मुखेड: प्रतिनिधी
श्री खंडोबा मंदिर देवस्थान सांगवी बेनक यांच्या माध्यमातून खंडेश्वर महाराज यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा, प्रोत्साहन मिळावे आणि त्यांनी मिळविलेल्या यशाचे कौतुक व्हावे या उद्देशाने आयोजित केलेला विद्यार्थी गुणगौरव सोहळा अत्यंत कौतुकास्पद असून सर्वांसाठी उपयुक्त ठरणारा आहे असे प्रतिपादन मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉ. तुषार राठोड यांनी केले.
तालुक्यातील सांगवी बेनक येथील श्री खंडोबा मंदिर देवस्थानच्या वतीने आणि श्री खंडेश्वर महाराजांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव सॊहळ्याच्या प्रसंगी बोलत आ.राठोड बोलत होते. ते पुढे म्हणाले की, तालुक्यातील सांगवी बेनक येथे नेहमीच विविध उपक्रम राबवत आपले वेगळेपण जपलेले आहे. त्यासोबतच एवढ्या ग्रामीण भागामध्ये असूनही अनेक अडचणीवर मात करत विधायक कामकला प्राधान्य देते. मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघात काम करत असताना प्रत्येक गावात – वाडी – तांड्यावर पोहचत विविध माध्यमातून विकास करत असल्यानेच या मतदारसंघातील लोकांनी इतिहासात पहिल्यांदाच सलग तिसऱ्या वेळी मला निवडून दिले. आजची उपस्थिती पाहून सांगवी बेनक गावातील लोकांनी सातत्याने मागील अनेक वर्षे राठोड परिवारावर नितांत प्रेम केले आहे. त्याची पावती म्हणजे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित लोकांची गर्दी असून मी नेहमीच सांगवी गावाच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. श्री खंडोबा मंदिर देवस्थानच्या विकासासाठी आमदार निधी मधून दहा लाख रुपयांची मदत करतानाच भविष्यातही मदत करण्याचे जाहीर केले.
यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला देवस्थानच्या वतीने खंडोबा मंदिरात श्री देव खंडोबा यांची महाआरती आ.डॉ. तुषार राठोड यांच्या हस्ते करण्यात आली. ग्रामस्थाकडून फटाके फोडत आणि वाजत गाजत साहेबांना कार्यक्रम स्थळी आगमन स्वागत केले गेले. कार्यक्रम स्थळी विद्येची देवता देवी सरस्वती आणि श्री खंडोबा यांच्या प्रतिमेचे पूजन आ. डॉ. तुषार राठोड यांनी करून दीपप्रज्वलन केले. यावेळी देवस्थानच्या वतीने डॉक्टर तुषार राठोड यांचा घोंगडी, शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि काठी देऊन सत्कार करण्यात आला. त्यासोबतच उपस्थित सर्वांचे सत्कार खंडोबा मंदिराच्या ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन विजयकुमार मस्कले यांनी करताना म्हणाले की, मागील काही दिवसापासून खंडेश्वर महाराजांच्या माध्यमातून सातत्याने विविध उपक्रमाचे आयोजन करत, सांगवी बेनक गावाला नवी ओळख मिळवून दिली आहे. त्यातील एक भाग म्हणजे हा गुणगौरव सोहळा आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून देवस्थानचा सर्वांगीण विकास होण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. आपल्या मनोगतामध्ये श्री खंडेश्वर महाराज यांनी खंडोबा मंदिराच्या माध्यमातून भविष्यातही समाजोपयोगी असेच विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करून लोकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल ऋण व्यक्त केले. या कार्यक्रमाला माजी सभापती हणमंतराव मस्कले तब्येतीच्या कारणाने उपस्थित नसल्याने, भ्रमणध्वनी वरून शुभेच्छा देत उपक्रमाचे कौतुक केले. त्यानंतर गावातील विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि शैक्षणिक साहित्य देऊन आमदार डॉ. तुषार राठोड साहेबांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र पोलीस दलामध्ये निवड झालेल्या गावातील शिवानंद विश्वनाथ डोंगळे यांचाही यावेळी साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास डॉ. काळे, डॉ. कलेटवाड, श्री. शंतनू सर यांच्यासह ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, उपचेअरमन, सदस्य, शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी, विविध संस्था – मंडळे यांचे प्रतिनिधी, गुणवंत विद्यार्थी, पालक, तरुण वर्ग आणि ग्रामस्थ प्रचंड मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री खंडेश्वर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली समस्त ग्रामस्थ मंडळींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटी आणि गावातील लोकांचे विशेष सहकार्य लाभले.

