२१ वे शतक हे ताणतणाव आणि मानसिक रोगाचे शतक -प्रा.श्रीहरी वेदपाठक

 

भीमाई व्याख्यानमालेचे तेरावे पुष्प संपन्न..!

ज्येष्ठ समाजसेवक एडवोकेट दिलीप ठाकूर यांना गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार प्रदान

मुखेड: (दादाराव आगलावे)

विविध कारणाने व गतिमान जीवनशैलीमुळे ताणतणाव वाढत आहेत. मनुष्याच्या जन्मापासून ताण सुरु होतो तो अखेर मृत्यूपर्यंत असतो. २१ वे शतक हे ताणतणाव आणि मानसिक रोगाचे शतक आहे असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत प्रा. श्रीहरी वेदपाठक यांनी केले.

कै.सौ.भीमाबाई पांडुरंगराव पुंडे स्मृती, मातोश्री भीमाई व्याख्यानमाला व गुरुवर्य पांडुरंग पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा शांतीनगर मुखेड येथे नुकताच संपन्न झाला, यावेळी तेरावे व्याख्यान पुष्प गुंफताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुसदचे ज्येष्ठ समाजसेवक प्रा. नारायणराव क्षिरसागर होते तर प्रमुख अतिथी म्हणून नांदेड येथील ज्येष्ठ समाजसेवक एडवोकेट दिलीप ठाकूर, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. जयश्री ठाकूर, पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. टाकसाळे आयोजक मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे, सौ. माला पुंडे, डॉ. गौरव पुंडे, संजय पुंडे, डॉ. तेजस्विनी पुंडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रारंभी वंदे मातरम् या गीत गायनाने व सावित्रीबाई फुले व स्व.भीमाबाई व स्व. पांडुरंगराव पुंडे यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे करताना व्याख्यानमाला आयोजनामागची भूमिका विशद केली. ज्येष्ठ समाजसेवक एडवोकेट दिलीप ठाकूर यांना गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख राशी अकरा हजार रुपये देऊन प्रदान करण्यात आला. मानपत्राचे वाचन साहित्यिक शिवाजी अंबुलगेकर यांनी केले. एकनाथ डुमणे यांनी व्याख्यात्यांचा परिचय करून दिला. डॉ. सौ. तेजस्विनी गौरव पुंडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शब्दसुमनांनी मानवंदना दिली. प्रा. श्रीहरी वेदपाठक पुढे म्हणाले की, जीवनात आनंदी होण्यासाठी स्वत: हसतमुख रहा आणि इतरांनाही आनंद वाटत राहा, कुटुंबासाठी वेळ द्या, किमान सायंकाळचे जेवण तरी कुटुंबासमवेत एकत्रित करावे, पर्यटन करा, वेळेचे नियोजन करा, आर्थिक नियोजन करा, क्षमाशीलता आणि कृतज्ञता त्याचबरोबर अध्यात्माचा आधार घ्या,
हे जीवनात आवश्यक असते त्यामुळे ताणतणावापासून दूर राहता येईल. प्रत्येकाच्या जीवनात ताणतणाव असतोच. जेवणात जसे मीठ आवश्यक तसे जीवनात पतीसाठी सुसह्य ताणतणाव गरजेचा आहे.
आळशी, रिकामटेकडा जरी मनुष्य असला तरी त्याला ताण आहेच. माणसाने ताणतणावाचे जाळे निर्माण केले आहे आणि त्यातच तो आज गुदमरतो आहे. अध्यक्ष समारोप करताना नारायणराव क्षीरसागर म्हणाले की, तान तनाव हा वैश्विक प्रश्न आहे आणि तो देव देवता पासून चालत आलेला आहे तान तणावाची सुरुवाती कुटुंबांमधूनच होते यासाठी ताणतणावाचे व्यवस्थापन करण्याची आज नितांत आवश्यकता आहे म्हणून आजच्या व्याख्यानमालेचा विषय ताणतणाव व्यवस्थापन हा ठेवलेला आहे. यावेळी पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनीही आपले विचार मांडले. एडवोकेट दिलीपसिंह ठाकुर यांनी पुरस्कारास उत्तर देताना म्हणाले की, डॉ दिलीप पुंडे हे हिमालया एवढ्या उंचीचे व्यक्तिमत्व आहेत. हिमालया एवढ्या उंचीच्या व्यक्तींनी डोंगराएवढ्या छोट्या व्यक्तीस पुरस्कार द्यावा हे माझ्यासाठी भूषणावह बाब आहे. हा पुरस्कार मी कदापिही विसरू शकणार नाही.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांनी केले तर डॉ. गौरव पुंडे यांनी आभार मानले. पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी ग्रंथ खरेदी केली. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर संघटनेचे पदाधिकारी व सदस्य, पत्रकार, वकील, सुप्रभात मित्र मंडळाचे सदस्य, जिप्सी मॉर्निंग ग्रुपचे सदस्य, मायबोली मराठीचे सदस्य, संजीवन सकाळचे सदस्य, रोटरी क्लब, व्यापारी, मुखेड, कंधार, बा-हाळी, जांब, व परिसरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *