नांदेड, दि. १५ फेब्रुवारीः
येत्या शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर येथे आयोजित भव्य रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रासह व इतर राज्यातील अनेक नामांकित कंपन्या नोकरीची संधी घेऊन आपल्या दारापर्यंत येत असून, सुशिक्षित बेरोजगारांनी या संधीचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री व राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.
शनिवारी दुपारी अर्धापूर येथील नरहरी मंगल कार्यालयात आयोजित मेळावापूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना खा. चव्हाण म्हणाले की, ग्रामीण भागात रोजगार हा प्रमुख विषय आहे. आ. श्रीजया चव्हाण यांनी सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींसाठी विविध उपक्रम राबविण्याचे आश्वासन निवडणूक प्रचाराच्या काळात दिले होते. हा रोजगार मेळावा त्याच आश्वासनाच्या पूर्ततेचा एक भाग असून, या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रासह देशाच्या इतर प्रमुख शहरातील सुमारे १२० कंपन्या सहभागी होणार आहेत. विविध क्षेत्रातील या कंपन्यांमध्ये १० वी, १२ वी, आयटीआय, पदवी, पदव्युत्तर असे विविध स्तरापर्यंतचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध असतील. त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या विविध संस्था, मंडळे, महामंडळे आदींच्या माध्यमातून सुरू असलेले तांत्रिक प्रशिक्षण, कर्ज योजना, अनुदान योजना, शिष्यवृत्ती योजना, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आदींबाबतची माहिती देण्यासाठी या मेळाव्यात स्टॉल्स उपलब्ध असणार आहेत. या रोजगार मेळाव्यातून ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुण-तरुणींना रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा आ. श्रीजया चव्हाण यांचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड, किशोर देशमुख, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गोविंदराव शिंदे पाटील नागेलीकर, भाजपचे प्रदेश सचिव प्रवीण गायकवाड, नांदेड-वाघाळा शहर महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, भाजपा अर्धापूर तालुका अध्यक्ष डॉ. लक्ष्मणराव इंगोले, माजी उपनगराध्यक्ष राजू शेटे, बालाजी गव्हाणे बालाजी खटिंग, भीमराव कल्याण, माधव कदम, संजय औलवार, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शामराव टेकाळे, उद्धवराव पवार, अर्धापूरचे नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, उपनगराध्यक्ष मुख्दर खान, मारुती पाटील शंखतीर्थकर, उत्तमराव लोमटे आदी उपस्थित होते.