नांदेड, दि. २५ फेब्रुवारी २०२५:
यंदाच्या ‘संगीत शंकर दरबार’मध्ये दुसऱ्या दिवशी बुधवारी २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात श्रोत्यांसाठी शास्त्रीय गायन व वादनाची मेजवानी असणार आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण व सौ. कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ होणाऱ्या या सोहळ्यात सालाबादप्रमाणे अनेक नामवंत गायक व वादक सहभागी होणार आहेत. बुधवारी शास्रीय गायिका गौरी पाठारे आणि प्रख्यात गायक डॉ. शशांक मक्तेदार यांचे गायन होईल. जागतिक कीर्तीचे सतार वादक व पद्मभूषण पुरस्कार विजेते पं. बुधादित्य मुखर्जी हे प्रथमच मराठवाड्यातील रसिकांच्या भेटीस येणार आहेत.
याच दिवशी सायंकाळी त्यांच्या सतार वादनाचा कार्यक्रम होईल. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध तबला वादक सोमेन नंदी सुद्धा श्रोत्यांना खिळवून ठेवणार आहेत. नागरिकांनी या नामवंत गायकांच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन ‘संगीत शंकर दरबार’चे आयोजक श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीने केले आहे.