जाऊ संतांच्या गावा : गुरू रविदास महाराज* 15 फेब्रु जयंती विशेष

महाराष्ट्र ही संताची भूमी आहे.सर्व मानव समान आहेत. सर्वांनी एकत्रित येऊन सत्कृत्ये करावीत.व्यक्ती व्यक्तीतील मतभेद समाजाला घातक असतो. समाजाला सुधारण्यासाठी एकजूटतेची आवश्यकता असते. समाजात भेदाभेद करून कोणतेही कार्य व्यवस्थितपणे पार पडत नाही. असे स्पष्ट पणे समाजाला घडविणारे सहिष्णुतावादी विश्ववंदनीय संत म्हणून ज्यांचे आजही नाव तेवढ्याच तत्परतेने व स्वच्छ भावनेने घेतले जाते. ते श्री गुरु रविदास महाराज यांची जयंती आपण उत्साहाने साजरी करत आहोत.ही जयंती सर्व समाजातील लोकांनी एकत्रित येऊन साजरी करावी. संत हे जातीनुसार विभागले जाऊ नयेत.भेदाभेद निर्माण झाली की,समाजाचे,व्यक्तीचे महत्त्व थोड्या फार प्रमाणात कमी होते. असे म्हटले जाते.सर्व व्यापक परमेश्वर आहे.आपण प्रत्येकाचे झेंडे आणि संत, महंत विभागून घेतले आहेत.

त्यामुळे आपापली चाललेली समाजाची रचना विषमतेवर आधारितआहे. काय? असा सहज प्रश्न पडत आहे. सांग मी कोणता झेंडा हाती घेऊ? असे म्हणण्याची वेळ प्रत्येक व्यक्तीला आली आहे.
ठराविक लोकच त्या जातीतील आपल्या संतांच्या जयंती,स्मृतीदिन उत्साहाने साजरी केल्यामुळे समाजाच्या मनात संकुचित वृत्ती निर्माण होत आहे. असे सध्या वाटत आहे.*विद्वान सर्वत्र पूज्यते* असे म्हटले जाते. साधूसंताना कोणतीही जातपात नसते. ‘यारे यारे लहान थोर ‘असे म्हणून ते समाजाला घडवितात. परंतु अलीकडच्या काळात स्वार्था:पोटी प्रत्येकांनी आपापली स्वार्थाची पोळी कशी भाजून घेता येईल हाच विचार करत आहेत. त्यामुळे जातीनुसार.धर्मानुसार जयंती,पुण्यतिथी साजऱ्या होत आहेत. ही खेदाची बाब आहे.
वज्रमूठ तयार करण्यासाठी पाच बोटांची आवश्यकता असते.

तसे सर्व समाज एकत्रित करण्यासाठी साधुसंतांनी सांगितलेल्या विचारांची गरज आहे. म्हणून भक्तांनो आपण सर्व एक आहोत हा नारा पुढे चालू राहिल्यास मोठ्या प्रमाणात त्यांचे उत्सव साजरी होतील.
थोर मानवतावादी व विज्ञानवादी संत म्हणून गुरू रविदासाची ख्याती जगभर पसरली आहे *मन चंगा तो कटौती में गंगा* असे म्हटले जाते. मनाचे पावित्र्य असेल तर कुठूनही गंगाजल निर्माण होते.देव कधीही कोणाची जात पाहत नाही. म्हणून गुरू रविदासांनी आपल्या निर्मळ वाणीने आणि पवित्र आचरणाने हे सिद्ध केले. ते शांत वृत्तीचे मानवता वादी सहनशील विद्वान होते.त्यानी मानव जातीला भक्तीतून समानता शिकविली.चांगल्या वाईटांचा सारासार विचार केला जाऊन सामाजिक चेतना वाढीस लागावी हा त्यांचा मुख्य ध्यास होता.म्हणून सामाजिक क्षेत्रात त्यांच्या काळात फार मोठी क्रांती झाली.त्यांची भक्ती अगदी निर्मळ व स्वच्छ होती.त्यांचे कीर्तन ऐकताना लोक तल्लीन होत असत.त्यांची भक्ती पवित्र असल्या मुळे त्यामध्ये भाव होता.
देव हा भक्तांच्या भावाचा भुकेला आहे. त्याची परिचिती त्यांना आली.
ही गोष्ट काही उच्चवर्णीयांना आवडत नव्हती. त्यामुळे ते संत गुरू रविदासाबद्दल वाईट बोलू लागले.
आपली बरोबरी करतो काय?
असे त्यांना वाटत होते. लोक त्यांचा जयजयकार का करतात? त्यामुळे आपला अपमान होतो ?
असे अनेक दुष्ट लोकांना वाटू लागले. त्यावर कृतीतून उत्तर देणारे महान विद्वान संत गुरू रविदास महाराज
काशी जवळच्या (मंडूर) या खेड्या मध्ये लहरतारा तलावाजवळ रघु व कर्मादेवी यांच्या पोटी जन्माला आले. त्यांचा चामड्याचा मोठा व्यवसाय होता.घोड्याचे लगाम व स्त्री-पुरुषांचे वाहणा उत्तम प्रकारे तयार करून त्यांचे जीवन चरित्र चालवत होते. समाजामध्ये दोघा पती-पत्नींना प्रतिष्ठा होती.
वैदिक काळातील परंपरे नुसार
ते अस्पृश्य समजत असले तरी त्यांची धार्मिक साधना फारच उच्च कोटीची होती. त्यामुळे त्यांच्या पोटी अतिशय विद्वान बालक जन्माला आले;
त्यांचे नाव त्यांनी रथदास असे ठेवले.
पुढे हेच नाव रोहिदास,रैदास,रविदास या नावाने सर्वत्र परिचित झाले.

त्यांच्या घरामध्ये इतर लोकही धार्मिक वृत्तीचे होते.बालपणापासून गुरू रविदासांना देवाची आवड होती. ते चर्मोद्योग हा व्यवसाय करीत होते. दुकानात गोरगरीब,संन्यासी,साधू वाहणा खरेदी करण्यास आल्यास त्यांना ते फुकट देऊन टाकत असत. गंगा घाटावर जाऊन भक्ती करत असत. साधुसंताची कीर्तने, प्रवचन ऐकत असत. त्यामुळे त्यांना रात्री घरी येण्यास उशीर होत असे, तेव्हा वडील त्यांच्यावर रागावत असत.
तरीही त्यांच्यावर काही परिणाम होत नसे. ईश्वर एक आहे. त्यांनी वेगवेगळे नाव धारण केले आहेत.असे ते स्पष्ट म्हणत असत. स्वार्थी माणसांनी चुकीच्या कल्पना व भाकडकथा तयार करून त्यांना बंदिस्त केले. असे स्पष्ट मत संत रविदास मांडत असत. हळूहळू ते दुकानांमध्ये लक्ष घालू लागले.चांगले कुशल कारागीर बनले, टिकाऊ मजबूत जोडे तयार करू लागले.असे करता करता त्यांचे विवाहाचे वय झाल्यामुळे आई-वडिलांनी त्यांचा विवाह लोना या मुलीशी करून दिला. त्यानंतर दोघांनी मिळून परिश्रम करून उदरनिर्वाह चालवत असे. संत रविदासांना गुरु रामानंदाचा सहवास लाभल्यामुळे त्यांचे ज्ञान वाढू लागले. त्यामुळे त्यांची कीर्ती सर्वत्र आपोआप पसरली.अनेक ठिकाणचे लोक संत रविदासाला भेटण्यासाठी दुरून दुरून येऊ लागले. शास्त्रावरील प्रचंड अभ्यास पाहून अनेक लोक आश्चर्यचिकित झाले आणि त्यांचे कौतुक केले.अनेक लोकांबरोबर संत रविदासाचे वैचारिक मतभेद झाले. त्यांनी संत कबीराची भेट घेतली,त्यामुळे त्यांच्या ज्ञानात आणखी भर पडली आणि शिष्यांची संख्या वाढत गेली.

त्यांनी मथुरा ,प्रयागराज, वृंदावन येथे वारंवार भेटी दिल्या.राजस्थान, गुजरात,
महाराष्ट्र आणि भारतात दर बारा वर्षांनी भरणारे चार कुंभमेळे, उज्जैन, प्रयाग,नाशिक, हरिद्वार त्या ठिकाणांना भेटी दिल्या,भक्तिमार्गाचा झेंडा त्यांनी भारतभर रोवला. त्यांची राहणी अतिशय साधी होती,पण वाणी शुद्ध होती. त्यामुळे श्रोते तृप्त होत असत.त्यांच्या काळात जाती-धर्माने मान फार वर काढली होती. श्रेष्ठ- कनिष्ठ असा भेदभाव मानला जात असे. सर्व अधिकार आपल्यालाच हवेत. इतरांना ते मिळू नयेत.असे उच्चवर्णीयांना वाटत होते. अस्पृश्य जातीतील लोकांना कोणी वाली उरला नव्हता.अशा वेळी अनेकांना जगण्याचे बळ गुरू रविसादासांनी दिले. हीन-दीन दलितांना उभारी देऊन त्यांच्या मनात नवीन विचार रुजविले, सर्व जातीच्या लोकांमध्ये राहून मिळून मिसळून अडचणी समजून घेऊन त्या दूर केल्या या सर्व गोष्टीमुळे उच्चवर्णीयांनी संत रविदासांना त्रास द्यायला सुरू केले. द्वेष करू लागले. अशा प्रकारे त्यांनी सुरुवातीला स्वतःच्या प्रपंचापेक्षा त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी ज्यादा वेळ दिला. लोक उद्धाराचे काम त्यांनी हाती घेतले. परमार्थिक विचार सरणीनुसार सत्याचे अनुभवातून आलेले ज्ञान तर्कवितर्कापेक्षा कधीही चांगले असते,जो पर्यंत साधकाला परम वैराग्य प्राप्त होत नाही; तोपर्यंत भक्तीच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या सर्व साधना व्यर्थ आहेत. असे ते स्पष्ट बोलत असत.समाजात गुरू रविदास व कबीराविषयी सर्वत्र चांगले बोलले जाऊ लागले या दोघांनाही शिक्षा व्हावी समाजात त्यांची बदनामी व्हावी म्हणून काही उच्चवर्णीयांनी मुद्दाम शासन करते असणारे बादशहा सिकंदर लोधी यांना वाईट माहिती सांगून त्यांचे मन क्लुशीत केले. त्यांनी सैनिकांना सांगून दोघांनाही दरबारात बोलविले त्यावेळेस दोघांनीही आमचे कार्य समाजोपयोगी आहे.

शासन विरोधी नाही असे खंबीरपणाने सांगितले. त्यावेळेस उलट सिकंदर बादशहाने संत रविदासाचे शिष्यत्व स्वीकारले या घटनेमुळे उच्चवर्णी यांच्या कानपटात बसली. भारतामध्ये गंगा नदीला पवित्र नदी म्हणून संबोधले जाते. तिथे स्नान केल्यास आपल्या मनातील इच्छा पूर्ण होऊन पुण्य पदरी पडते. असे गुरू रविदासांना कळाले म्हणून ते ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करण्यासाठी गंगेकडे निघाले, परंतु तिथे अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांना स्नान करता येत नव्हते, म्हणून त्यांना दमदाटी केली, तुमचे गोत्र कोणते? अशा धमक्याही दिल्या “तू नीच कुळातील असून पवित्र समजतो’, गंगे स्नान करतो, धर्मवान म्हणून मिरवतो ;चल येथून बाहेर पड नाही तर प्राणास मूकशील ? असे ही खडे बोल सुनावले. त्यावेळेस संत रविदासांनी शांतपणे उत्तर दिले.
हे जग पृथ्वी,आप, तेज,वायू व आकाश यापासून तयार झाले आहे. आत्मा अमर आहे. मानवाची जात ही मानव आहे.कोणी मोठा, कोणी लहान नाही. आम्ही सर्वांना समान मानतो. असे निर्भिडपणे उच्चवर्णीयांना फटकारले ते सरळ खाली माना घालून निघून गेले. संत रविदास महाराज म्हणतात.जशी तुमची वृत्ती, वासना त्याप्रमाणे देव तुम्हाला देह दान करून या जगात पाठवतो.प्रकृतीचे तीन गुण सत्व,रज,तम आहेत.सर्व जीव चराचरात व्यापून असणारा ईश्वर सर्वा हून निराळा आहे. हे सर्व बोलताना दरबारातील लोक मंत्रमुग्ध होत होते. तेव्हाच न्याय देणारी परमेश्वराची मूर्ती या बोलण्यामुळे लोक त्यांचे शिष्य म्हणून स्वीकार करू लागले.
अनेक वेळेस संत रविदास महाराजांची परीक्षा घेण्यात आली. काही लोकांनी मुद्दाम त्यांना आठ दिवसात वहाणा (जोडे ) तयार करून द्यावेत. असे आदेश दिले जर जोडे आठ दिवसात तयार झाले नाही तर मृत्यू दंडाची शिक्षा भोगण्यास तयार रहा असेही म्हणाले. त्या वेळेत त्यांनी अहोरात्र काम करून जोडे तयार करून ठेवले .चोराने ते चोरून नेले. तरी शेवटी चोरांनी कबूल होऊन त्यांचे जोडे त्यांना परत आणून दिले. त्यामुळे संत रविदासांचा फार मोठा दरबारात सत्कार झाला. राजाने भरपूर द्रव्य दिले तरी ते त्यांनी चोरांना देऊन टाकले.
त्यांना स्वतःचीच लाज वाटू लागली, आणि सर्वांनी गुरू रविदासाचे शिष्यत्व स्वीकारले.अशाप्रकारे एकापेक्षा एक आपल्याला त्यांच्या जीवनातील वास्तविक घटना सांगून त्यांची भक्ती किती श्रेष्ठ दर्जाची होती हे समाजाला सांगता येते. संत मीराबाई ही सुद्धा त्यांची शिष्या होती. त्यांच्या कीर्तनात ती रंगून जात असे. म्हणून मी आजच्या तरुणांना सांगू शकतो की सर्व धर्म स्वभाव प्रीतीने वागून समाजात चालणाऱ्या वाईट फुटी परंपरा याची उच्चाटन व्हावे व सत्याला किंमत यावी आणि गुरु रविदासाचे कार्य आज रामर होण्यासाठी सर्वांनी समतेची तत्त्व अंगीकारल्यास खरोखर त्यांना अभिवादन केल्याचे सार्थक होईल. विठूमाऊली बहुउद्देशीय प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड यांच्या वतीने जयंतीच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन. .

*प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत*
संस्थापक अध्यक्ष : विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि. नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *