कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी एमआयडीसी प्राधिकरणाला केल्या विविध सूचना
तीन महिन्यानंतर हस्तांतरणाची कार्यवाही
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी केली विमानतळ व परिसराची पाहणी
नांदेड दि. 20 मे : नांदेड येथून सध्या अनेक मोठया शहरात विमानसेवा सुरु आहे. नांदेड येथील विमानतळ सध्या एमआयडीसीच्या ताब्यात असुन लवकरच ते महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्यात येणार आहे. यासाठी आज महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी विमानतळ परिसराची पाहणी करुन औद्योगिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे एसआर मॅनेजर रोहित राहपाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी निशिकांत देशपांडे, नियोजन अधिकारी भक्ती चितळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र गावडे, कार्यकारी अभियंता कल्पेश लहीवाल, मो जावेद व बेग उप अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आदीची उपस्थिती होती.
विमानतळावरील विविध सुविधांबाबत औद्योगिक विकास महामंडळाने येत्या तीन महिण्यात सुधारणा करावी. विमानतळावरील अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी सूचना महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे केली. तसेच विमानतळावरील मनुष्यबळ भरती प्रक्रीया, पाणीपुरवठा तसेच विद्युत पुरवठा सुरळीत होईल यांची दक्षता घेणे. विमानतळावर प्रवाशांना देण्यात येणाऱ्या विविध सुविधामध्ये सुधारणा करण्याबाबत सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच येत्या तीन महिण्यात या सर्व सुविधा उपलब्ध केल्या नंतर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे विमानतळ हस्तातंरणाची कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विमानतळावरील धावपट्टी, ॲब्युलन्स, अग्निशामक व इतर आवश्यक त्या वाहनाची, तसेच स्कॅनर मशिन अशा सर्व बाबीची पाहणी केली.

