नाशिक- यशवंतराव दाते स्मृती संस्था, वर्धा यांचे राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. त्यात २०२३ करिता बापूरावजी देशमुख कथासंग्रह पुरस्कार नाशिक येथील सुप्रसिद्ध साहित्यिक,वक्ता, समीक्षक, एकपात्री नाट्य कलाकार डॉ. प्रतिभा जाधव लिखित ‘दहा महिन्यांचा संसार’ (कोरोना एकल महिलांच्या जगण्याच्या वास्तव कथा) ह्या कथासंग्रहास जाहीर झाला आहे. साहित्य जगतात हा प्रतिष्ठेचा असा पुरस्कार मानला जातो. रोख रक्कम रु.पाच हजार , सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे सदर पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्कार प्रदान सोहळा मार्च २०२५ मध्ये वर्धा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
‘दहा महिन्यांचा संसार’ ह्या कथासंग्रहाचा इंग्रजी अनुवाद ‘अनटोल्ड स्टोरीज ऑफ कोव्हिड 19’ नावाने ऑथर्स प्रेस, दिल्ली यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आला आहे.
डॉ.प्रतिभा जाधव यांना ह्या कथासंग्रहासाठी मिळणारा तिसरा महत्वाचा राज्य पुरस्कार आहे. यापूर्वी ह्या कथासंग्रहासाठी भिंगार येथील पदमगंगा राज्य साहित्य पुरस्कार व म.सा.प. शाखा दामाजीनगर मंगळवेढा यांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पुरस्कार्थी साहित्यिक डॉ.प्रतिभा जाधव यांच्या आजवर एकूण १४ साहित्यकृती प्रकाशित आहेत. त्यात कविता,नाटक, ललित व कथा, वैचारिक इ. साहित्यप्रकारांचा समावेश आहे.
त्या सामाजिक अंगाने विविध नामांकित वृत्तपत्रांत विचारप्रवृत्त करणारे परखड वैचारिक स्तंभलेखन नियमितपणे करत असतात. ‘साहित्यसखी महिला साहित्यिक मंचच्या त्या संस्थापिका अध्यक्षा आहेत.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सदस्य आहेत. त्यांच्या ‘संवाद श्वास माझा’ ह्या काव्यसंग्रहाची इंग्रजी व हिंदी भाषेतील अनुवादित पुस्तके दिल्ली येथील नामवंत प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेली आहेत.