
*खा. अशोकराव चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण शाळेच्या पहिल्या दिवशी हजर!*
नांदेड, दि. १६ जून २०२५:
राज्यभरातील शाळा आज सुरु झाल्या असून, माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण आणि भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी आज शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
खा. अशोकराव चव्हाण भोकर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी त्यांनी शाळेची पाहणी करून तेथील सोयी-सुविधांचा आढावा घेतला. शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात सहभागी होऊन प्रसन्नता अनुभवली, शिवाय या निमित्ताने माझ्या शालेय जीवनाच्या आठवणींनाही उजाळा मिळाला, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी भोकर विधानसभेच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी मुदखेड तालुक्यातील मुगटस्थित जिल्हा परिषद शाळेत हजेरी लावली. त्यांनी पुष्प देऊन मुलांचे स्वागत केले व त्यांच्या संवाद साधला. शिक्षक व कर्मचारी वृंदाशी संवाद साधून त्यांनी त्यांच्याही भावना जाणून घेतल्या. शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी संस्मरणीय असतो. नवीन वर्ग, नवे शिक्षक, नवा अभ्यास आणि उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर जुन्या मित्रमैत्रिणींची भेट, नव्या ओळखी अशा अनेक बाबींमुळे सर्वांनाच दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवसाची प्रतीक्षा असते, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.