अहमदपूर ( एन डी राठोड )
पुरोगामी साहित्य परिषद तर्फे काल दि १० मार्च 25 रोजी येथील महात्मा बसवेश्वर चौकातील आशा हाॅटेलमध्ये विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मान्यवरांचे हस्ते त्यांचे सत्कार करण्यात आले. त्यामध्ये शिरूर ताजबंद महाविद्यालयाचे प्रा डॉ उन्मेश शेकडे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या जिल्हा कार्य अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, धर्मपुरी येथील शंकरराव गुट्टे महाविद्यालयातील प्रा आर के गजलवार यांनी गारपीट या कविता संग्रहावर समिक्षण लिहून प्रकाशित केल्याबद्दल , तसेच महाराष्ट्राचे विद्रोही साहित्यिक आणि राष्ट्रीय बोधिसत्व फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र कांबळे यांनी संभाजीनगर येथे झालेल्या १९ व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीमध्ये सक्रिय राहून संमेलन पार पाडल्याबद्दल त्यांचाही
मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्रोही साहित्यिक श्री राजेंद्र कांबळे यांनी असे सांगितले की विद्रोही मराठी साहित्य संस्कृती चळवळ ही भारताची मूळ मराठी साहित्य संस्कृती चळवळ आहे. या साहित्य संस्कृती चळवळीने भारतातील मातब्बर तसेच तळागाळातील आणि तांड्या वस्ती मधील साहित्यिकांना न्याय मिळवून दिलेला आहे. अडगळीस पडलेल्या साहित्यिकांना विचारपीठ मिळवून देण्याचं काम विद्रोही मराठी साहित्य संस्कृती चळवळीनं केलेलं आहे. प्राचार्य डॉ ना य डोळे यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या उदगीर नगरीमध्ये डॉ अंजुम कादरी सारख्या एका सामान्य महिलेने अखिल भारतीय 16 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन अत्यंत यशस्वीरित्या पार पाडले. गणेश विसपुते सारखे प्राख्यात विद्रोही साहित्यिक त्या संमेलनाचे अध्यक्ष होते .
अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य विचारपीठ हे बहुजनांचं आहे असेही त्यांनी सांगितले. या सत्कार समारंभाचे आयोजन पुरोगामी साहित्य परिषदेचे सचिव श्री एन डी राठोड यांनी केले. या सत्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उदगीरचे साहित्यिक कवी शिवाजी स्वामी हे होते .या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा भगवान अमलापुरे यांनी केले . आभार साहित्यिक श्री गणेशराव चव्हाण यांनी मानले.

