*रावसाहेब दानवेंनी घेतला होता पुढाकार;*
*खा. अशोकराव चव्हाणांनी मानले आभार*नांदेड, दि. १३ जून २०२५:
रेल्वे बोर्डाने नांदेड- मुंबई- नांदेड वंदे भारत एक्सप्रेससाठी वेळापत्रक प्रस्तावित केले असून, त्याला मंजुरी मिळाल्यानंतर भारताची ही वेगवान व अत्याधुनिक रेल्वे लवकरच नांदेडकरांच्या सेवेत दाखल होईल.
रेल्वे बोर्डाच्या प्रस्तावानुसार, ही वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावेल. नांदेडहून पहाटे ५.०० वा. निघून दुपारी २.२५ ला मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला पोहोचेल, तर मुंबईहून दुपारी १.१० वा. निघून नांदेडला रात्री १०.५० ला पोहोचेल. नांदेडकर प्रवाशांची ही बहुप्रतिक्षित सेवा सुरु होत असल्याबद्दल खा. अशोकराव चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे राज्यमंत्री रवनीतसिंह बिट्टू यांचे आभार मानले आहेत.
खा. अशोकराव चव्हाण यांनी नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे श्रेय माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना दिले आहे. त्यांनीच २०२३ मध्ये नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची घोषणा केली होती. त्यांच्या मंत्रीपदाच्या काळातच ही गाडी मुंबईहून जालनापर्यंत सुरू झाली. जालना ते नांदेड दरम्यानच्या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर ही गाडी नांदेडपर्यंत धावणार असल्याचे पूर्वनियोजित होते. त्यानुसार, रेल्वे बोर्डाने नांदेड-मुंबई-नांदेड प्रवासाचे वेळापत्रक प्रस्तावित केल्याने नांदेडहून ही सेवा लवकरच सुरु होणे निश्चित झाले आहे.

