
मल्लखांब नामशेष होण्याच्या मार्गावर’..! आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन :15 जून
मनोरंजन व शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे खेळ होय. खेळणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. शिकार हा जसा उदरनिर्वाहाचा मार्ग होता,तसा खेळ हा मनोरंजनाचा एक भाग आहे.
भारतीय क्रीडा प्रकारात मल्लखांब अतिशय महत्त्वाचा व्यायाम प्रकार आहे. पण आजची तरुण पिढी या क्रीडा प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे. प्रत्येक जण व्यायाम शाळेत जाऊन खेळाचे प्रकार शिकत आहेत. जिम मध्ये जाऊन व्यायाम करणे हा प्रतिष्ठेचा प्रकार मानला जात आहे.
जो तो उठसूठ जिम मध्ये जाऊन शरीर बलवान, काटक झाल्याचे सांगतो.परंतु मल्लखांब हा क्रीडा प्रकार प्राचीन काळापासून भारतात सुरू आहे. तो नामशेष होतो की काय?अशी मनात भीती निर्माण झाली आहे.सध्याची तरुण पिढी या खेळाकडे खरोखरच दुर्लक्ष करीत आहे.सध्या मोबाईल मुळे सर्वच खेळाकडे जाणून-बुजून लहानापासून ते वृद्धापर्यंत दुर्लक्ष केले जात आहे.हे वास्तविक व कटू सत्य आहे.
आज आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन असल्यामुळे त्याची माहिती तरुण पिढीला व्हावी,त्यांचे शरीर बळकट व्हावे, शारीरिक कसरती कराव्यात मातीतले खेळ खेळावेत.नैसर्गिक दृष्ट्या शरीराला उपयुक्त असलेले खेळ खेळावेत या उद्देशाने हा लेखन प्रपंच…1818 मध्ये पेशव्याच्या काळात ही मल्लखांबाचेआखाडे चालू होते. तेव्हाच त्याचा जन्म झाला अशी नोंद सापडते.नंतर मल्लखांब खेळाची सुरुवात नाशिक मधून ही झाली त्याच नाशिकात आज हा खेळ लोप पावत चालला आहे.याची मनाला खंत वाटते.वणी,त्र्यंबकेश्वर,कोठारे या गावातील आखाडे आता कमी झालेले आहेत.प्रशिक्षक बोटावर मोजण्या एवढे शिल्लक राहिलेले आहेत.नवीन येणाऱ्या खेळाडूंची संख्या अतिशय त्रोटक असून त्यामुळे या खेळाविषयी उदासीनता सर्वत्र निर्माण झाली आहे.1936 मध्ये झालेल्या जर्मनीची राजधानी बर्लिन येथील ऑलिंपिक स्पर्धेत मल्लखांब क्रीडा प्रकाराचे प्रात्यक्षिक सादर केले होते.
त्यामुळे हा क्रीडा प्रकार जगाला ज्ञात झाला. आज जर्मनीतील कोलून विद्यापीठात मल्लखांबाचा सराव व संशोधन पर कार्य चालू आहे. त्यानंतर युरोप खंडातील अनेक देश या खेळाचे तोंड भरून कौतुक करतात. अनेक ठिकाणी कवायती सादर केल्या जातात. महाराष्ट्र,आंध्र प्रदेश,कर्नाटक
,गुजरात,पंजाब,बिहार,उत्तर प्रदेश,वाराणसी,ग्वाल्हेर,इंदोर,
उज्जैन,भोपाळ,बडोदा,सुरत येथे आजही कमी जास्त प्रमाणात आखाडे मल्लखांबाच्या कवायतीचे प्रात्यक्षिक व सराव चालू आहेत. म्हणून तरुणांनी मल्लखांबाचे प्रात्यक्षिक सादर करावेत. आपल्या देशाची शान वाढवावी. मर्दानी खेळ खेळावेत. शरीर पिळदार बनवावे. कुस्तीगीर खाशाबा जाधव सारखे नाव देशात अजरामर करावे व या खेळाला पूर्वीची प्रतिष्ठा मिळवून द्यावी.बाळंभट्ट दादा देवधर हे मल्लखांबाचे जनक आहेत. कुस्तीपटूच्या अंगी फक्त शक्ती असून चालत नाही, तर त्यांच्या अंगात चपळता,लवचिकता तसेच अनेक प्रकारचे वेगवेगळे डावपेच असणे अतिशय गरजेचे आहे.
या सर्व गुणाबरोबर कुस्तीगीरांचा दम सुद्धा वाढणे महत्त्वाचे आहे. मल्लखांब हा साधारणपणे दोन ते अडीच मीटर उंचीचा असून
तो सागवानी लाकडाचा असतो. वरच्या दिशेने निमुळता व खालच्या दिशेने जाड असतो. सर्वसाधारणपणे मल्लखांबाचे अंग,मान व बोंड असे तीन भाग पडतात. सगळ्यात वरचा गोलाकृती भाग म्हणजे बोंड होय. मध्यभागी असलेला व निमुळता नसलेला भाग म्हणजे मान होय. मल्लखांबाच्या बुंध्यापासून माने पर्यंतच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास अंग असे म्हणतात.
आता आपण पूर्वीच्या मल्लखांबाच्या प्रकाराविषयी माहिती घेऊ.. त्यात 1) वेताचा मल्लखांब, 2) हल्यारी मल्लखांब, 3) पलित्याचा मल्लखांब 4) उसाचा मल्लखांब असे चार प्रकार पडतात, तर आताच्या मल्लखांबाचे तीन प्रकार आहेत.1) पुरलेला मल्लखांब 2) टांगता मल्लखांब 3) दोरीचा मल्लखांब.
अशाप्रकारे एकाच मल्लखांबाचे असे अनेक प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहता येतात. खरोखर हे अनेक प्रकार व्यायामाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत.सर्व विद्यालयांमध्ये मल्लखांबाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना द्यावे. शासनाने विद्यार्थ्यांच्या वाढीसाठी व तंदुरुस्तीसाठी मल्लखांब प्रत्येक शाळेत उपलब्ध करून दिल्यास अढी,तेढी,बगली,दसरंग,फिरकी, सुईदोरा,वेल,उतरती, झाप
,चमत्कृतिजन्य कामे,सलाम्या, ताजवे,उड्या,आरोहण- उड्या आसने,फरारे असे 16 प्रकारचे कौशल्य शिकविले जातील हे या ठिकाणी आवर्जून सांगावे वाटते. खरोखर मल्लखांब हा किती महत्त्वाचा आहे. हे आता आपल्या लक्षात आले असेल, सगळ्यात व्यायामाचा महत्त्वाचा आणि वरच्या दर्जाचा प्रकार म्हणजे मल्लखांब होय.याच्यापासून आरोग्याला चांगला लाभ होतो आपले शरीर पिळदार बनते ,
शरीराच्या आतील इंद्रियेच्या क्रिया सुधारतात. सर्व स्नायूंना उत्तम प्रकारे ताण पडून ते मजबूत होतात. या कौशल्यामुळे शरीर लवचिक होते. पुष्कळ वेळा डोके वर पाय खाली, पाय वर डोके खाली करावे लागते. त्यामुळे रक्ताभिसरणाचे कार्य सुधारते व आरोग्य चांगले राहते. काही महत्त्वाच्या खेळाच्या प्रशिक्षणासाठी पुढील ठिकाणी महत्त्वाचे कार्य बजावतात. वडोदरा येथे व्यायाम शाळा जुम्मा दादा यांची पतीयाळा येथील क्रीडा विद्यापीठ, गांधीनगर कोल्हापूर येथील खासबाग व मोतीबाग तालीम, अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ ,पुणे येथील बालेवाडी व श्री शिवछत्रपती क्रीडा स्कूल कुस्ती हे खेळाच्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. खेळामध्ये जीवनातील व्यथा आणि चिंता विसरायला लावण्याचे सामर्थ्य आहे.मनाला विरंगुळा देणे, ताजीतवाने करणे,तसेच शारीरिक हालचाली वेगाने करणे, शरीर काटक व बळकट बनविणे, तसेच खेळामुळे मनोधैर्य, चिकाटी, खिलाडूपणा या गुणाची वाढ होते. तसेच खेळामुळे आपापसातील सहकार्य, संघ भावना वाढीस लागतात.म्हणून खेळ हा जीवनातला महत्त्वाचा भाग आहे. खेळाचे मैदानी खेळ व बैठे खेळ असे प्रकार केले जातात. या दृष्टीने आपण मल्लखांबाची शारीरिक कसरतीच्या खेळामध्ये समाविष्ट होतो.वानराच्या झाडावरील क्रीडा पाहून बाळंभट्ट देवधर यांना हा खेळ सुचला असे म्हटले जाते. श्रीमती मनीषा बाठे यांनीही संशोधन करुन कुस्तीसाठी मल्लखांब व त्यातील पकडी यांची निर्मिती केली.मल्लखांब क्रीडा प्रकारात जागतिक स्तरावर भारताचे नाव उज्वल करणाऱ्या सर्व मल्लांना
विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडीच्या वतीने आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..शब्दांकन
प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत अध्यक्ष :विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि.नांदेड