नांदेड,दि.1-
नांदेड ही मराठवाडयाची सांस्कृतिक राजधानी आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री असताना मी राज्याला नवीन सांस्कृतिक धोरण दिले. शंकरदरबार व कुसुम महोत्सवासारख्या आयोजनामुळे जिल्हयाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. खरे तर नांदेड जिल्हयाला निगेटीव्ह पेक्षा पॉझिटीव्ह विचाराची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केली.
येथील यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या कुसुम महोत्सवाचे शानदार उद्घाटन सुप्रसिध्द अभिनेते गष्मीर महाजनी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून खा.अशोकराव चव्हाण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आ.अमिताताई चव्हाण, आ.श्रीजयाताई चव्हाण, सुजया चव्हाण, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, आ.जितेश अंतापूरकर, माजी आ.अमरनाथ राजूरकर, रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापिका निती सरकार, ज्येष्ठ पत्रकार शंतनु डोईफोडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, भाऊरावचे उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण, स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, भाजपचे माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना खा. चव्हाण पुढे म्हणाले की, आपण नांदेडमध्ये यापूर्वी अखिल भारतीय नाटयसंमेलन घेतले. मागील 21 वर्षांपासून संगीत शंकरदरबारचे यशस्वी आयोजन करत आहोत. आमच्या घरातील तिन्हीही महिलांनी पुढाकार घेवून सुरु केलेल्या कुसुम महोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे. आगामी काळात नांदेडला सांस्कृतिक व साहित्यिक शहर अशी ओळख निर्माण करुन देण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन घेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करुयात.
कुसुम महोत्सवाअंतर्गत अनेक महिला बचत गटांना प्रोत्साहन मिळते. भोकर तालुक्यातील रेणापूर येथील सुनिता कावळे यांनी आवळयापासून विविध वस्तू बनवून आपल्या व्यवसायाची सुरुवात केवळ 17 हजारांत केली. त्यांचा व्यवसाय आता 17 लाखापर्यंत पोहोचला आहे. भविष्यात त्या अधिक गतीने आपला व्यवसाय वाढवतील असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांचे अनुकरण इतर महिला बचत गटांनी केले पाहिजे असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार शंतनु डोईफोडे यांनी कुसुम महोत्सवाचे आयोजन नांदेडसह मुंबई येथे करावे व अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन नांदेडमध्ये घ्यावे अशा दोन महत्वपूर्ण सूचना केल्या. यावेळी आ.जितेश अंतापूरक र, निती सरकार यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे स्वागतपर प्रास्ताविक संयोजिका आ.श्रीजयाताई चव्हाण यांनी केले.
माझी आई ही माझ्यासाठी सर्वात मोठी गुरु-गष्मीर महाजनी
लहानपणी आमची अत्यंत वाईट आर्थिक परिस्थिती होती. वडील रविंद्र महाजनी सिने क्षेत्रात स्वतःचे नाव कमवण्यासाठी संघर्ष करीत होते. यावेळी माझ्या आईने घरोघरी जावून वस्तू विकल्या. व संसार चालविला. आमच्या संसाराला खऱ्या अर्थाने आधार देण्याचे काम त्यांनी केले. त्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंटचा नवीन व्यवसाय सुरु केला. त्या व्यवसायाने देशभर नाव कमाविले. माझ्या आईने समाजाला दिलेली सर्वात मोठी गिफ्ट म्हणजे मी आहे. मला घडविण्याचे काम माझी आई व बहिण या दोन महिलांनी केले आहे. माझ्या आयुष्याची सर्वात मोठी गुरु माझी आई असून माझ्या जीवनात महिलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे सांगतानाच महिलांना प्रोत्साहान देणारा उपक्रम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुसुम महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाच्या त्यांनी सौ.अमिताताई चव्हाण, आ.श्रीजया चव्हाण,सुजया चव्हाण व त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले.
केवळ कुसुम महोत्सवामुळे मी आज यशस्वी उद्योजक -सुनिता कावळे
रेणापूर सारख्या प्रकल्पात जमीन गेलेल्या गावची मी रहिवासी आहे. कुसुम महोत्सवात आवळयापासून बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन लावावे यासाठी माजी आ.अमिताताई चव्हाण यांनी मला फोन केला. एवढया छोटयाशा खेडयातून येवून नांदेडमध्ये विक्री करणे शक्य नाही. तू जावू नकोस असा सल्ला माझ्या पतीने दिले. परंतु मी माझ्या हिमतीवर सौ.अमिताताई चव्हाण यांच्या फोनमुळे कुसुम महोत्सवात आले. सुरुवातीला केवळ 17 हजार रुपयांच्या आवळयापासून बनवलेल्या वस्तू विकल्या. पुन्हा आत्मविश्वास वाढला त्यानंतर राज्य व देशभर विविध ठिकाणी गेले. आता मला दरवर्षी 17 लक्ष रुपयांचा फायदा होत आहे. हे केवळ फक्त माजी आ.सौ.अमिताताई चव्हाण, खा.अशोकराव चव्हाण यांच्यामुळे घडले. कुसुम महोत्सवासारख्या महिलांना प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमामुळे आज मी येथे यशस्वी उद्योजक म्हणून उभी आहे असेही त्या म्हणाल्या. त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी टाळयांच्या कडकडाटांनी दाद दिली.