विद्यार्थ्यांनो बिनधास्त परीक्षा द्या ! १० वी,१२ वी तर सुरुवात आहे.. !!

 

सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. काहींच्या परीक्षा मध्यात आल्या आहेत. दोन ते तीन पेपर होऊन गेलेले आहेत. मात्र कुठून तरी निराशा जनक बातम्या येत राहतात. अशावेळी विद्यार्थ्यांना सांगणे आहे की, विद्यार्थ्यांनो दहावी,बारावी इतर आयुष्याची सुरुवात आहे.या परीक्षा म्हणजे तुमच्या आयुष्याची शेवटची परीक्षा नाही. या परीक्षेला कोणतीही निराशा, दुःख, नैराश्य न बाळगता पुढे जा… एखाद्या वर्षी एखादी परीक्षा देता आली नाही किंवा अपयश आले म्हणजे सर्वच संपत नाही जीवन हे सुरूच असते….

अनेक वेळा काही कारणास्तव काही विद्यार्थ्यांचे पेपर बरोबर जात नाहीत. किंवा अपेक्षित त्याला लिहिता येत नाही. काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखादा पेपरही देता येत नाही. अशावेळी निराश होऊ नये. एखादी परीक्षा तुमच्या यशा अपयशाचे सूत्र ठरू शकत नाही… आज ज्यांना यशस्वी म्हणून तुम्ही बघता त्यांनाही कधी काळी दहावी बारावी मध्ये अपयश आले होते…. त्यामुळे या परीक्षेशिवाय मोठी लढाई आयुष्यात असून भयमुक्त व तणाव मुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जाणे हेच महत्त्वपूर्ण आहे.

अपयश ही यशाची पहिली पायरी

सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. ही वेळ विद्यार्थ्यांसाठी तणावाची असते, अनेक ठिकाणी पालकांसाठीही पालकांनी बनवलेली ही परिस्थिती असते. अनेक प्रश्न डोक्यात असतात – पेपर कठीण जाईल का? चांगले गुण मिळतील का? अपयश आल्यास काय करायचे? मात्र, हे लक्षात ठेवले पाहिजे की अपयश हा शेवट नसतो, तर यशाकडे नेणारा एक टप्पा असतो.

आकाश शिंदेचे उदाहरण पुढे ठेवा

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील गुंटूर गावच्या आकाश शिंदेची कथा आजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. बारावीच्या परीक्षेत तो तब्बल चार वेळा नापास झाला. त्याला अनेकांनी हिणवले, जवळच्याही मंडळीने त्याच्यावर टीका केली. मात्र, त्याने हार मानली नाही. अष्टपैलू मेहनत, सातत्य आणि चिकाटीच्या जोरावर त्याने आठ वर्षे संघर्ष केला आणि अखेर MPSC परीक्षेत यश मिळवून महसूल सहाय्यक अधिकारी बनला.

आकाशची ही कहाणी स्पष्ट सांगते की, एक-दोन अपयशांनी आयुष्य थांबत नाही. अपयश आपल्याला अधिक परिपक्व आणि यशासाठी सज्ज करते. त्यामुळे एक-दोन पेपर कठीण गेल्याने निराश होण्याची गरज नाही. अपयश हे यशाचे पहिले पाऊल असते.

अपयशातून शिकण्याचे धडे

अपयश आले तर त्यावर रडत बसण्यापेक्षा त्यातून शिकले पाहिजे. थॉमस एडिसन यांनी बल्ब शोधण्यासाठी हजारो वेळा अपयश अनुभवले. जेव्हा लोकांनी त्यांना विचारले, “तुम्ही हजार वेळा अपयशी झालात?” तेव्हा ते हसून म्हणाले,

“मी हजार वेळा अपयशी झालो नाही, तर मी हजार मार्ग शोधले जे चुकीचे होते.”

त्याचप्रमाणे, बारावी किंवा दहावीच्या परीक्षेत अपयश आले तर त्याचा अर्थ तुमची क्षमता कमी आहे असे नाही, तर तुमची तयारी अजून सुधारण्याची संधी आहे. त्यामुळे आई – वडील, नातेवाईकांनी, स्नेहींनी तुमच्या भल्यापोटी काही बोलले असेल तर ते मनाला लावून घेऊ नका. जितके इनपुट तुम्ही तयार केले आहे. तितके आऊटपुट दिले जाईल. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्यामुळे या परीक्षा देताना आलेल्या आकस्मिक गोष्टींना मनाला न लावून घेता पुढे चालणे सुरू ठेवावे.

विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाचे संदेश

१. अपयशाने खचून जाऊ नका – अपयश म्हणजे पूर्णविराम नसून स्वल्पविराम आहे.

२. सकारात्मक मानसिकता ठेवा – “मी करू शकतो” हा विचार कायम ठेवा.

3. स्वतःच्या चुका ओळखा आणि सुधारणा करा – चुका ओळखून पुढच्या वेळी योग्य रणनीती आखा.

4. स्मार्ट स्टडी करा – पाठांतर न करता संकल्पनांची नीट समजूत करून अभ्यास करा.

5. निरोगी दिनक्रम ठेवा – योग्य आहार, पुरेशी झोप आणि मानसिक स्थिरता याला महत्त्व द्या.

6. योग्य मार्गदर्शन घ्या – शिक्षक, पालक आणि समुपदेशक यांच्याकडून मदत घ्या.

धैर्य आणि आत्मविश्वास महत्त्वाचा

“आयुष्यात न थांबणाऱ्या प्रवाहासारखे रहा. काहीही झाले तरी प्रवास सुरू ठेवा.”

जेव्हा तुम्ही हार मानता, तेव्हा प्रत्यक्षात तुमच्या यशाच्या संधीही संपतात. पण जर तुम्ही प्रयत्न करत राहिलात, तर तुमच्या यशाची शक्यता वाढत जाते.

समुपदेशनाचा लाभ घ्या

सध्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने समुपदेशन सेवा उपलब्ध करून दिली आहे. जर तुम्हाला एखादा पेपर कठीण गेला असेल, किंवा तुम्हाला नैराश्य वाटत असेल, तर घाबरून न जाता समुपदेशन केंद्रांशी संपर्क साधा. दरवर्षी परीक्षा येतात. संधी पुन्हा मिळते. त्यामुळे तणाव टाळा आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.

अंतिम विचार: यशाची गुरुकिल्ली

“एक यशस्वी व्यक्ती आणि एक अपयशी व्यक्ती यांच्यात फक्त एकच फरक असतो – जो व्यक्ती अयशस्वी होतो, तो अपयश स्वीकारूनही जिद्द ठेऊन पुढे चालतो. आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो!त्यामुळे यशस्वी होतो”. त्यामुळे प्रयत्न करणारा आज ना उद्या यशस्वी होणारच आहे.

आजचा पराभव उद्याच्या विजयासाठी आवश्यक असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भयमुक्त होऊन परीक्षांना सामोरे जावे, अपयशाने खचून जाऊ नये आणि आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करावी. यश तुमच्या हाती आहे – फक्त प्रयत्न सुरू ठेवा !

तणावमुक्तीसाठी समुपदेशकांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. लातूर विभागीय मंडळस्तरावर 10 वी साठी 02382-251633 तर 12 वीसाठी 02382-251733 हा हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. मनात कोणताही ताणतणाव आल्यास या क्रमांकावर आपल्याला दूरध्वनी करता येईल.

१० वी साठी हेल्पलाईन क्रमांक

या हेल्पलाईनसाठी नियुक्त केलेले नावे व भ्रमणध्वनी पुढीलप्रमाणे आहेत. कुंभार ए.आर (सहाय्यक सचिव) मो.नं. 9405077991, उच्च माध्यमिक बारावी साठी कारसेकर जे. एस. (व.अ.) मो.नं. 9822823780, डाळींबे एम.यु. (प.लि.) मो.नं. 9423777789, जानकर एच.एस. (व.लि.) मो.नं. 9764409318 आहेत.

माध्यमिक (दहावी) साठी मो.नं. 9420436482, 9405486455, 7620166354 हे भ्रमणध्वनी आहेत. विद्यार्थी, पालक व शाळाप्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दुरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क सकाळी 8 ते सायंकाळी 8 यावेळेत साधावा. तर १२ वी साठी 9371261500, 9860912898,. 9860286857, 9767722071 असे मोबाईल नंबर असून त्याचा पालकांनी विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.

प्रवीण टाके, जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *