैनिक पुण्यनगरीचे कंधार प्रतिनिधी जी.आय.कुरेशी सरांनी राजेश्वर कांबळे यांना दैनिक मराठवाडा नेता या वृत्तपत्राला लिखाण करण्याची संधी उपलब्ध करून दिली. औरंगाबाद येथील दैनिक देवगिरी तरुण भारत, दैनिक देशोन्नती, दैनिक नांदेड आज, आणि दैनिक बहुरंगी वार्ता या वृत्तपत्रामध्ये काम केले. आजघडीला शिक्षण आणि पत्रकारिता अनुभव यांची अतुट जोड असल्यामुळे कोणत्याही बातमीला विशेष दर्जात्मक लिखाणाद्वारे सर्जनशील वाचकांचे मन आपलेसे करून घेण्याचा संकल्प करतो. आज मुद्रित माध्यमात काम करत असताना विविध सामाजिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आरोग्य, शेती आणि धार्मिक क्षेत्रातील बातम्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देऊन राजेश्वर कांबळे हे नाव आजतागायत जिल्ह्यामध्ये नाव कोरलेले आहे.
गेली अनेक वर्ष वृत्तपत्रामध्ये काम करत असताना विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दर्जेदार कामांच्या बातमीला प्रसिद्धी दिली आहे. एवढेच नव्हे तर सार्वत्रिक निवडणुकीत काम करत असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बातम्यांसाठी राजेश्वर कांबळे यांनी उल्लेखनीय बातमी लेखन करून आपल्या लेखणीची ओळख निर्माण केली आहे. पत्रकार राजेश्वर कांबळे यांना कमी कालावधीमध्ये अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. प्रथमतः राजेश्वर कांबळे यांना नेहरू आंतरराष्ट्रीय सामाजिक पुरस्कार, राज्यस्तरीय पत्रकाररत्न पुरस्कार, कोविड योद्धा पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, मराठवाडास्तरीय शोध वार्ता पत्रकारिता पुरस्कार मिळाला आहे. बातमी लेखनासाठी त्यांनी आपली लेखणी तत्परपणे कधी न थांबता ती वृद्धिंगत करण्यासाठी पत्रकारितेतील मथळे लिहिण्याचे काम त्यांनी सतत सुरू ठेवल्यामुळे त्यांना उज्वला या सामाजिक संस्थेच्या वतीने दर्पण पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. एवढेच नव्हे तर 2025 मध्ये ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने यावर्षीचा राज्यस्तरीय जनहित दर्पण पत्रकारिता पुरस्कार देऊन सोनखेड येथील कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात आला. तत्कालीन कंधार नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रमोद सवाखंडे यांनी केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानचे स्वच्छतादूत म्हणून त्यांची निवड केली. या निवडीमुळे शहरातील स्वच्छ भारत अभियानाला चालना मिळाली.
अशा या किर्तीवंत पत्रकाराला वाढदिवसानिमित्त विपुल शुभेच्छा. पुन्हा राजेश्वर कांबळे यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आरोग्य, कृषी आणि प्रशासकीय, शोधनिबंधपर बातमी वृत्तपत्रातून प्रसिद्धीस देऊन राज्य शासनाचा दर्पण पुरस्कार मिळवण्यासाठी अशीच आपली लेखणी अविरतपणे सुरू ठेवावी. अशा पत्रकारास वाढदिवसानिमित्ताने ‘विपुल’ शुभेच्छा.
– विपुल बोमनाळीकर
मो.९९७५९३९३५८